“जंजीर ” मधील पहिली आग असो, “दिवार ” चे मिश्र (अर्धे कामगार, उरलेले स्मगलर) रूप असो, “शक्ती ” ची बापाविरुद्ध बगावत असो, “त्रिशूल ” चा धुमसणारा विरोधी स्वर असो, या “अँग्री यंग ” मॅनने कायम जनतेला स्वर दिलाय.
तितका ” काला पत्थर ” प्रकाशात आला नाही. यश चोप्रा, सलीम-जावेद, साहिर या बिनीच्या नावांबरोबर अमिताभ,शत्रुघ्न , शशी, नीतू , परवीन , राखी अशी आकाशगंगा, पण सारं अपेक्षेप्रमाणे नावाजलं गेलं नाही. सगळं दर्जेदार असूनही पारितोषिकाची मोहोर नाही, म्हणजे “ऍव्हरेज “. सध्याची कोटी वाली भाषा त्यावेळी नव्हती.
“चासनाला ” दुर्घटनेवर आपल्या अनिल बर्वेंनी “अकरा कोटी गॅलन पाणी ” लिहिलं होतं, पण घटनेचा हाहाकार दाखविण्यासाठी कागद पुरेसा नव्हता. त्यासाठी अजस्त्र पडदा हवा होता. पंचमहाभूतांपैकी “दी बर्निंग ट्रेन ” मध्ये आगीच्या ज्वाला तर येथे पाण्याचा प्रकोप.
फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच.
अतिशय शांत, अबोल , पण आतमध्ये काहीतरी खदखदतंय हे फक्त डोळ्यांतून दाखविणारा अमिताभ पूर्वी आणि नंतरही कधी दिसला नाही. (थोडाफार “सरकार”मध्ये , पण अपवादात्मक). त्याचा आवाजही धडकी भरविणारा ! राखी खोदून खोदून विचारते तेव्हा कुठे त्याचा मर्चंट नेव्ही च्या पूर्वायुष्याचा तुकडा हाती लागतो.
स्वारी येथे चेहेरा, पार्श्वभूमी टाकून आपल्या हातून घडलेल्या कृत्याची भरपाई करायला आलेली असते. पश्चाताप असेल, रिग्रेट असेल, अपराधीपणाची (गिल्ट) भावना असेल, पण हे पात्र दाहक ! थोडे प्रेमाचे शिंतोडे , पण त्याहीपेक्षा जरबेने ” मी सहसा बोलत नाही पण याचा अर्थ मी कायम गप्प राहतो असं नाही. ” म्हणणारा अमिताभ साक्षात ! सगळेच आपापल्या परीने व्यवस्थेला धडका मारण्यासाठी एकत्र येतात पण ओळख कायम राहते ती अमिताभची.
साहीर -राजेश रोशन कॉम्बो थोडे ऑड, पण जोपर्यंत साहीरच्या शब्दांना तुम्ही हात लावत नाही, तोवर तुम्ही सुखरूप ! बाकी “एक रास्ता ” मध्ये जीवनाचे तत्वज्ञान तो जाता -जाता सांगून जातोच. वस्तीवरचे आयुष्य यथार्थ , खाणीच्या खाईत जगणारी आणि भोंग्याने सैरभैर होणारी सामान्य मजूर मंडळी, बांगड्या फुटण्याची सवय असलेल्या स्त्रिया कोणते कोणते कप्पे दाखवून जातात.
अमिताभच्या ” आत ” काही आहे, हे १९७९ साली ओळखणारा यश चोप्रा ग्रेट ! नंतर आलेले ” सरकार (पहिले दोन भाग), पा , ब्लॅक ” सारे पडदे चमत्कृतीने भरलेले. आयुष्याच्या उत्तरायणात हा गृहस्थ बहरतो आहे. अजून कोणती वादळं दाखविणार आहे त्यालाच माहिती ! “लिजण्ड” यालाच म्हणत असतील बहुदा !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply