मी सातवीत असतानाची गोष्ट आहे. मंडईला भाजी आणायला जाताना मी शनिपार येथे लावलेला एक बोर्ड वाचला. त्यावरती ‘आज रात्री आफळेबुवांचं कीर्तन’ असल्याचा मजकूर होता. मी जेवण झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास कीर्तन ऐकण्यासाठी गेलो. पाहतो तर काय, स्त्री-पुरुषांची अफाट गर्दी! स्त्रिया एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पुरुष. आफळेबुवांच्या खणखणीत आवाजाने कीर्तन रंगले होते. मधेच बुवांनी एखादा विनोद सांगितल्यावर श्रोत्यांतून हास्याचे फवार्रे उडत होते. रात्रीचे साडे अकरा वाजल्यानंतर काही श्रोतें पेंगायला लागल्याचे बुवांच्या नजरेस यायचे. मग बुवा ओरडून सांगायचे, आता स्त्रियांनी हात वर करा. मग पुरुषांनी हात वर करा. शेवटी एकदाचे कीर्तन संपायचे, त्यापूर्वी आफळेबुवा श्रोत्यांना सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी सांगायचे की, जवाहरलाल नेहरूंच्या अंत्यदर्शनासाठी सुभाषचंद्र बोस भारतात आले होते. त्याचा पुरावा म्हणून ते त्या प्रसंगाचा छापलेला फोटो दाखवायचे. ज्यांना कुणाला हा फोटो हवा असेल, त्याने एक रुपया देऊन हा फोटो माझ्याकडून विकत घ्यावा. बरेच श्रोते तो फोटो घेत असत. हे मी पाहिलेलं पुण्यातलं पहिलं कीर्तन!
माझ्या लहानपणी सुट्टीत गावी गेल्यावर माझे आजोबा वाड्या शेजारील, माडीच्या घरात रात्री जेवण झाल्यानंतर कंदिलाच्या उजेडात धार्मिक ग्रंथवाचन करायचे. गावातील वयोवृद्ध माणसं ते ऐकायला जमायचे. रात्री उशीरा त्यातील बऱ्यापैकी भाग पूर्ण झाल्यावर आजोबा वाचन थांबवत असत. सगळ्यांना बुक्का लावून झाला की, माणसं आपापल्या घरी निघून जात असत.
कॉलेजमध्ये असताना मी वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणी जुन्नरला गेलो होतो. तिथल्या मुक्कामाच्या रात्री कीर्तन ऐकायला तेथील मंदिरात गेलो. त्या बुवांनी ज्ञानेश्वरांविषयी कीर्तनातून खूप काही दाखले देऊन सांगितले. त्या कीर्तनाचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की, मला जीवनात काहीच स्वारस्य वाटेनासं झालं. या संतांनी एवढं कार्य केलं, तेही कमी वयात! आपण त्यांच्यापुढे अगदीच क्षुद्र आहोत असं मला वाटू लागलं.
सदानंद प्रकाशनचं काम करीत असताना, एक दिवस खाडिलकरांनी मला एका छोट्या पुस्तिकेचं मुखपृष्ठ करायला दिलं. ती पुस्तिका लिहिली होती, गोविंदस्वामी आफळेबुवांनी! त्या संदर्भातून मला आफळेबुवांना भेटण्याची संधी मिळाली.
एके दिवशी मी भिकारदास मारुती मंदिराच्या आवारातील आफळे बुवांच्या घरी गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला त्यांचा फोटो निवडण्यासाठी त्यांचे अनेक आल्बम दाखवले. त्यांनी परदेशभेटीच्या आठवणी सांगितल्या. पुस्तिका तयार झाली. बुवांना फार आवडली.
आम्ही ‘गुणगौरव’मध्ये ऑफिस सुरु केल्यावर ‘महाराष्ट्राची लोककला’ची एक जाहिरात केली. तो प्रयोग होता टिळक स्मारक मंदिरात. आम्ही दोघेही प्रयोग पहायला गेलो. त्या प्रयोगाचा सूत्रधार होता, चारुदत्त आफळे! प्रयोग उत्तम झाला. त्यानंतर चारुदत्त आफळेंसह सर्व कलाकार व आम्ही पूना गेस्ट हाऊसला जेवायला गेलो.
त्यानंतर चारुदत्त संगीत नाटकांचे वेळी, कधी प्रकाश इनामदार यांचे सोबत, कार्यक्रमात भेटत राहिला.
एकदा ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णी कडून मिलिंद बडवे आमच्या ऑफिसमध्ये आले. त्यांना कीर्तन जुगलबंदीची जाहिरात करुन हवी होती. त्यांच्यासोबत एक गुटगुटीत तरुण मुलगा होता. त्यांनी ओळख करुन दिली, हा माझा सुपुत्र, श्रेयस बडवे! दरवर्षी त्यांची कीर्तन जुगलबंदी भरत नाट्य मंदिरमध्ये असायची. त्यावेळी जाहिरात व स्टेजवरील फ्लेक्स आम्ही करायचो. ही कीर्तन जुगलबंदी ‘हाऊसफुल्ल’ होत असे. त्या निमित्ताने श्रेयसची भेट होत असे. श्रेयसची पत्नी मानसी ही देखील कीर्तन करीत असे.
श्रेयसने दैनिक ‘प्रभात’ मध्ये काही वर्ष पत्रकारितेचा अनुभव घेतला, नंतर पूर्णवेळ कीर्तनाला वाहून घेतले. त्याने ‘नर्मदा परिक्रमा’ केली. त्या प्रवासाचे थरारक अनुभव आम्हाला सांगितले. गेल्या काही वर्षांपासून मिलिंद बुवा व श्रेयस बडवे दोघेही दक्षिणमुखी मारुती जवळ, कीर्तन महोत्सव सादर करतात. आम्ही एक दिवस तरी नक्कीच श्रोते म्हणून उपस्थित असतोच.
सोलापूरचे उल्हासजी वेदपाठक यांची ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी ओळख करुन दिली. उल्हासजी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. ते उत्तम चित्रकार व कीर्तनकारही आहेत. त्यांच्याशी बोलताना मी श्रवणानंद घेत राहतो.
कोरोनामुळे गेलेले वर्ष व हे अर्धे वर्ष सगळं काही ‘लॉकडाऊन’ मध्ये बंद आहे.. देऊळच बंद आहे तर देवळात कीर्तन कसं रंगणार? देवांनाही वेठीस धरणाऱ्या या कोरोनाचा सर्वनाश होवो ही भगवंत चरणी प्रार्थना…
बोला पुंडलिकऽ वरदेऽ हरिविठ्ठल.. श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ पंढरीनाथ महाराज की जयऽ
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१-६-२१.
Leave a Reply