या नावाचा एक चित्रपट होता. मला फार काही आठवत नाही पण हे गाणं मात्र खूप आवडायचे.काही माणसांच जीवन असेच असते. मी अनुभवले. पाहिले. ऐकले व वाचलय. पतंग जेव्हा नवीन आणला जातो. त्याची निगा राखली जाते. जपली जाते. एका मोकळ्या जागेत मैदानावर वारा वहात असतो आणि मदतीनीसा बरोबर पतंग उडवायला सुरुवात होते. अगोदर त्याचा दोर आपल्या हातात असतो. अजून उडवायला जमत नाही म्हणून मदतनीस थोड्या अंतरावर उभा राहून पतंगाला उंच उडवण्याची मदत करतो. आता वाऱ्या बरोबर तो हळूहळू वर जायला लागला की आत्मविश्वास वाढतो. हुरुप येतो. आनंद होतो. आणि मग गती व वेग वाढत वाढत तो खूप उंचावर जातो. तेव्हा सगळे जग त्याच्या कडे पहात असते. अशा वेळी स्पर्धा असते. एकमेकांच्या पुढे जाण्याची चुरस लागते. त्यासाठी काही जण धैर्य देतात. तर काही जण मागे खेचण्याचा प्रयत्न करतात…
तरीही अनेक अडथळे दूर करुन तो वरवर जात असतो. दोर धरणाऱ्याला वाटते की माझ्या मुळे हा वर गेला. खर तर इथेच गफलत होते. दोर असते नियतीच्या हातात. म्हणून आपल्या हातात आलेला दोर आपण सांभाळतो. आणि मग अचानक असे काही तरी घडते की तो पतंग एका क्षणात दोरी पासून तुटतो आणि गोल गोल हेलकावे खात तितक्याच वेगाने खाली येत असताना कधी एखाद्या तारेला थडकतो. वाऱ्याने पावसाने त्याची पार वाट लागते. कधी एखाद्या झाडावर लोंबकळत असेल तर काही धीट मुले तो काढण्याचा प्रयत्न करतात. कधी हाती लागतो तर कधी नाही तिथेही अशीच दशा होते. वारा जोरदार असेल तर पार जमीनीवर पायदळी पडतो. अशा वेळी त्याला भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो..
हा अनुभव घरी. समाजात. राजकारणात. क्रिडा. साहित्य. कला आणि अनेक क्षेत्रात असा आला की त्यावेळी काय वाटते. होते हे सगळे ज्याचे त्यालाच माहीत. याला कारण म्हणजे इर्षा. स्पर्धा. पैसा. किर्ती. प्रसिद्धी. सत्ता. मान. प्रतिष्ठा यांनी मनात घर केलेले असते म्हणून आपण कुठे स्थिरावले पाहिजे हे समजत नाही. त्यात भर म्हणजे जे अपयशी असतात. त्यांच्या उचापती चालू असतातच. हे सगळे झाले मोठ्या माणसांच्या बाबतीत पण सामान्य माणसाच्या आयुष्यात एकाएकी व्यवसायात दिवाळे निघते. अपघात. आजारात एखाद्या अवयवाला मुकावे लागते. व्हिलचेअर वर बसून रहावे लागते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत हे सगळे मान्य करणे फार अवघड असते. आणि मेरी जिंदगी है एक कटि पतंग है. असे म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून वेग. गती याचे भान ठेवले पाहिजे. आणि समजा तसेच झाले तर ते स्विकारावे. कारण ही जगाची रीत आहे….
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply