‘बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!
या बंगल्यात आल्यापासून राजेंद्र कुमार यांचे लागोपाठ सात चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाले! त्यामुळे या बंगल्यातील वास्तव्याने राजेंद्र कुमारला ‘ज्युबिली कुमार’ हे नाव पडले…ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार, साधा भोळा राज कपूर व रोमॅन्टिक देव आनंद यांचं रसिकांवर गारुड असण्याच्या काळात राजेंद्र कुमार यांच्या चित्रपटांनी तुफान व्यवसाय केला. ‘जोगन’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करुन त्याला यश मिळालं ते ‘गुंज उठी शहनाई’ पासून.. त्यानंतर त्यांचे आलेले प्रत्येक चित्रपट २५/२५ आठवडे थिएटरवरुन उतरवले गेले नाहीत..
‘धूल का फूल’, ‘आई मिलन की बेला’, ‘सूरज’, ‘आरजू’ इत्यादी चित्रपटांनी, वर्षानुवर्षे प्रत्येक रनला प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे.. वडिलांनी भेट दिलेलं घड्याळ विकून आलेले ५० रुपये खिशात घालून राजेंद्र कुमार यांनी नशीब आजमावून घ्यायला मुंबईत पाऊल ठेवलं. गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या सहकार्याने त्यांनी दिग्दर्शक एच एस रावेल यांचेकडे सहायक म्हणून कामाला सुरुवात केली.
जेव्हा राजेंद्र कुमार यांनी आपला बंगला विकण्याचे ठरवले, तेव्हा राजेश खन्नाने तो विकत घेतला. ज्या दिवशी या ‘डिंपल’ बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाला त्या रात्री राजेंद्र कुमार यांना या बंगल्याने दिलेले यश आणि कीर्ती आठवून रडू आले..
राजेश खन्नाने बंगल्याचे नाव ठेवले, ‘आशीर्वाद’!!! त्या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्नाचे सलग पंधरा चित्रपट यशस्वी झाले. यश आणि समृद्धीचा त्याला खराखुरा ‘आशीर्वाद’ लाभला! राजेश खन्नाचे देखील अनेक चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाले!
काही वर्षांनंतर राजेश खन्नाचं आयुष्य बदलून गेलं. शेवटच्या काळात त्याला याच बंगल्याचा, एकमेव आधार होता.. शेवटी ‘राजेश खन्ना युग’ संपलं… ‘आशीर्वाद’ पोरका झाला… शशी किरण शेट्टी यांनी ‘आशीर्वाद’ विकत घेतला… तो पाडून जमीनदोस्त केला… आज त्या जागेवर पाच मजली भव्य इमारत उभी आहे!!!
आज भारत भूषण नाही, राजेंद्र कुमार नाही आणि राजेश खन्नाही नाही…. या जागेवर एकेकाळी, सिल्व्हर ज्युबिली स्टार रहात होते असं सांगूनही कुणालाही खरं वाटणार नाही..
‘डिंपल’, ‘आशीर्वाद’ सारखी एखादी वास्तू कलाकाराला कशी लाभदायी ठरते, ही आता फक्त ‘दंतकथा’च झालेली आहे…
आज ‘ज्युबिली स्टार’ राजेंद्र कुमारचा चोवीसावा स्मृतीदिन म्हणून हे ‘वास्तुपुराण’….
– सुरेश नावडकर
१२-७-२३
मोबा. ९७३००३४२८४
Leave a Reply