मराठी रंगभूमीवरील अभिनेता आणि नाटककार बबन प्रभू यांचा जन्म १६ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
बबन प्रभू यांचे मूळ नाव साजबा विनायक प्रभू.
मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. मुंबई दूरदर्शनवर हास परिहास हा बबन प्रभू व याकूब सईद यांचा कार्यक्रम खूप गाजला होता.
फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
त्यांनी लिहिलेल्या फार्सिकल नाटकांचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. प्रत्येक माणसाला दोन रुप असतात. त्यात एक मन वाईट गोष्टींकडे तर दुसरे चांगल्या गोष्टींकडे झुकत असते. दैनंदिन जीवनात समाजात वावरणाऱ्या माणसांच्या काही सुप्त इच्छा असतात. ज्या कायम त्याने दडवून ठेवलेल्या असतात. आपल्या इच्छेनुसार जगण्याची तो हिमंतच करू शकत नाही. मात्र अशा वेळी संमोहनशास्त्राचा वापर करून ते दडलेलं व्यक्तिमत्त्व आणि इच्छा जागृत झाल्या आणि त्यानुसार तो जगू लागला तर नक्कीच त्याच्या दैनंदिन जीवनावर, कुटूंबावर त्याचा परिणाम होणार. पण जर त्यांची दोन व्यक्तिमत्त्व जर सतत त्यांच्यात डोकावू लागली तर त्याची उडणारी तारांबळ ही कशी मजेदार होऊ शकते हे ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकातून दाखविण्यात आले होते.
मुंबईतील दादर मधील एका चौकाला बबन प्रभू चौक नाव दिले आहे. नाट्यलेखनासाठी दरवर्षी बबन प्रभू स्मृती पुरस्कार दिला जातो. सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदक आणि कलाकार नीलम प्रभू ह्या त्यांच्या पत्नी होत.
बबन प्रभू यांचे १९८१ मध्ये निधन झाले.
बबन प्रभूंनी लिहिलेली नाटके
चोरावर मोर
झोपी गेलेला जागा झाला
दिनूच्या सासूबाई राधाबाई
पळा पळा कोण पुढे पळे तो
माकड आणि पाचर
घोळात घोळ
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply