रामायणा मध्ये लक्ष्मण सीतेला लक्ष्मणरेषा दाखवून आतमध्ये राहण्यास सांगतो. जर ह्या रेषेला ओलांडले तर नुकसान होईल व आत राहिले तर सुरक्षित. हे सांगून ही भावनेच्या आहारी जाऊन सीतेने लक्ष्मणरेषेला ओलांडून कसे नुकसान झाले ह्याची कहाणी आपल्या सर्वांना माहीतच आहे. आज आपण ज्या परिस्थितितून जात आहोत तिथे आपल्याला एकसारख्या सूचना दिल्या जात आहेत की घरात रहा, मास्क लावा, हात धुवा.. .. पण ह्या सूचना काहींना बंधन वाटतात. पण मनुष्य सुरक्षित रहावा म्हणून शासनाने काही कायदे बनवले. जो ह्यांचे पालन करील तो सुरक्षित राहील व जो कायद्याला तोडेल, तो स्वतः तुटून जाईल हे मात्र नक्की. जसे आजही बघतो जे ह्या सुचनांचे पालन करत नाहीत ते ह्या आजाराचे शिकार होत आहेत. काहींना त्यामूळे मृत्युमुखी ही जावे लागले. रस्त्याने चालताना, गाडी चालवताना,.. .. काय करायला हवे आणि काय नको ह्याची नियमावली बनवली आहे. ज्यांनी ह्या बाबतीत हलगर्जी पणा केला ते काळाच्या गर्भात विरून गेले. कारण कोणता क्षण शेवटचा क्षण असेल हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. फक्त इथेच नाही पण बाकी च्या ठिकाणी ही काय करावे, काय नको हे सांगितले आहे. त्याचे गांभीर्य समजून चालले तर त्या कायद्यांच्या पाठीमागचा फायदा काय आहे ते ही समजेल. लहान असताना barmuda triangle बद्दल ऐकले होते. जहाज असो की विमान त्या ठिकाणी चुकून का होईना पोहोचले तर ते गायब होणार हे निश्चित. हे माहीत असून ही काहींनी धाडस केले पण तेही हरवले. सांगण्याचा भावार्थ हा की काही कायदे मग ते मनुष्याने बनवलेले असो की निसर्गाने त्यांचे पालन करण्यातच आपली भलाई आहे.
मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, जीवनाच्या प्रत्येक वळणावर काही कायदे आपोआपच लागू झाले जसे सकाळी लवकर उठावे व रात्री लवकर झोपावे, शाकाहारी असावे, शरीररूपी यंत्राला रोज कामी लावावे,.. .. असे नानाविध कायदे म्हणा की नियम म्हणा आपल्याला सांगितले गेले. त्याप्रमाणे चालणाऱ्यांनी शंभरी गाठली. पण ज्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीची नकल करण्याचा प्रयत्न केला ते स्वतः त्याचे काय नुकसान होत आहे ते अनुभवत असतीलच. निसर्गाने रात्र ही विश्राम घेण्यासाठी बनवली आहे. पण ह्या नियमांचे उल्लंघन जे करू पाहतात त्यांना शरीराचा आराम मिळत नाही. शरीराची झीज जी भरून निघायला हवी ते होत नाही. दिवसा कितीही झोप काढली तरी रात्री च्या झोपेची मजा काही वेगळीच असते हे आपण ही जाणतो. आज पैसे कमावण्यासाठी वेळेचे चक्र तोडून ही काम करावे लागते ही वस्तुस्थिती आहे पण काही फायदा तर काही नुकसान हेही दिसून येत आहे. चालणे, खाणे, पिणे, बघणे .. .. प्रत्येक कार्य कसे करावे ह्याची पद्धती शिकवली जाते. एक घास 32 वेळा चावावा, बसून पाणी प्यावे हे नकळत लागलेले नियम, पण ही बंधने नाहीत. स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी स्वतःला लावलेले वळण आहे. कायदा हा शब्द बोचरा आहे. कारण त्यावर चालण्याची जबरदस्ती केली जाते. नाही चालले तर त्याचा दंड भोगावा लागतो. पण हे खरंतर जगण्याची पद्धती आहे.
जीवन म्हणजे नाती ही आलीच. नात्याना जपण्यासाठी सुद्धा काही नियम ज्यांना आपण जवाबदारी म्हणतो ती पार पाडावीच लागते. जर त्याची समज नसेल तर कुठेतरी त्याचा परिणाम आयुष्यावर पडतो. प्रत्येक संबंधाचे वेगळे कायदे ते समजून जीवनाची गाडी हाकावी लागते. जसे नाते तसे त्याला जपण्याची रीत शिकावी लागते. सगळीकडे एकच नियम चालू शकत नाही. जसे काचेच्या वस्तु हाताळताना सांभाळतो तसेच संबंधांना सुद्धा काळजीपूर्वक हाताळावे लागते. तेव्हा संसार सुखाचा बनतो. घर, ऑफिस, शाळा, खेळाचे मैदान कोणते ही स्थान असो पण सगळीकडे नियम हे आलेच. पण हे नियम, कायदे, पद्धती नाव काही ही दया, त्यामध्ये आपला फायदा आहे हे समजून घ्या.
कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही. जसे शाळेत असताना कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला नेहमी भीती असते की मला कोणी बघत तर नाही ना, रेल्वे च तिकीट न काढणाऱ्याला सतत ही चिंता असते की तिकीट दाखवा असं बोलणारा समोर उभा तर नाही राहणार, income tax न भरणाऱ्याला रात्री झोप नाही लागणार.. .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.
म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply