नवीन लेखन...

खरेच संपतोय नक्षलवाद

नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्‍यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल.

पाकपुरस्कृत दहशतवादानंतर देशाला सतावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणून नक्षलवादाकडे म्हणजेच माओवादी चळवळीकडे पाहिले जाते. नक्षलवादाचा प्रश्न नेमका कोणत्या पद्धतीने हाताळायला हवा, त्यांना पाकपुरस्कृत दहशतवादी मानून सैनिकी कारवाई करायला हवी की, नक्षलवादप्रभावी क्षेत्रातील लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या मनातील अन्याय झाल्याची भावना दूर करावी यावर एकमत होणे आवशक्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत माओवादविरोधी मोहिमेतील सुरक्षा दलांच्या अधिकार्‍यांनी केलेला हा प्रश्न सुटत असल्याचा दावा सर्वसामान्यांसमोर आशादायी चित्र उभे करतो. आता हा प्रश्न सुटत असून काही राज्यातील त्यांच्या प्रभावाखालील प्रदेश मुक्त होत असल्याचा दावा या अधिकार्‍यांनी केला आहे.हा प्रदेश नेमक्या कोणत्या पद्धतीने मुक्त झाला असावा याचे स्पष्टीकरण शोधूनही मिळत नाही. या मोहिमेतील अधिकार्‍यांना आणि पोलिसांना संपवण्याची किंवा त्यांच्यावर नियोजनबद्ध क्रूर हल्ले करण्याची एकही संधी माओवादी सोडत नाहीत.

देशातील 12 राज्यांमधील शंभराहून अधिक जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल किंवा पोलीसही जाण्यास कचरतात. महाराष्ट्र पोलिसांमध्ये एखाद्याला त्रास किंवा शिक्षा द्यायची असल्यास त्याची बदली गडचिरोलीमध्ये केली जाते. छत्तीसगडमधील सुमारे पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर केवळ जंगल आणि नक्षलवादी यांचेच राज्य आहे. स्वातंत्र्यानंतर आजवर तिथे एकही सरकारी अधिकारी जाऊ शकलेला नाही. तिथे नक्षलवाद्यांची अनिर्बंध सत्ता चालते. अशा परिस्थितीत नक्षलवाद हळूहळू संपत असून त्यांच्या प्रभावाखालील काही प्रदेश मुक्त होत असल्याचा दावा हास्यास्पद वाटतो. विशेष म्हणजे गेल्या एक-दोन  महिन्यात सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये फारशा चकमकीही झडलेल्या नाहीत, नक्षलवादीही मोठ्या प्रमाणावर मारले गेले नाहीत. शिवाय नक्षलवाद्यांचे म्होरके अनुयायांसह मोठ्या संख्येने सरकारला शरण आले असल्याच्याही बातम्या नाहीत. उलट नुकतीच माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ले करून चार पोलिसांना ठार केल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत आहे किवा त्यांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त होत आहे अशा दाव्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा? एक-दोन महिन्यांच्या कालावधीत हे शक्य झाले असेल तर ते एवढे सोपे होते का आणि सोपे असेल तर आजवर ते का जमू शकले नाही, असे प्रश्न समोर उभे राहतात.नक्षलवाद्यांविरुद्ध त्यांच्या प्रभावाखालील प्रत्येक राज्य लढत असते. या लढाईत पोलीस दलांची मोठी हानीही होत असते. तरी आजवर त्या त्या राज्यांच्या पातळीवर राज्य शासनांनी अनेकदा असे दावे केले आहेत. आता आपल्या राज्यातले नक्षलवादी संपले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचा म्होरक्याच आपल्या ताब्यात आला आहे, त्यांचा सूत्रधारच शरण आला आहे, आता त्यांच्यासाठी शस्त्रांची निर्मिती करणारा कारखानाच नष्ट करण्यात आला आहे, साल्वा जुदूमला आता यश मिळत आहे, असे किती तरी दावे विविध राज्य सरकारांनी केले आहेत. पण यातला एकही दावा खरा नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. पण मग सरकारतर्फे असे अनाकलनीय दावे का केले जात असावेत हा मोठा प्रश्न निर्माण होतो. जनतेला काहीच समजत नाही आणि आपण सांगू तेच सर्वांना खरे वाटेल असा सरकारचा आग्रह असेल तर सरकारने त्यातून ताबडतोब बाहेर येणे गरजेचे आहे. काही वेळा नक्षलवादी पुढील हल्ल्यांच्या तयारीसाठी आणि डावपेचाचा एक भाग म्हणून काही दिवस शांतता पाळतात. अशा वेळी पोलिसांना ते संपत आले आहेत असा भास तरी होतो किंवा पोलीस खातेच जनतेला फसवण्यासाठी असे दावे करत असावे असे सतत आढळून येते. नक्षलवाद किवा माओवाद ही एक क्रंतिकारी चळवळ असून त्यांना पद्धतशीरपणे निधी आणि प्रशिक्षण पुरवले जाते. या चळवळीत काही राजकारण्यांसह अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे नक्षलवाद सहजपणे संपणार नाही याची सरकारलाही जाणीव आहे आणि जनतेलाही ते चांगले माहीत आहे.नक्षलवाद्यांनी देशाच्या अनेक राज्यांमध्ये कारवाया सुरू केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाईही सुरू आहे. सरकार तो संपत असल्याचे दावे करत असते, पण वास्तवात तो संपण्याऐवजी वाढत चालला आहे. त्यांनी किती क्षेत्र व्यापले आहे हे काही कोणी मोजलेले नाही. तेव्हा त्यातला एक चतुर्थांश भाग मुक्त झाला आहे या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. या चळवळीने व्यापलेले क्षेत्र म्हणजे युद्धानंतर व्यापले जाणारे क्षेत्र नाही. आता हा प्रदेश आपला आहे असे दावे युद्धात केले जात असतात. नक्षलवादी चळवळीने व्यापलेला प्रदेश असा परकीय शत्रूंनी व्यापलेल्या प्रदेशासारखा मुक्त करायचा नसतो. नक्षलवादाचा प्रभाव हा मानसिक आणि वैचारिकही आहे. त्याच्या प्रभावाची बीजे आपल्या सामाजिक जीवनातल्या काही विशिष्ट स्थितीमध्ये रुजलेली आहेत. ही स्थिती बदलली तरच त्यांचा प्रभाव ओसरेल. दुर्दैवाने ही स्थिती बदलल्याची चिन्हे दिसत नाहीत. कदाचित सुरक्षा दलाला काही नक्षलवादी दहशतवाद्यांना मारणे शक्य झाले असेल. काही ठिकाणी त्यांचा दहशतवाद कमी झाला असेल पण तिथे सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही तोपर्यंत नक्षलवाद संपलाय असे म्हणता येणार नाही.नक्षलवाद्यांनी सरकारचे सर्वच दावे फोल ठरवले आहेत. सरकारने त्या त्या वेळी या चळवळीची वरवर दिसणारी पालवी खुडलेली असते पण या सरकारचा कारभार या चळवळीच्या मुळांना पाणी घालणाराच ठरला आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात काही आदिवासींच्या आत्महत्यांचे प्रकार उघड झाले. गेल्या वर्षाभरात अशा 23 आत्महत्या झाल्या आहेत. पण या आत्महत्या उपासमार, गरिबी आणि आजार यामुळे झाल्या असतानाही त्यांची तशी नोंद करण्यात आलेली नाही. पोलिसांत अपघाती मृत्यू अशी त्याची नोंद करण्यात  आली आहे. आदिवासींना कसल्याच सोयी उपलब्ध नसल्याचे यावरून दिसून येत असतानाही सरकार हा अभाव असा लपवून ठेवत असेल तर तूर्तास तो लपेल पण या स्थितीत उद्याचे नक्षलवादी निर्माण करण्याची ताकद आहे हे नाकारता येत नाही.हे चित्र बदलत नाही आणि नक्षलवादी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबत नाही तोपर्यंत आपण केवळ नक्षलवादी संपल्याचे दावे करू शकू, पण नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या ठिकाणच्या जनतेला सोयी-सुविधांबरोबरच सुरक्षित जीवनाची हमी मिळेपर्यंत नक्षलवाद संपवण्यात यश येणार नाही. म्हणून सरकारने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादी चळवळ संपवण्याची एक परिपूर्ण योजना आखली पाहिजे आणि त्या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली पाहिजे. या योजनेत बोलणी, वाटाघाटी, प्रश्न समजून घेणे, प्रसंगी बळाचा वापर करणे अशा अनेक मार्गांचा समावेश असू शकतो. अर्थात त्यासाठी प्रश्नाचे उत्तर शोधण्याची इच्छाशक्ती सरकारकडे असायला हवी.

— अरविंद जोशी
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..