शेवटची पोस्ट या मालिकेतील- सीमोल्लंघनाची (म्हणून ) सकारात्मक-
घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच.
माझ्या मुलाने बारावीत पुण्यातील एका प्रथितयश महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्याचे सर म्हणाले होते- ” क्लास लावालच तुम्ही सगळ्या विषयांचा, मग इथे शिकवायची गरज काय?”
तेव्हा महाविद्यालयांनीही आता स्वतःचे आक्रसलेले आणि दुय्यम रूप स्वीकारलेले आहे. आता महाविद्यालये फक्त फी घेण्यासाठी आणि शिक्षकांचे वेतन वाटप करण्यासाठी ! त्यांचे मूळ प्रयोजन हरवले आहे आणि याबद्दल त्यांची तक्रारही नाही. कोचिंग इंडस्ट्री ने शाळा/महाविद्यालये गिळंकृत केली आहेत आणि त्यांचे काम स्वतःवर घेतले आहे. पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे त्यामुळे महाविद्यालयाची फी + क्लासची फी असा दुहेरी आर्थिक बोजा पालक आनंदाने (अथवा अगतिकतेने) स्वीकारताहेत.
अशामध्ये डॉ लीलाताई पाटील यांनी कोल्हापुरात “सृजन आनंद शिक्षण ” नामक प्रयोगशील शाळा काढली. तेथील विद्यार्थी (आणि शिक्षक) वेगळ्या तेजाने लकाकताना आम्ही पाहिली. शिक्षण आनंददायीच असलं पाहिजे कारण त्याचा मूळ हेतू/प्रयोजन आनंदी/हसरे चेहेरे असा आहे.
पुण्याची ज्ञानप्रबोधिनी विद्यार्थ्यांना स्व शिकविते आणि जगण्याच्या सर्व शक्य अंगांना भिडायची संधी देते. तेथील मुले इतर शाळांमधील मुलांपेक्षा वेगळीच असतात /विकसित होतात म्हणून उठून दिसतात. लहानपणापासून त्यांना सो कॉल्ड “लाईफ स्किल्स ” हाताळता येतात आणि त्यामुळे जीवन उभे राहण्यासाठी त्यांचे पाय बळकट/खमके होतात.
समस्या निवारण, प्रत्येक मूल स्वायत्त असणे याचा अंगीकार आणि समाजाला समोरून भिडणे त्यांना शिकायला मिळते. ही मुले भलेही मेरिट मध्ये येत नसतील पण अनेक संस्थांमध्ये उच्च पदावर आहेत आणि त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे /जडण घडणीमुळे पटकन ओळखू येतात.
गुजरातमधील वल्लभ विद्यानगरला गेलो असता तेथील “अक्षर पुरुषोत्तम छात्रालय ” मध्ये काही दिवस वास्तव्य करण्याची संधी मिळाली. अंगी शिस्त भिनणे म्हणजे काय याचा नमुना दिसला. त्यांच्या मते समर्पण बालवयापासून शिकवण्याची संकल्पना आहे, निःस्वार्थ सेवेची चेतना आपल्याला अधिक चांगले विश्व /समाज बनविण्यासाठी मदत करते या दृढ पायावर जगातील पाच खंडांमधील नऊ देशांमध्ये कार्यरत असणारी ही संस्था आहे.
माता अमृतानंदमयी माँ यांनी अमृता विश्वविद्यालय सुरु केले आहे. तेथील शिक्षणाचा पायाही साधना, सेवावृत्ती, अध्यात्मिक वाढ असाच आहे. अम्मांच्या सगळ्या शाळा ,महाविद्यालये किलबिल करीत असतात,तेथील बाल्य ,तारुण्य अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून चुरगळलेले नसते. चेहेऱ्यावरील तेज, आवाजातील मार्दवात दडलेला आत्मविश्वास सारं सतत प्रत्ययाला येत असतं.
मुख्य म्हणजे या सगळ्या संस्था जागतिक नकाशावर नावारूपाला आलेल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी-पालकांसाठी तीर्थस्थाने बनलेली आहेत. कोटा प्रमाणे rankers ची आय आय टी ची फी भरणे, गांवभर त्यांचे फ्लेक्स लावणे, मुलाने क्लास सोडू नये म्हणून फी परत करणे, वेगवेगळ्या नावाखाली शिष्यवृत्त्या देणे असे काही हतखंडे या “तेजस्वी ” शिक्षण संस्थांना करावे लागत नाही.
आणि या संस्था चालवितात कोण? सन्यस्त वृत्तीचे चालक किंवा दस्तुरखुद्द संन्यासी !
प्रत्येक संन्यासी “गुरु “असतोच असे नाही, पण प्रत्येक “गुरु ” हा सन्यस्त वृत्तीचा असलाच पाहिजे.
आपण पुन्हा सांदिपनींच्या गुरुकुल संकल्पनेकडे जायला हवे.
मूल्यशिक्षणात हयात घालविलेल्या माझ्या श्वशुरांना माझ्या मुलाने बोलून दाखविले होते- ” तुम्ही आसपास असला की, तुमच्या अस्तित्वातून आम्हांला मूल्यशिक्षण मिळते, त्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही.”
हे अंतर्बाह्य शिक्षक “ असणे “ अगत्याचे असते.
प्रबोधिनी, अक्षर पुरुषोत्तम छात्रालय, अमृता विश्वविद्यालय ही आजच्या काळातील नालंदा-तक्षशिला आहेत. त्यामुळे कोटा फॅक्टरीतील शोषण फार काळ टिकेल असे वाटत नाही. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील (किंबहुना देशातील) अनेक खासगी महाविद्यालये आपल्या दुकानांना कुलूप लावून बसली आहेत, बरीच ए आय सी टी इ ने बंद केली आहेत.
रोज सकाळी मी गणपती मंदिरात आरतीला जातो. तेथे नेमाने येणारी एक महिला कोणाशीही न बोलता हातात झाडू घेऊन आधी मंदिर परिसर साफ करते आणि मग आरतीसाठी आत प्रवेश करते.
आपणही शिक्षण मंदिराचा परिसर आधी साफ करू या आणि मगच गुरुचे वास्तव्य असलेल्या असलेल्या गाभाऱ्यात नव्याने प्रवेश करू या.
एका वाक्यावर माझा कायम विश्वास आहे – ” शिक्षकांना निराश होण्याचा अधिकार नसतो. ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply