एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली…
माझ्या जन्माच्या आधीपासूनच वडील पुण्यात सदाशिव पेठेत रहात होते. ते रहात होते त्या वाड्याजवळच एक लाकडाची वखार होती. वखारीच्या मालकाचं नाव होतं, स्वर्णसिंग तानेसिंग ठाकूर. हे ठाकूर पंजाबहून पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. डोक्यावर पांढरा फेटा, आकाशी रंगाचा सदरा, पांढरा पायजमा व पायात चपला असा त्यांचा पेहराव असायचा. दाढी मिशा वाढविलेल्या असल्यामुळे त्यांना सर्वजण शेठजी म्हणत असत.
माझे वडील एका वयोवृद्ध आजीच्या शेजारील खोलीत भाड्याने रहात होते. शिक्षकाची नोकरी करीत ते शिकत होते. त्यावेळी अडीअडचणीला या शेठजींनी वडिलांना मदत केली.
शेजारीच भरत नाट्य संशोधन मंडळाच्या सोशल क्लबमध्ये रात्री नाटकांचे प्रयोग होत असत, म्हणून वडिलांनी व त्यांच्या मित्रांनी मिळून वखारीच्या जागेत सायकल स्टॅण्ड सुरु केला. त्याकरिता शेठजींनी वडिलांना सहकार्य केले. काही महिन्यांनंतर तो स्टॅण्ड बंद झाला. नंतर वडिलांनी इस्त्रीचं काम सुरु केलं. काही महिन्यांनंतर येणाऱ्या अडचणींमुळे ते देखील बंद झालं. वडिलांच्या प्रत्येक प्रयत्नांना शेठजींची मोठ्या भावाप्रमाणे साथ होती.
दरम्यान शेठजींचं लग्न झालं. रहायला ते शिवाजी मंदिर समोरील एका वाड्यात होते. पानशेतच्या पुरानंतर शेठजींची वखार बंद झाली. तिथे जोशी मालकाने नवीन बिल्डींग बांधली. शेठजी आता जंगलात जाऊन, झाडे तोडून त्यांचे व्यवहार करु लागले. त्या मिळकतीतून संसार चालवू लागले. त्यांना एक मुलगी व दोन मुले होती.
मी पाचवीत असल्यापासून रमेश बरोबर त्यांच्या घरी जात असे. शेठजींची पत्नी, शांताबाई यांना स्वच्छतेचं फार वेड होतं. त्या नेहमी फरशी पुसताना दिसायच्या. त्यांच्याकडे जी धुणीभांडी करायला बाई होती, तिने भांडी धुवून आणल्यानंतर शांताबाई पुन्हा स्वतः भांडी धूत बसायच्या.
शेठजींची तिन्ही मुलं शाळेत जायची. त्यातील बाबा हा मोठा होता व नाना हा धाकटा. नानाने शिक्षण सोडून रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. बाबाने काॅमर्स शाखेची पदवी घेतली. नाना पेरुगेट चौकात नेहमी मित्रांसोबत असायचा. त्यांनी एकत्र येऊन पेरुगेट मित्र मंडळचा गणेशोत्सव सुरु केला.
शेठजी हळूहळू वयोमानानुसार थकू लागले होते. ते रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे. गप्पा मारायचे. माझ्या हातात एक डायरी देऊन त्यामध्ये दिवसभरातील खर्च लिहायला सांगायचे. ते लिहून झालं, की ती डायरी स्वतःच्या बंडीच्या खिशात ठेवायचे. त्यांचा इतिहास व भूगोल हा विषय आवडता होता. व्हिएतनामचं युद्ध या विषयावर ते नेहमी बोलत असत. माझ्या चुलत बहिणीचे मिलीट्रीमधील मिस्टर आल्यानंतर त्या दोघांच्या गप्पा रंगत असत. हिवाळ्यात आम्ही घरात शेकोटी करीत असू. त्यावेळी शेकोटी भोवती गप्पा रंगायच्या. त्यासाठी त्यांनी एकदा पोतभरुन लाकडाचे तुकडे आणले होते.
वयोमानानुसार शेठजींचं येणं आता कमी होऊ लागलं. रोजच्या ऐवजी ते चार आठ दिवसांनी येऊ लागले. आता लाकडाचा व्यवसायही कमी झाला होता. एका पहाटे घरातून आई-वडील शेठजींना पहायला वाडिया हॉस्पिटलमध्ये गेले. परतले ते शेठजी गेले हे सांगायलाच..
काळ कोणासाठी थांबत नाही. नानाचं लग्न झालं. तो फॅमिलीसह राहू लागला. नंतर बाबांचं लग्न झालं. तो व त्याची पत्नी नोकरी करणारी होती. त्यांनी आईला व बहिणीला सांभाळले. नंतर नाना गेला. काही वर्षांनी बहीण गेली. वर्ष जात होती.
शांताबाई गेल्याला पाच वर्षे होऊन गेलीत. आता दोन्ही कुटुंबं सुखी आहेत. दाढीवाल्या शेठजींचा मी ‘क्लिक थ्री’ कॅमेऱ्यावर एक फोटो काढलेला होता. त्यावरुन रमेशने त्यांचे एक पोर्ट्रेट केले. ते आज बाबाच्या फ्लॅटमध्ये लावलेले आहे.
एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली…
जरी शेठजींनी आयुष्यभर कोळशाचा व्यवसाय केला, तरी खरे ‘हिरे’ तेच होते…
© – सुरेश नावडकर १९-५-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply