शान्त समईत जशी वात,
तशी समाजात स्त्री जात,
जळून जळून प्रकाश देत,
क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!!
पणतीची ज्योत तशी,
आमुची ही असे जात,–
जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत,
लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!!
नंदादीपातील जशी ज्योत,
स्त्री तशी तिच्या संसारात,
हळूहळू अगदी तेवत,–!!!
दुसऱ्याला प्रकाशमान करत,–!
निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
सारखे सारखे पहा जळत,
स्वतःला ओवाळून टाकत,–!!!
निमूट उभे राहणे,
खंबीर अचल होणे,
स्वतः चटके सोसत,
भोवताल उजळून टाकणे,–!!!
अंधारावर मात करत करत,
काळ्या तमास नष्ट करणे,
आपले स्त्रीत्व साकारत,
प्रकाश-कारणे झिजणे,–!!!
असे झिजत झिजत,
पुढे वाटचाल करणे,–
वाऱ्यावादळांतही पुरत्या,
जिद्दीने पुन्हा फडफडणे–!!!
जो येई तो हात लावी,
धक्के सहत राहणे,
वेदनांनी तडफडत,
आपुले तेज सांभाळणे,–!!!
कुणी धरू पाहे ज्योत””,
त्यास धीराने सामोरे जाणे,
वेळीअवेळी चमकत, चमकत
आपली अस्मिता जपत राहणे,-!
कणाकणाने पळापळाने,
जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
मग तेजाचावसा,दान देणे,–!!!
ज्योतीने ज्योत पेटवीत,
मगच संपत संपत जाणे,!–
उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply