यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।।6.19।।
श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते..
हा श्लोक वाचला आणि देवघरातील त्या दिव्याच्या ज्योतीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकले…रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस देवघरात जाऊन दिवा लावणं आणि परवचा म्हणणं हा आपल्या सर्वांचाच नित्यक्रम. माझे आजोबा अजूनही दिवे लागण झाली (घरातली tube सुरु केली ही खूण) की आधी बसल्या जागी हात जोडून नमस्कार करतात..
रोज सकाळी सूर्य उगवतो तसा प्रकाश सर्वत्र पसरतो..एक नवीन दिवस आपल्याला मिळाला..जग स्वच्छ सूर्य प्रकाशात उजळून निघालं..उठा जागे व्हा..नवी सुरुवात करा..असं सांगणारा हा प्रकाश..विजेचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सकाळचा सूर्यप्रकाश हा दिवसाचा, तर देवघरातील दिवा हा रात्रीचे साक्षीदार होते..
सकाळचा सूर्यप्रकाश जसा बहिर्मुख करणारा तसा या नंदादीपाचा प्रकाश अंतर्मुख करणारा..दिवसभर मनुष्य या ना त्या मार्गाने काबाडकष्ट करतो..इतरांचा होऊन राहतो…पण हा नंदादीप मात्र त्याला स्वतःचा व्हायला शिकवतो..नव्हे रोज तशी आठवण करतो..तुझ्या आत डोकावून पहा हे सांगतो..दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न मनुष्याला भेडसावतात..पण सगळ्याची उत्तरं खरं तर अंतर्मुख झाल्यावरंच मिळतात…याची साक्ष देणारा तो नंदादीप..खरंतर हा नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवावा अशी आपली संस्कृती..जेव्हा दिवा बदलायचा असेल तेव्हा दुसरा दिवा आधी लावून तो देवापुढे ठेवून आधीचा काढावा ही खरी पद्धत..मात्र पूर्वी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी..दिवा अखंड तेवता ठेवणं अवघड जात असे.
पण जरीही अखंड तेवता ठेवणं शक्य नसलं तरी संध्याकाळच्या वेळी तो प्रज्वलित करणं यालाही आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहेच..घरात सकारात्मक ऊर्जा किंवा good vibes ओढून घेण्याकरताचा केंद्रबिंदू असतो.
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी जो मनुष्य मनाची शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवू शकेल त्यालाच ते उत्तम रीत्या निभावता येईल..तेव्हा या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तू स्थिर रहा असं आपण स्वतःलाच त्या दिव्यापुढे बसून सांगतो…
गीतेतील ‘आत्मयोग’ ही संकल्पना समजून घेऊन आचरणात आणणं अतिशय कठीण..पण दररोज हा नंदादीप लावून त्या ज्योतीकडे काही वेळ लक्षपूर्वक बघून डोळे मिटले, की असाच एक ‘दीप’ आपल्यामधे आहे याचा प्रत्यय येतो..प्रकाश हा केवळ light साठीचा समानार्थी शब्द नसून त्याला एक गहिरा अर्थ आहे..
रोज सूर्योदय झाला की जग उघड्या डोळ्याने पहाण्याची ऊर्जा आपल्याला मिळते तशीच सूर्यास्ताच्या वेळचा हा नंदादीप आपल्याला अंतरंगातून प्रकाशमान करतो..काही काळ जसं आपण रात्री अंधारात जातो आणि सूर्योदयाचा अनुभव घेतो तसंच दिनक्रम संपवून जेव्हा दिव्याच्या ज्योतीकडे पाहतो तेव्हा आपल्या आतही एक ‘सूर्योदय’ होतो..नव्हे व्हायला पाहिजे..जसं सृष्टीचक्रात सूर्योदय सूर्यास्त होतो अगदी तसंच आपल्या आतही ही प्रक्रिया नित्य सुरु रहावी म्हणून ही ‘ज्योत’ अनन्यसाधारण महत्वाची आहे.
योगसाधना हा दीर्घ विषय..पण दैनंदिन जीवनातली मानसिक स्थिर्याची, शांततेची आठवण करुन देणारा हा किती महत्वाचा घटक!..परमेश्वर म्हणा किंवा अगदी एक सर्वोच्च शक्ती म्हणा..त्याच्याशी संधान बांधून ठेवण्याचा हा किती विलक्षण मार्ग! आज आपल्याकडे वीज जरी उपलब्ध असली तरी देवघरातील त्या नंदादीपाचे महत्व अबाधितच राहील..
एका अर्थी या प्रक्रियेतून आपण रोज दिवस मावळताना स्वत:ला काहीवेळ unplug केल्यासारखं आहे. हे unplug reboot जसं उपकरणांना लागू तसं उपकरण होत चाललेल्या मनुष्यानेही हे नित्य आचरणात आणणे आवश्यक.
अशीच एक ‘ज्योत’ आपल्या सर्वांच्या आतही कायम तेवती राहोत आणि त्याचं तेजही बाह्यरंगात तेवतं राहो.
तेजस्वी भव..
— गौरी
Leave a Reply