अडीअडचणी, यश-अपयश, चढ-उतार ह्या गोष्टी सर्वांच्या आयुष्यात कोणत्याना कोणत्या स्वरूपात येतच असतात, परंतु त्यांचे अस्तित्व कायम स्वरूपाचे नसते, ते सतत बदलत असते. अश्याच तर्हेने जीवन चालते, याचा स्वीकार करून चालणारे लोक फार कमी असतात. जीवन हे माणसाला पावलापावलाला एक नवीन अनुभव देत असते परंतु, हा अनुभव घेताना यात अनेक खडतर मार्ग येतात, या मार्गांवरून जाताना स्वतःला सांभाळणे सर्वात अवघड असते. सांभाळता सांभाळता असे अनेक वेळा होते कि हा प्रवासाचं नकोनकोसा वाटतो, हा नकोनकोसा वाटणारा प्रवास मनावर सारखा आघात करत जीवनातील जिवंतपणाची जाणीव करून देतो कारण जिवंत गोष्टीनंच भावना समजतात. भावना ह्या सुरवातीला पहाटेच्या कोवळ्या उन्हासारख्या असतात, नंतर मात्र दुपारच्या कडक उन्हासारख्या त्रास देतात.
प्रत्येकाने विचार करावा कि ह्या कडक उन्हानंतरदेखील संध्याकाळचे लालसर आनंददायी ऊन आपली वाट पाहत आहे व त्यानंतर एक चंद्राची शीतल छाया आपले स्वागत करेल, त्यामुळे धीर न सोडता आपली वाटचाल चालूच ठेवावी आणि चंद्राच्या शीतल छायेचा आनंद घेण्यासाठी जोमाने चालावे हेच मनाला आधार देईल व जीवनप्रवास संपवण्याच्या विचाराला विश्वासरूपी तीक्ष्ण बाणाने कायमचे नाहीसे करेल
— विवेक विजय रणदिवे
अतिशय सुंदर लेख आहे. वाचून मला खूप आनंद झाला.