“यशोदा बाई, जा आत्ता” यशवंतने सुचवलं. यशोदा बाई निघून गेली.
“हं . आत्ता तुम्ही बोला, मिसेस शिर्के, तुमची इतकी मौल्यवान वस्तु मयताच्या हातांत कशी सांपडली? तुम्ही ती आपणहून नक्की दिली नसणार, तत्पूर्वी एक प्रश्न, तुम्ही ह्या इसमाला त्याच्या मरणापूर्वीपासून ओळखतां. होय नां?” यशवंतने आपली प्रश्नावली संपवतांना अनूचा चेहरा फिकट पडत असलेला पाहिला. “तुम्हांला बरं वाटत नाही कां? सावंत, पाणि आणा. लवकर”.
अनूने एका घोटांत पाणि पिऊन संपवलं.
“आत्ता मी सांगतो. मिस मलकानीची आणि तुमची जुनी ओळख किंवा मैत्री होती. तिच्या मदतीने तुम्ही पोटैशियम साईनाईड हे वीष मिळवलंत. विनोदच्या दारूच्या ग्लासांत ते मिसळून ते त्याला पाजलंत आणि त्याचा खेळ संपला. होय नां?” यशवंतने विचारलं.
“आत्ता शांतपणे सर्व कथाभाग सांगा.” यशवंत.
“होय, मीच त्याला ठार केला.” अनूने सुरुवात केली.
“चार वर्षांपूर्वी माझी ह्या माणसाशी ओळख महालक्ष्मी रेसकोर्सवर झाली. त्याकाळी मला त्यातलं काही कळत नव्हतं. विनोदने मला टिप्स दिले. कांही रेसिस मी जिंकल्या. पैसे मिळाले. चटक तागली. माझ्या वडलांनी अडकाठी घेतली नाही. मी वरचेवर रेस खेळूं लागले. विनोदची भेटही घडूे लागली. विनोदचं खरं स्वरूप कळलं. तो माझे पैसे वापरू लागला. ह्याच दरम्यान माझं बाळकृष्णशी लग्न ठरलं. विनोदने मला ब्लैक मेल करायला सुरुवात केली.बाळूशी ठरलेलं लग्न मोडायची धमकी दिली. मी घाबरले. सोक्षमोक्ष ठरवलं.” अनूने पुन्हा पाण्याचा घोट घेतला.
“ती सुईसाईड नोट, ती नेकलेस?” यशवंतने चालना दिली.
“सर्व सांगते. मी तयारीनिशी त्याच्या ब्लौकवर गेले. व्हिस्कीची बाटली, विषाची कुपी आणि सावधगिरी म्हणून पिस्तुलही. त्याला आधी रोमॅंटिक गप्पात गुंतवून भरपूर दारू पाजली. मग त्याच्यावर पिस्तुल रोखून आत्महत्येची चिट्ठी लिहायला सांगितलं. त्याला हा कांहीतरी पोरखेळ असावा अशी शंका आली. ‘हे खेळणीतलं आहे, होय नां?’ असंं म्हणत तो खोखो हसूं लागला. त्याचा विश्वास बसावा म्हणून मी एक गोळी टेबलावरल्या फुलदाणीला झाडली. फुलदाणी फुटली, पण तो सावध झाला. माझ्या हातांतलं पिस्तुल हिस्कावून घ्यायचा प्रयत्न करूं लागला. मी पिस्तुलाच्या दस्त्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. तो वठणीवर आला. त्याच्याकडून त्याच्याच हाताने चिट्ठी तयार करवली. परत एकदा झटापट झाली, पण या वेळी दारूबरोबर वीषही त्याच्या पोटांत गेलं असावं.तो बिछान्यावर पडला. त्याच्या उजव्या हातांत मी ती चिट्ठी घातली आणि घाई घाईने निघाले.” अनू.
“आणि त्याच्या डाव्या हातांत तुमची चैन अडकून राहिली, होय नां?” यशवंतने वाक्य पूर्ण केलं.
— अनिल शर्मा