विश्वभ्रमण
करामती कॅमेरा
– अनंत संत
मोबाईलमधील कॅमेरा छायाचित्रे काढण्यासाठी किवा छायाचित्रण करण्यासाठी वापरला जातो. पण, काही अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यास हा कॅमेरा आपल्याला व्यक्ती, ठिकाण याबद्दलची माहिती देऊ लागतो, स्कॅनर म्हणून वापरता येतो, ट्विटर किंवा फेसबुकवर कोण काय करत आहे हे सांगतो. त्यासाठी मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबरोबरच जीपीएस, इंटरनेट, कंपास आणि विशिष्ट अॅप्लिकेशन्स असावे लागते.
भर वस्तीतील एका उंच इमारतीकडे मोबाईल हँडसेड करून एखादी व्यक्ती बराच वेळ पहात असेल आणि विशेषत: हा हँडसेट कॅमेरा मोडवर असेल तर गोंधळून जाऊ नका. तुम्हाला कदाचित तो एखादा सिव्हील इंजिनिअर असून त्या इमारतीचे ‘आर्किटेक्चर’ अभ्यासत असेल असे वाटेल. पण प्रत्यक्षात तो एखाद्या अॅप्लीकेशनचा वापर करून त्या इमारतीतून कोणी ट्विटिंग करते आहे का हेही पाहत असेल. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मोबाईल हँडसेट्स खरोखरच स्मार्ट झाले आहेत. त्यांचे रोज नवीन उपयोग लक्षात येतात आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञ नवनवीन अॅप्लीकेशन्स विकसित करून हँडसेट्सची उपयुक्तता वाढवत असतात. मोबाईल फोनचा वापर केवळ इतरांशी बोलण्यासाठीच किंवा एसएमएस पाठवण्यासाठी होतो, ही बाब आता जुनी झाली असून रक्तदाब मोजण्यापासून टीव्हीच्या रिमोट कंट्रोलपर्यंत अनेक प्रकारे हँडसेटचा वापर करता येतो. त्यासाठी स्मार्ट फोनची आवश्कता भासते.
एखाद्या ठिकाणाहून कोणी आपल्याला ट्विटस् पाठवत असेल तर त्याची माहिती काढण्यासाठी मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले एक अॅप्लीकेशन सुरू करावे लागते आणि फोनचा कॅमेरा त्या दिशेला धरून सर्व माहिती मिळवता येते. त्यासाठी हँडसेटमधील अॅप्लीकेशन, जीपीएस आणि कॅमेर्याची गरज भासते. मोबाईलमधील कॅमेरा केवळ छायाचित्रे घेण्यासाठी किंवा छायाचित्रण करण्यासाठीच असतो, असे समजू नये. हा कॅमेरा म्हणजे हँडसेटचा जणू डोळा असून तो आपल्याला अनेक गोष्टींबद्दलची माहिती देऊ शकतो. कोणी असे सांगितल्यास आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर ते पटेल. जीपीएस, इंटरनेट कनेक्टीव्हीटी, मॅप्स आणि काही अॅप्लीकेशन्सच्या सहाय्याने हँडसेटमधील कॅमेरा बर्याच करामती करू शकतो.
ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) ब्राऊजर्सच्या आगमनानंतर मोबाईलच्या कॅमेर्याद्वारे एखादी जागा किंवा वस्तू ओळखणे अगदी सोपे बनले आहे. त्यासाठी त्या जागेकडे किंवा वस्तूकडे केवळ कॅमेरा करावा लागतो. यासाठी कॅमेरा जीपीएसचा वापर करतो. जीपीएसमुळे कॅमेर्याला आपली नेमकी जागा समजते. त्यानंतर त्यात असलेल्या होकायंत्रामुळे (कंपास) कॅमेरा कोणत्या दिशेकडे रोखून धरला आहे हे समजते. या दोन गोष्टींच्या माहितीवरून मोबाईल फोन इंटरनेटला कनेक्ट होतो आणि तिथून त्या जागेची किंवा वस्तूची नेमकी माहिती घेऊन ती मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवतो. म्हणजे एकाच वेळी आपल्याला जागा किंवा वस्तू त्यासंबंधीची माहिती दोन्हीही स्क्रीनवर पाहता येतात. विकीपिडयावरून त्या जागेसंदर्भातील लोकांची मते, इतर माहिती, तिथे जाण्याचा आणि येण्याचा मार्ग आणि इतरही माहिती मिळू शकते. पण, त्यासाठी आपण नेमके कोणते अॅप्लीकेशन वापरतो आहोत हे महत्त्वाचे ठरते. अशी बरीच अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. त्यात नोकियाचे पॉईंट अॅण्ड फाईन्ड, गुगलचे गुगल्स यांचाही समावेश आहे.
एखादी जागा ओळखणे आणि त्यासंबंधीची सर्व माहिती ओळखणे हे पुरेसे नसेल तर मोबाईलच्या कॅमेर्याकडून आपल्याला बरीच माहिती घेता येते. सर्वात रंजक म्हणजे आपल्या सभोवतालची मंडळी ऑनलाईन आहे का आणि ती काय करत आहे ही माहितीही मिळवता येते. ट्विटर आणि युट्यूबसारख्या सेवांमुळे आपण नेमके कुठे आहोत याची माहिती सहज मिळू शकते. त्याचा वापर करून मोबाईल फोनचा कॅमेरा एखाद्या दिशेला रोखल्यास तेथील व्यक्ती नेमके काय ट्विटिंग करत आहे आणि युट्यूबवर काय अपलोड केले जात आहे ही माहिती आपल्याला बसल्या जागी मिळू शकते. आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या सभोवताली सुरू असलेले ट्विटिंग, छायाचित्रे आणि व्हीडीओजही पाहू शकतो. आपण नेमके कोणते अॅप्लीकेशन वापरत आहोत यावर हे फीचर्स अवलंबून असतात. आपल्या जवळपास प्रदर्शनासारखे कोणते इव्हेंट्स सुरू आहेत, संगीताच्या मैफिली, रेस्टॉरंट, कॅफेज, एटीएम्स अशा अनेक ठिकाणांची माहिती मिळू शकते.
मोबाईल फोनमधील कॅमेर्याचा वापर स्कॅनर म्हणूनही करता येतो. अर्थात, हा स्कॅनर उच्चदर्जाचा नसतो. स्कॅन आरसारख्या अॅप्लीकेशनचा वापर करून आपण स्कॅनिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्कॅन करायच्या असलेल्या डॉक्युमेंटचा फोटो काढावा. स्कॅनअरद्वारे या फोटोवर प्रक्रिया करून त्याची पीडीएफ फाईल तयार केली जाते. डॉक्युमेंटवरील अक्षरे अधिक वाचण्याजागी करण्याचा प्रयत्नही केला जातो. अशाच अॅप्लीकेशन्सचा वापर करून आपल्याला कॅमेरा बारकोड रिडर, व्हिजिटींग कार्ड रिडर म्हणूनही वापरता येतो.
ऑगमेंटेड आयडीसारख्या अॅप्लीकेशनमुळे एखाद्या व्यक्तीकडे कॅमेरा रोखल्यास ती व्यक्ती कोण आहे हेही ओळखता येते. अर्थात, या अॅप्लीकेशनमुळेच मोजक्याच व्यक्ती ओळखता येत असल्याने त्याचा उपयोग मर्यादित आहे. ज्या व्यक्तींचा चेहरा आणि नावे टॅग झाली आहेत अशाच व्यक्तींना ओळखणे शक्य होते. पण त्या व्यक्तींकडे कॅमेरा रोखल्यास त्यांचे नाव आणि इमेल आयडी तर समजतातच पण, फेसबुक किंवा ट्विटरवर त्यांनी काय पोस्ट केले आहे हेही समजू शकते. अर्थात यामुळे इतरांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे शक्य होत असल्याने अशा अॅप्लीकेशन्सना अनेकांचा विरोध असेल.
मोबाईलमधील कॅमेराचा वापर करून आपण नेमके कुठे उभे आहोत, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस पकडावी, सर्वात जवळचे रेस्टॉरंट कुठे आहे, त्या ठिकाणी बनणारे सर्वोत्तम खाद्यपदार्थ कोणते अशी माहितीही मिळू शकते. अर्थात ही केवळ सुरुवात असून ही अॅप्लीकेशन्स अजूनही प्राथमिक अवस्थत आहेत. ती अधिक विकसित झाल्यावर कॅमेर्याचे आणखीही बरेच उपयोग शोधता येतील. म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये मोबाईल फोनमधील कॅमेरा केवळ छायाचित्रे किंवा छायाचित्रण यांच्यापुरताच मर्यादित न राहता तो एक गाईड म्हणून आपल्याबरोबर राहू शकेल.
चौकट
कॅमेर्याच्या करामतीसाठी लागणारी अॅप्लीकेशन्स
* लेअर : या अॅप्लीकेशनमध्ये मोबाईलमधील कॅमेरा सुरू होऊन विविध प्रकारची माहिती देतो. त्यात आर्टीकल्सपासून व्हिडीओजपर्यंत आणि आपल्या सभोवतालच्या व्यक्ती ट्विटरवर काय करत आहेत या माहितीचा समावेश असतो.
* गुगल गुगल्स : आपल्याला एखाद्या वस्तूची माहिती हवी असेल तर हे अॅप्लीकेशन सुरू करून त्या वस्तूचे छायाचित्र घ्यावे. हे अॅप्लीकेशन व्हीजीटींग कार्ड स्कॅनरमधूनही वापरता येते.
* स्कॅन आर : स्कॅन करावयाच्या डॉक्युमेंटचे छायाचित्र घेतल्यावर हे अॅप्लीकेशन त्याचे पीडीएफ फाईलमध्ये रूपांतर करते.
* ऑगमेंटेड आयडी : आपल्याला एखादी नवखी व्यक्ती भेटल्यास तिच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी या अॅप्लीकेशचा वापर करता येतो. हे अॅप्लीकेशन सुरू करून कॅमेरा त्या व्यक्तीकडे रोखल्यास तिची माहिती मिळते. सध्या तरी याचा वापर मर्यादित असून यावर बरेच काम व्हायचे आहे.
* नोकिया पॉईंट अॅण्ड फाईंड : हे अॅप्लीकेशन सुरू करून कॅमेरा एखाद्या ठिकाणी रोखल्यास त्यासंदर्भातील सर्व माहिती मिळते.
* नियरेस्ट ट्यूब : लंडनमध्ये दळणवळणाची ट्यूब सिस्टीम आहे. अनेकदा त्या ठिकाणी आपला गोंधळ उडू शकतो. अशा ठिकाणी हे अॅप्लीकेशन सुरू केल्यास आपोआप कॅमेरा सुरू होतो आणि विविध ट्यूब स्टेशनची नेमकी जागा सांगतो.
(अद्वैत फीचर्स)
— अनंत संत
Leave a Reply