आपल्या समाजात कोणत्याही गोष्टींची निर्मिती करण्याआधी, सर्वतोपरीनं अगदी बारीक गोष्टींचा विचार झालेला दिसून येतो. वेशभूषा, परंपरा, धर्म, आहार, औषध, सण-समारंभ आदींसारख्या नित्य तसेच अत्यावश्यक अशा बाबींमध्ये तर पावलोपावली हा विचार जाणवतो. अर्थात या सर्वच बाबींना बोधपूर्ण आणि शास्त्रीय दृष्टीकोन लाभलाय, याची प्रचिती आपल्याला त्याचा अभ्यास केल्यावर होते. त्यासाठी ढीगभर अशा कथा ही प्रसिद्ध आहेत. अनेक क्रिडा प्रकार सुद्धा याला अपवाद नाहीत. पूर्वापार युगापासूनच मनोरंजनासाठी असे अनेक खेळ आपल्याकडे खेळले जात आणि त्यातले बरेचसे आजही आपण खेळतोय. पण खेळ खेळण्याचा उद्देश काय? अर्थात करमणूक, व्यक्तिमत्व विकास तर आहेच पण बर्याच खेळांना थेट मानवी जीवनाशी जोडण्यात आलंय. जेव्हा मानवी बुद्धिमत्ता आणि शरीर याचा संबंध खेळांशी लावला जातो त्यावेळेस समोर येतात ते बुद्धिबळ, पत्ते, सापशिडी तर मैदानी खेळांमध्ये गोट्या, लगोरी, आट्या-पाट्या, क्रिकेट, कबड्डी सारख्या लोकप्रिय खेळांचा समावेश होतो.
ज्यावेळेस बुद्धिबळ खेळाचा विचार होतो तेव्हा अर्थातच बुद्धिला चालना देणं तसेच आयुष्यात त्याचा योग्य तो वापर कुठे, कधी, कसा करायचा हे लक्षात येतं. आज चार पुरुष एकत्र जमले किंवा मैत्रिणींची जोडगोळी जमली तरी पण पत्ते खेळले जातात. यामध्ये जुगाराचा प्रवेश झाला असला तरी कोणती बाब गुपित ठेवावी, पेचप्रसंग उभे राहिले तर कशारितीनं शक्कल लढवून एखादा हुकुमी एक्का टाकून आश्चर्यचकित करायचं, कुठेही आधीच आपली योजना उघड करायची नाही असे सर्व संदेश पत्त्यांचे खेळ आपल्याला देतात. आयुष्यात चढ-उतारांची मालिका म्हणजे सुख-दु:ख, उत्साह, आनंद, निराशा असे विविध प्रवाह. सापशिडीचा खेळ हे टप्पे अचूक दाखवतो. क्षणात काही पावलं मंद गतीनं पुढे तर अचानकच शिडीची साथ असल्यास थेट इच्छुक घर किंवा उद्दिष्ट गाठण्याची मिळालेली चढाईत तर मनाजोगे आकडे न मिळाल्याने थेट सापाच्या तोंडातून खाली येणं असेल पण कोणतीही हार न मानता आपलं लक्ष्यं गाठण्यासाठी पुन्हा जिद्दिने खेळून जिंकण्यासाठीचा प्रयत्न असेल, हा सारा डाव सापशिडीतून लक्षात येतो.
अनेक मैदानी खेळातून ही अर्थपूर्ण जीवन जगण्याची दिशा मिळते. आपल्या आयुष्यात कुठल्याही बाजुने वार चालून आलेच किंवा आपल्या कुटुंबावर एखादं संकट आलंच तर धिटाईने रक्षणासाठी उभं राहणं आणि वार परतवून लावणं हा बोध क्रिकेट देतो. आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर आपलं चित्त इच्छित ध्येय किंवा महत्वाकांक्षेपासून दूरावण्याची शक्यता असते. चंचलता येते. पण तसं होऊ न देणं हे आपल्याच हाती असतं. गोट्यांचा खेळ आपण बर्याचदा खेळलोही असू, त्यामध्ये प्रतिस्पर्धींच्या गोट्यांना बोटांच्या टिचकिने मात देणं आणि विजयी होण्याचा क्रम असतो, अगदी तंतोतंत हा नियम या खेळात लागू होतो. तर आट्यापाट्यांमध्ये कधी २ पायांवर तर कधी एका पायाची लंगडी घालावी लागते. कदाचित अनेकांच्या आयुष्यात दुर्दैवाचे क्षण येतात जेव्हा ते मानसिकदृष्ट्या किंवा शारिरीकरीत्या दुर्बल होतात. पण कोणताही आधार न घेता अगदी भक्कमपणे जो स्व:ताला सावरतो तोच इच्छित ध्येय गाठतो. आपल्याकडे आयुष्याला अगदी सकारात्मक दृष्टीने पहाण्याची शक्ती मिळावी यासाठीच या खेळांची रचना असावी. म्हणून घरगुती खेळ खेळा, मैदानी खेळातही प्राविण्य मिळवा असा वस्तुपाठच लहानपणापासून दिला जातो. कारण बालवयानंतरच जीवनाचा खरा खेळ सुरु होतो. तेव्हा आठवतात ते आपण खेळलेलो सवंगड्यांसोबतचे खेळ . जेव्हा कधी आपण जिंकत तर कधी हरत होतो, कधी चतुराईने स्पर्धकांना मात देत मैदानात दाद मिळवत होतो तर कधी हरल्यामुळे टिकेच्या सुरांना सामोरे जात होतो.
शेवटी आयुष्य असे खेळ जिंकण्या-हरण्याचा, वेळ प्रसंगी डाव सावरण्याचा, तर खिलाडूवृत्ती दाखवून आपलंसं करण्याचा!!
Leave a Reply