अपरिहार्य कामांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आपण नेहमीच ओझं मानून ती कामं करतो, आणि त्यातून मिळणारा आनंद गमावून बसतो.
एका गोष्टीतून हे तुमच्या लक्षात येईल. एक साधू भटकंतीला निघाला होता. रस्त्यावर असलेली मंदिरं पाहात, तिथेच विश्रांती घेत त्याचा प्रवास सुरू होता. एका ठिकाणी उंच टेकडीवर त्याला एक मंदिर दिसलं. सुंदर रंगवलेलं, झाडांनी आच्छादलेलं ते मंदिर पाहून त्याला वाटलं, या मंदिरात जरा विश्रांती घ्यावी. मनात आलं आणि तो टेकडीवर चढायला लागला. त्याचं आजूबाजूच्या निसर्गाकडे लक्षच नव्हतं. त्याला दिसत होतं ते फक्त मंदिर, अर्धी टेकडी चढून गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण दमलोय तिथेच एका खडकावर तो विसाव्यासाठी थांबला दहा-पंधरा मिनिटंच झाली असतील. त्यानं पाहिलं, एक तेरा-चौदा वर्षांची मुलगी, खांडावर एक छोट्या मुलाला घेऊन टेकडी चढत होती. ती दमली तर नव्हतीच, उलट छान गाणं म्हणत, गप्पा मारत, ती मजेत चढत होती. साधूनं ते पाहिलं आणि तो थक्क झाला. त्यानं त्या मुलीला थांबवलं आणि विचारलं, ‘मुली, मी मोठा असूनही ही टेकडी चढताना दमलो. तू मात्र खांद्यावर एवढं मोठं ओझं घेऊनही ही टेकडी मजेत चढते आहेस. तू दमली नाहीस हे ओझं खांद्यावर घेऊन ?’ मुलगी थांबली. क्षणभर तिनं साधूकडे पाहिलं. मंग खांद्यावर बसलेल्या मुलाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, ‘बाबा, ते काय ओझं आहे? तो तर माझा छोटा भाऊ आहे. त्या मुलीचं भावावर प्रेम होतं. त्यामुळे तिला त्याचं ओझं वाटत नव्हतं, आणि तो नाही आणि त्याचं काम करताना थकवाही येत नाही, हे तत्वज्ञान त्या लहानग्या मुलीने सहजपणे साधूला समजावून दिलं. काम करताना, ती आपल्या माणसांसाठी करत आहोत, हे लक्षात ठेवलं, तर त्यांचा आनंद आपल्याला घेता येतो. काम आनंदानं केलं, तर कंटाळा येत नाही आणि थकवाही येत नाही. दुर्गाबाई भागवत जितक्या मोठ्या विदुषी होत्या, तेवढ्याच उत्तम सुगरणही होत्या. एकदा त्यांच्या मैत्रिणीनं त्यांना विचारलं, ‘दुर्गाबाई, तुम्ही स्वयंपाक किती छान करता ! फारसे मसाले न घालता हे कसं जमतं तुम्हाला? ‘ त्यावर त्या उत्तरल्या, ‘अगं, मी माझं मन घालते पदार्थात !’ ‘हा पदार्थ माझी माणसं खाणार आहेत’ हे मनात ठेवून काही केलं की ते चांगलंच होतं !’ किती खरं बोलून गेल्या दुर्गाबाई ! कोणतंही काम करताना ते आवडीनं, आनंदानं केलं, तर ते कष्टाचं ही वाटत नाही आणि त्याचं ओझंही वाटत नाही. खरं ना?
– वेणुगोपाल धूत
Leave a Reply