२००० साली आम्हा बंधूंना ‘बिनधास्त’ चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट जाहिरातीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळा होता, दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे येथे. मी मुंबईतच होतो. रमेश, मामेभाऊ पंढरीनाथ व त्यांचे मित्र किसन पवार हे पुण्याहून कार्यक्रमास आले. पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. सिनेअभिनेत्री युक्ता मुखीच्या हस्ते पुरस्काराची बाहुली मिळाली. इथेच कलाप्रेमी किसनरावांची माझी ‘पहिली भेट’ झाली.
दरम्यान दोन वर्षांचा कालावधी निघून गेला. २००२ च्या अखेरीस किसनरावांनी त्यांच्या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ करण्यासाठी संपर्क साधला. ‘हिरवी जाळी’ या पुस्तकाचे मी काढलेल्या फोटोवरुन ‘संस्कृती प्रकाशन’चे पहिले मुखपृष्ठ केले. त्या निमित्ताने सदाशिव पेठेतील त्यांच्या घरी मी जात होतो. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुनीताराजे पवार (माई) यांच्याशी चर्चा करुन मुखपृष्ठानंतर ‘संस्कृती प्रकाशन’च्या बोधचिन्हाचे काम केले.
किसनरावांच्या प्रत्येक भेटीत त्यांना असलेली सांस्कृतिक विषयांची आवड दिसून येत होती. साहित्य, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, इत्यादी विषयांवर आमच्या गप्पा होत असत. भेटी होत होत्या. दरम्यान अप्पा बळवंत चौकात माईंनी ‘संस्कृती प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली.
सदाशिव पेठ सोडून पवार कुटुंब आता ज्ञानेश्वर पादुका जवळ ‘अमित आनंद’ मध्ये ‘शिफ्ट’ झालं. कामाच्या निमित्ताने मी वारंवार घरी जात होतो. रविवारी किसनराव हमखास भेटायचे.
आमची घनिष्ट मैत्री व्हायचं कारण म्हणजे ‘आम्ही सातारकर’! आमची साहित्य, नाटक, चित्रपट विषयांची ‘वेव्हलेंग्थ’ जुळलेली. माणसं म्हणतात की, पती-पत्नीच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात. तशाच मित्रांच्याही जोड्या ठरत असाव्यात.. कारण कित्येकदा नुकताच संपर्कात आलेला मित्र त्याआधी काही निमित्ताने अनेकदा समोर येऊनसुद्धा आपल्याला माहीत नसतो.
किसनरावांचा जन्म १९५७ सालातील रंगपंचमीचा! आई-वडिलांना पाच मुलांनंतर झालेलं शेंडेफळ! दोन बंधू व तीन बहिणीनंतर झालेल्या किसनचं मातृछत्र काही वर्षांतच हरपलं. जि.प. शाळेत सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. इयत्ता सहावीत असताना मोठे बंधूच शिक्षकाच्या भूमिकेत किसनच्या समोर उभे होते. कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या किसनरावांना आजही प्राथमिक शाळेत शिकलेल्या मराठी कविता तोंडपाठ आहेत.
पुढील अकरावीपर्यंतचं माध्यमिक शिक्षण रहिमतपूरला झालं. त्यानंतर कमवा आणि शिका योजनेतून सातारच्या छत्रपती शिवाजी काॅलेजमधून कला शाखेची पदवी घेतली.
पहिली नोकरी केली ती लॅब असिस्टंटची. दरम्यान स्पर्धा परीक्षा देणे चालू होते. काही महिन्यांनी पुण्यात येऊन डिफेन्स अकौंटमध्ये ‘ऑडिटर’ म्हणून नोकरी केली. विद्याभवन मधील मेसमध्ये मॅनेजर म्हणून काम केले.
मुंबईत गेल्यावर इंडियन बँकेत ‘कॅशियर’ पदावर काही महिने काम करीत असताना त्यांना आकाशवाणी रत्नागिरी केंद्र येथे निवेदक व कार्यक्रम निर्माता म्हणून निवड झाली होती, मात्र ते टेंपररी काम असल्यामुळे त्याला दुय्यम महत्त्व दिले. नंतर सेल्स टॅक्समध्ये ‘निरीक्षक’ पदावर काही महिन्यांचा अनुभव घेतला. सेंट्रल एक्साईज मध्येही ‘निरीक्षक’ पदावर नोकरी केली. याच दरम्यान भायखळ्यातील ‘शिवनेरी’ बिल्डींगमध्ये रहात असताना, त्याच बिल्डींगमधील खानावळीत जेवताना टकले- बोरगाव मधील एका युवकाशी मैत्री झाली. तेच माझे मामेभाऊ पंढरीनाथ भोसले, यांचेशी किसनरावांची ‘जीवश्च कंठश्च’ मैत्री आहे.
एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे किसनरावांना राज्य उत्पादन शुल्क खात्यात डीवायएसपी पदावर नोकरी लागली व त्यांचे दिवस पलटून गेले. कोपरगावच्या नोकरीने प्रारंभ होत, नंतर उल्हासनगर, औरंगाबाद नंतर पदोन्नती झाल्यावर सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, धुळे, रत्नागिरी, परभणी, अहमदनगर येथे काम केले. कोल्हापूर व नागपूर येथे विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क या पदावरुन निवृत्त झाले!
या नोकरीच्या कालावधीत १९८७ साली लग्न झाले. सुरुवातीला काही वर्षे पत्नी व मुलं बरोबर होती. सांगलीनंतर मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यास मुक्काम ठेवला. नोकरीच्या निमित्ताने अनेक वरीष्ठ अधिकारी व हाताखालील कर्मचारी वर्ग यांच्याशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत होतच राहिले.
नोकरीच्या निमित्ताने अनेक खेडी, शहरं, राज्यं पाहिली. राजस्थान, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर पाहिलं. तीन वेळा बालाजी दर्शन झालं, चारीधाम यात्रा झाली. ट्रेकींगच्या छंदामुळे शिवरायांचे शंभरहून अधिक गड किल्ले पालथे घातले.
या सरकारी नोकरीतही त्यांनी आपले साहित्यिक प्रेम अबाधित ठेवले. सुचलेल्या अनेक कविता वेळ मिळेल तेव्हा लिहून काढल्या. कवितांनी पेटी भरुन गेली. त्याच कविता तीन पुस्तकांतून प्रकाशित झाल्या.
किसनरावांना सेवानिवृत्त होऊन आता सहा वर्षे झालेली आहेत. वीस वर्षांत ‘संस्कृती प्रकाशन’ने उंच गरुडभरारी घेतलेली आहे. दोन्ही मुलांचे विवाह होऊन दोन सुना आलेल्या आहेत. दोनाचे चार, चारांचे सहा झाले आहेत. सगळं गोकुळ आनंदात नांदते आहे.
किसनराव तब्येतीच्या बाबतीत फार काळजी घेणारे आहेत. रोजचा व्यायाम, सायकलिंग ते न चुकता करतात. स्वतःचं वजन व पोट वाढणार नाही याची ते काळजी घेतात.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-३-२१.
Leave a Reply