पूर्वी घरात पितळाची भांडी होती ( आता ती फारशी दिसत नाही म्हणून.. होती ). तर या पितळी भांड्यांना कल्हई करावी लागायची. ही कल्हई करण्यासाठी त्या वेळी आमच्या गावात एक माणुस यायचा.. आम्ही सारी बच्चे मंडळी त्याला चाचा म्हणत असू. तो नियमित येत नव्हता. अधुन-मधुन यायचा. पण तो यायचा हे मात्र नक्की. तर हा कल्हईवाला चाचा आला की आई घरातील पितळी भांडी काढायची. चाचाशी भाव ठरवायची. मग थोडीशी घासघीस झाली की चाचा कल्हई करायला तयार व्हायचा. मग हा चाचा त्याचा पाठीवरच गाठोडं रस्त्याच्या कडेला किंवा कधी कधी वाड्यातही उतरवायचा. त्या गाठोडत्यातून मग तो विविध साहित्य बाहेर काढायचा. पहिल्यांदा तो हवा भरण्यासाठी वापरला जाणारा हाताचा भात्या बाहेर काढायचा. गोल नळीला जोडलेले हॅन्डल फिरवले की कळीतून हवा बाहेर पडायची अशी व्यवस्था असायची. चाचा ही नळी जमिनीत खड्डा करून पुरायचा, त्यावर थोडा कोळसा घालायचा आणि पेटवायचा. हॅन्डलने हवा देखील भरत रहायचा. जशी हवा वाढू लागे तसा कोळसा पेट घेत जाई. त्याचा एक वेगळाच गंध परिसरात दाटून रहायचा. कोळशाचा गंध सर्वत्र पसरला की मग इतर घरातल्या महिला देखील बाहेर यायच्या पितळी भांडी घेऊन. दरम्यानच्या काळात कल्हईवाला चाचा पितळी भांडी तांब्या, पातले, ग्लास, ताट हे गरम करायचा. भांडी गरम झाली की त्या गरम भांड्यात पोतडीतलं काही तरी टाकायचा… चाचाने भांड्यात ते काही तरी टाकलं की भांड आतून एकदम बदलून जायचं. पूर्वीचं त्याचं जुनाटपण जाऊन तेथे नवं लख्ख झालेलं भांड दिसू लागायचं. हे भांड चमकू लागायचं. मग चाचा हे भांड शेजारी ठेवलेल्या पाण्याच्या मोठ्या पातेल्यात टाकायचा. गरम झालेले भांडे पाण्यात टाकल्यावर चर्र.. चर्र… असा आवाज व्हायचा. तो मोठा विलक्षण वाटायचा, शिवाय तो पहायला गंमत देखील वाटायची. दुसरी उत्सुकता असायची त्या चाचाच्या हातात असलेल्या त्या विशिष्ट पदार्थाची… ज्याचा वापर करून चाचा भांड्याचे अंतरंग पूर्त बदलून टाकत असे… एव्हाना चाचा भोवती अन्य घरातून आलेल्या भांड्यांची मोठी गर्दी झालेली असायची. सकाळी आलेल्या चाचाला पार दुपार व्हायची. मग आई त्याला खायला भाकरी द्यायची. अजुन एक दोन घरातून चाचासाठी काही ना काही पदार्थ येत असतं. चाचा देखील मोकळेपणाने या पदार्थावर ताव मारत असे… अन समाधानाचं ढेकर देऊन चालू लागत असे. कल्हईवाला चाचा गेल्यावर आम्ही मुलं, त्याने जिथे कल्हई केली तिथे जात असू. जमिन तापलेली असायची. तिथे छोटा खड्डा देखील पडलेला असायचा. काही लोखंडासारखे पदार्थ देखील तिथे पडलेले असायचे. ते आम्ही सारी मुले जमा करीत असु खेळण्यासाठी.
आज हे सारे आठवण्याचं कारण म्हणजे… घरातला शेवटचा पितळी तांब्या देण्यासाठी बाहेर काढला गेला होता. हा तांब्या मोडमध्ये देऊन स्टिलचे कुठलेतरी भांडे घेण्याची योजना आखली गेली होती. त्या पितळी तांब्याला पाहून कल्हईवाला चाचा आठवला. पितळी तांब्याला चिकटलेले सारे जुने संदर्भ आठवले आणि आठवणी समोर उभ्या ठाकल्या….
आठवणींचं असचं असतं, त्या कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा पुन्हा समोर येत असतात. त्या आल्या की मग सारं अंतरंग बदलून जात. मन स्वच्छ होतं.. लख्ख होतं… अगदी कल्हई केलेल्या भांड्या सारखं… नाही का…!
— दिनेश दीक्षित
(१० एप्रिल २०१८)
Leave a Reply