नवीन लेखन...

कौपिनेश्वर मंदिर, ठाणे

श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते. याच्या भोवतालचा परिसर दोनशे वार लांब व साठ वार रूंद असा होता. हा सगळा भूभाग श्री कौपीनेश्वर मंदिर देवस्थान म्हणून ओळखला जात असे. मराठ्यानी साळसेट जिंकिले आणि लागलीच या मंदिराची उभारणी करण्यात आली. इ. स. १७६० वा त्या सुमारास सर-सुभेदार, रामजी महादेव बिवलकर यानी हे मंदिर बांधले. श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे यानी इ. स. १७५४ साली सर सुभेदाराना राहण्यासाठी वाडा बांधून दिला. तो वाडा म्हणजेच आजचे सिव्हिल कोर्ट होय. हे मंदिर बांधण्यासाठी आणखी एक कारण घडले. या मासुंदा तलावातील पाण्यात आज मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आलेले शिवलिंग सापडले. म्हणून मंदिर उभे करून मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व हिंदूबांधवाना हे मंदिर पूजा अर्चा, दर्शन या साठी खुले केले.

या ऐतिहासिक मंदिराची माहिती, त्याची जडण घडण ठाणेकराना आणि इतरांनाही होणे आवश्यक आहे. महादेवाचे मंदिर ठाण्याची ग्रामदेवता आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याबद्दलची भावना अनेकात आहे. ठाणे तसेच परिसरातील खेडी येथील जनतेला या मंदिराबद्दल विशेष आदर आहे. श्री कौपीनेश्वर महाराज नवसाला पावतात असा भाविक लोकांचा समज आहे. इतकेच नव्हे तर मुंबई व मुंबईच्या उपनगरातील लोकांना फार पूर्वीपासूनच श्री कौपीनेश्वर मंदिर एक वैशिष्ठ्यपूर्ण स्थान असल्याचे वाटत आलेले आहे.

मंदिराची संकल्पना:

मंदिरे समाज जीवनाला प्रतिष्ठा आणि स्थैर्य आणून देणारी केंद्रस्थाने आहेत. मंदिरे ही प्रमुख श्रद्धाकेंद्रे होत. मंदिरात कथा कीर्तन, आणि प्रवचन द्वारा आजतागायत धर्म संकीर्तन होत आले आहे. धर्म जागृती, सदाचार, आणि सद्विचार या गोष्टी समाजातील सर्व थरातील लोकापर्यंत सातत्याने पोचविण्याचे कार्य मंदिरातून होत असते. मंदिरे केवळ पूजास्थाने न राहता ती श्रद्धाकेंद्रे व्हावीत याच धारणेतून मंदिराची निर्मिती झालेली आहे. ही धारणा आजतागायत थोड्याफार प्रमाणात काही मंदिरातून टिकून राहिलेली आहे. श्री कौपीनेश्वर मंदिर त्यापैकी एक आशास्थान मानण्यात येते.

श्री कौपीनेश्वर मंदिराची जडणघडण:

श्री कौपीनेश्वर मंदिराच्या बाबतीत विचार करताना त्याची जडणघडण कशी झाली हे पाहणे योग्य ठरेल. तरच मंदिराला आज जे स्वरुप प्राप्त झाले आहे ते ध्यानात येईल या मंदिराच्या जडणघडणीचे साधारण पणे चार टप्पे पडतात. वास्तविक दोनच कालखंड महत्वाचे आहेत. (१) मंदिर स्थापनेपासून म्हणजे इ. स. १७६० ते इ. स. १९३९ पर्यंतचा प्रदीर्घ कालखंड. या कालखंडात जनता मंदिराबाबत विशेष जागरुक नव्हती आणि सारा कारभार गुरवांच्या ताब्यात होता. (२) दुसरा कालखंड इ. स. १९३९ ते आजतागायत या काळात मंदिरांची व्यवस्था, मालकी, ट्रस्टकडे आली, गुरव . आणि ट्रस्टी यांचा संयुक्त व्यवहार सुरु झाला. हे दोन टप्पे मंदिर व्यवस्थापनेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या दोन्ही कालखंडात काही महत्वाच्या घटणा घडल्या व कार्याची दिशा ठरली गेली. म्हणून आणखी दोन टप्पे कल्पावे लागतात, त्या सर्वांचाच इथे विचार केलेला आहे.

पहिला कालखंड इ. स. १७६० ते १८७९ (पूर्व स्थिती निदर्शक) या कालावधीत मंदिर व देवस्थान यांची स्थिती खालील प्रमाणे होती.

१. दक्षिण पूर्वेकडे मासुंदा तलावाच्या काठी भव्य अशा दगडी इमारतीत श्री कौपीनेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली (ही स्थिती आजही तशीच आहे, मात्र मंदिराच्या पिछाडीस आज म. गांधी उद्यान व त्यापुढे रहदारीचा मोठा रस्ता झाला आहे).

२. प्रमुख मंदिराच्या पिछाडीस उत्तरेश्वराचे छोटेखानी मंदिर होते. (आज सितला देवीच्या बाजूच्या मंदिरात या मूर्तीची स्थापना केलेली आहे).

३. वरील मंदिराच्या पिछाडीस पिंपळाचे झाड होते व मोठा पार होता. या पारावर मारुतीची छोटी दगडी मूर्ती होती. (आज पार आणि पिंपळ अजिबात नाहीत. मारुतीची मूर्ती श्री कौपीनेश्वर मंदिर सभागृहात उत्तरेकडच्या कोनाड्यात ठेवलेली आहे).

४. या मंदिराच्या उत्तरेकडे सितला देवी आणि त्याच्या मागील बाजूस ब्रह्मदेव या देवतांची छोटी मंदिरे होती. ही फार पुरातन असावीत. (सितला देवी मंदिर नवीन बांधले आहे. ब्रह्मदेवाची मूर्ती श्री उत्तरेश्वर मंदिरात स्थापित केली आहे).

५. त्या पलीकडे राम मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोर हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिराला लागून एक पडवी होती. (ही दोन्ही मंदिरे त्याच जागी आहेत, पडवी मात्र नाही.) [या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. श्री राम मंदिर इ. स. १९७४ आणि हनुमान इ. स. १९८६.]

६. राम मंदिराच्या पलिकडे कालिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोर एक मजली मोठे दत्तमंदिर आहे. त्याला जोडून एक पडवी (मंदिरे आहेत पडवी नाही.)

७. या दोन्ही देवळांच्या उत्तरेकडे आणखी एक पार होता तिथे दक्षिण मुखी मारुतीची छोटी घुमटी होती. (आज़ पार नाही घुमटी ऐवजी देऊळ आहे. हे इ. स. १९७-७३ साली बांधण्यात आले आहे.)

८. कालिका देवीच्या उत्तरेला मासुंदा तलावाशेजारी एक धर्मशाळा होती. ती एका गुजराथी व्यापाऱ्याने हिंदूसाठी सार्वजनिक उत्तरक्रिया आदी कार्यांसाठी बांधली होती. (आज ही धर्मशाळा दक्षिणेकडे बांधण्यात आली आहे. तिथे सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे बांधकाम स. १९७२ साली करण्यात आले. त्याच सुमारास उत्तरेकडे सार्वजनिक संडास व मुतारी यांची सोय करण्यात आली.)

९. उत्तरेकडील टोकाला आणखी एक मोठी धर्मशाळा होती, त्याला चाळीचे स्वरुप होते. त्यात दुकाने होती. (आज चाळ दिसत नाही, केळे गल्लीत दुकाने आहेत.)

१०. उत्तरेकडील पूर्वेला आणखी एक धर्मशाळा होती. (आज विद्यमान नाही.)

११. पूर्वेच्या बाजूला स्टेशन रोडला लागून एक मजली चाळ होती, त्यात नऊ दुकाने होती. (नव्याने बांधून दुकाने भाड्याने दिली आहेत.)

१२. दक्षिणेकडील बाजूला एक मजली इमारत होती. या इमारतीत गुरव राहत असत. या घरालगतच एक पडवी होती.  (आज मितीला हे सारे बदलून गेलेले आहे.)

दुसरा टप्पा इ. स. १८७९ ते इ. स. १९३९ इ. स. १८७९ साली ठाण्यातील हिंदूबांधवानी वर्गणी गोळा करुन मंदिरापुढील सभामंडप बांधले. कारण ते अगदी मोडकळीस आले होते. त्याला अंदाजे खर्च रु ८००/- आला. याच कालावधीत दक्षिण पूर्वेकडे स्टेशन रोडला लागून एक मजली पक्की इमारत बांधण्यात आली. त्याला अंदाजे खर्च रु. ८००/- आला. इमारतीच्या तळमजल्यावर तीन गाळे होते आणि ते गाळे दुकानासाठी देण्यात आले. इमारतीच्या वरील जागेत गुरव स्वतः राहू लागले. पूर्वीची जागा त्याने भाड्याने दिली आणि नवीन इमारत बांधण्यासाठी दक्षिणेकडे गुरवानी पाया खणून ठेविला. या कालावधीत वर्गणी इत्यादी गोळा करून त्यातून मिळणाऱ्या व्याजावर व देणगीतून रामनवमी उत्सव साजरा केला जात असे. या राममंदिरासाठी पंच नेमले गेले होते. देवस्थानच्या परिसरात जी इतर देऊळे होती ती भक्त मंडळी व देणगीदार यांजकडून बांधण्यात आली होती. ही देवळे सार्वजनिक स्वरुपात सर्वांना खुली होती.

तिसरा टप्पा इ. स. १९३९ ते इ. स. १९७६ हा महत्वाचा कालखंड मानावा लागेल. कारण देवस्थानाच्या कारभारात लोकांनी लक्ष घातले व त्यातून पुढील गोष्टी घडल्या. देवस्थान मालमत्ते संबंधी निश्चित धोरण ठरविण्यासाठी इ. स. १९३५ च्या सुमारास ठाण्यातील काही नागरिकांनी मंदिराचे गुरव (पूजारी) यांचे विरुद्ध ठाणे कोर्टात दावा केला. त्या दाव्याचा निकाल १२ डिसेंबर १९३९ रोजी लागला. त्या अन्वये मंदिर व्यवस्थापन व मालकी याची एक निश्चित योजना कोर्टाकडून मान्य करण्यात आली. दि. ४/११/१९५२ रोजी ट्रस्ट रजिस्टर करण्यात आला. श्री कौपीनेश्वर मंदिराचे त्या वेळचे वार्षिक उत्पन्न देणग्या इत्यादी सह अत्यल्प होते. त्या वेळच्या विश्वस्तानी मंदिराचा परिसर सुधारुन भोवताली दुकाने, इमारती बांधून मंदिराच्या उत्पन्नात भर घातली. हे करताना तत्कालीन विश्वस्तानी अतिशय परिश्रम घेतले. देणगी, कर्जाऊ रक्कम इत्यादी रुपाने निधी उभा केला. त्यांच्या परिश्रमामुळेच मंदिराला आजचे हे भव्य रुप प्राप्त झाले आहे. आता कर्ज इत्यादी फिटल्याने देवस्थानचे वार्षिक उत्पन्न वाढले आहे.

चवथा टप्पा इ. स. १९७७ ते आजतागायत इ. स. १९३९ साली कोर्टाने मान्य केलेली योजना तत्कालीन मंदिराचे उत्पन्न लक्षात घेऊन करण्यात आली होती. त्या योजनेप्रमाणे दैनंदिन पूजन, नैवेद्य, वार्षिक उत्सव, डागडुजी आणि व्यवस्थापन या साठी लागणारा खर्च इतकाच होता. इतर कार्यासाठी खर्च करण्याचा अधिकार त्या योजनेनुसार नसल्याने विद्यमान विश्वस्तानी एक नवी योजना तयार करुन तिला कोर्टाकडून मान्यता मिळविली. १५ सप्टेंबर १९७६ रोजी ठाणे कोर्टाने या नवीन योजनेस मान्यता दिली. व ही नवी योजना १ जानेवारी १९७७ पासून अमलात आणावी अशी आज्ञा केली. याचबरोबर विश्वस्तांच्या मूळ संख्येत तीनानी भर घालून विश्वस्तांची एकूण संख्या अकरा केली.

श्री कौपीनेश्वर मंदिराचे आजचे स्वरुप:

आज या मंदिराची चतुःसीमा अशी आहे. मासुंदा तलाव हरवला गेला आहे. तिथे रहदारीचा मोठा रस्ता करण्यात आलेला आहे. म्हणून आज या देवस्थानच्या पश्चिमेला म. गांधी उद्य भाजी मार्केट, उत्तरेला केळी गल्ली, पूर्वेला स्टेशनरोड आणि दक्षिणेला करुर बाग इस्टेट. इ. स. १९७० ते १९७४ या कालावधीत राम मंदिराचा जीर्णोद्धार, क्रियाकर्मासाठी दक्षिणेकडील बाजूला एक इमारत बांधली (इ. स. १९७२) त्याच सुमारास उत्तरेकडे सार्वजनिक संडास व मुतारी बांधली. इ. स. १९४८ साली देवळाच्या पश्चिमेकडे सरकारकडून देवस्थाना साठी २५०० वार जागा चार आणे वार भावाने खरीदली. त्याला भरावासाठी रु. ४०,०००/- खर्च आला. देवळात देवदर्शनास येणाऱ्यांची संख्या खूप वाढली असून मंदिराला एकच दार असल्याने दर्शन घेऊन परत त्याच दराने यावयाचे असल्याने फार त्रास होऊ लागला. यासाठी पश्चिमेकडे इ. स. १९७३ साली एक दार लावण्यात आले. त्यामुळे खूप सोय झालेली आहे. इ. स. १९८६ साली राममंदिरासमोरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. श्री कौपीनेश्वर मंदिर सभामंडपाचा लवकरच जीर्णोद्धार करण्याचे ठरले आहे.

मंदिर सभामंडप इत्यादी :

श्री कौपीनेश्वर मंदिराचे महाद्वार स्टेशन रोडच्या बाजूला पूर्वेकडे आहे. या द्वारावरच ‘ओम नमः शिवाय ही अक्षरे झळकताना दितात. पूर्वी या द्वारावरच नगारखाना होता. आज तो नंदीच्या वरील भागात हलविला गेला आहे. या शिवाय मंदिराला उत्तरेकडे दोन दारे आहेत. उत्तर पूर्वे कडील दार छोटे नेहमी वापरते आहे. उत्तरपश्चिमेकडील दार मोठे आहे. या दाराने ट्रक मोटार गाड्या आत येऊ शकतात. सध्या विशेष उत्सव व महाशिवरात्रीच्या दिवशी हे दार उघडे ठेवण्यात येते. नंदिकेश्वराची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच नजरेत भरते. ८×८×२ उंच चौथऱ्यावर याची स्थापना केली आहे. या मूर्तीची उंची अंदाजे २।। ते ३ फूट असून लांबी ४ फूट आहे. ही मूर्ती अखंड दगडाची आहे. त्याच्यावर छत असून त्यावरच नगारखाना आहे. नंदिकेश्वराच्या समोर दीप उजळण्यासाठी सहा फूट उंचीचे दोन खांब आहेत. त्रिपूरी पौर्णिमेला यावर दीप लावण्यात येतात. पूर्वी नंदिकेश्वराच्या मागे मोठा चौथरा होता व त्यावर उंच दीप स्तंभ होता. आज याची सुतराम कल्पना कोणाला येणार नाही.

नंदी पासून शिवलिंगाची मूर्ती अंदाजे साठ ते सत्तर फूट अंतरावर आहे. नंदीचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या पायऱ्या चढून मंडपात जावे लागते. हे सभामंडप अंदाजे ४०x४० x ३ उंचावर असून त्याजवरील छत व आतिल खांब यावर कोरीव काम केलेले आहे. या मंडपाच्या दक्षिणेकडील बाजूला पश्चिमेकडील कोपऱ्यात पाच फूट उंचीची श्री गजाननाची भव्य दगडी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव आहे. गजाननाच्या दर्शनानंतर गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराची उंची चार फूट असल्याने वाकून म्हणजे नम्र होऊनच आत जावे लगते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या कोनाड्यात अनुक्रमे छोटी गजानन मूर्ती व छोटी विष्णु देवतेची मूर्ती आहे. प्रवेश द्वारातून चार पायऱ्या उतरुन खाली जावे लागते. शिवलिंग खोलगट अशा गर्भगृहात आहे.

शिवलिंगाची उंची चटकन नजरेत भरते. एवढ्या मोठ्या आकाराचे शिवलिंग महाराष्ट्रात अन्यत्र पाहावयास मिळत नाही. याची उंची सुमारे ४-३ असून घेर १२ आहे. गर्भगृहात जाऊन शिवलिंगाची पूजा, त्याला स्पर्श करुन नमन इत्यादी करण्यास सर्वांना मुभा आहे. मंदिर पहाटे ५.३० वाजता लोकांसाठी खुले केले जाते. दुपारी १२ ते ३ मंदिर बंद असते. पुन्हा ३ ते रात्रो ११ वाजे पर्यंत दर्शनास खुले केले जाते.

मंदिराबद्दल विशेष माहिती :

श्री कौपीनेश्वर मंदिराचा पाया भक्कम दगडाचा आहे. साधारण ५०×५० व ३ फूट उंच अशा चौथऱ्यावर मंदिर उभे आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण तासलेल्या दगडांचे असून भक्कम आहे. या दगडी भिंती अंदाजे ४ ते ५ फूट रुंदीच्या आहेत. मंदिराची एकूण उची ५० फूटावर असावी. मदिराचे प्रमुख भाग येणे प्रमाणे. १. चौथरा व त्यावर चारी बाजूनी ३० फूट उंचीच्या भिंती. २. या भिंतीवर चारी बाजूला कोपऱ्यावर अंदाजे ५ फूट व्यासाचे कलश व कमल पुष्पे आहेत. ३. या भिंतीवर भक्कम छत आहे. ४. त्यावर भिंतीपासून सर्व बाजूनी २ ।। फूट अंतर ठेवून अष्टपैलू ५ फूट उंचीचा चौथरा आहे.. त्यावर ५ गोल कमळाच्या पाकळया व त्यामध्ये भैरव आदि देवताना बसवता येतील असे चोवीस कोनाडे आहेत तीनच कोनाड्यातून आज मूर्ती आढळतात, इतर कोनाडे रिकामे आहेत. कमळाच्या पाकळया अंदाजे ६४ आहेत. त्यावर साधारणपणे १५ व्यासाचा व १० उंचीचा गोलकार सुंदर घुमट आहे. हा घुमट मंदिराचे एक वैशिष्ठ्य आहे. घुमटावर ५ उंचीचा कळस आहे. या घुमटाच्या पश्चिमेकडील झरोक्यात ‘ओम’ची न्यूऑन लाईट चौकट आहे. ती रोज सांयकाळी लावण्यात येते. वरील अष्टपैलू चौथऱ्यापासून आतील बाजूने घुमट पोकळ आहे. त्याची उंची सुमारे २० फूट आहे. तिथे निरव शांतता आहे.

गर्भगृह साधारणपणे १९x१९ फूटांचा भाग आहे. त्यात मधोमध शिवलिंग आहे. गर्भगृहाची उंची २० फूट असून चारी कोपऱ्यात त्रिकोणाकृति छेद आहेत, त्यावर १२ फूट व्यासाचा व १० फूट खोलगट डोम आहे. हा उपड्या ठेवलेल्या कमळासारखा दिसतो. यामुळे गर्भगृहात आवाज घुमतो. या डोमाच्या मध्यभागी एक कडे लावले आहे. तेथून श्री कौपीनेश्वर महाराजांवर छत्र उभे केले आहे. अभिषेक पात्रही तिथूनच लावले जाते. गर्भगृहात दक्षिणेकडील व उत्तरेकडील भिंतीना झरोके आहेत. तिथे एक्झॉस्ट फॅन्स बसविले आहेत. त्यामुळे गर्भगृह गरम होत नाही. उत्तरेकडील कोपऱ्यात तीन छोटे शिवलिंग आहेत व त्यांच्याच वरील कोनाड्यात श्री पार्वती देवीची दगडी मूर्ती आहे.

या शिवाय देवस्थानाच्या परिसरात सहा मंदिरे आहेत तीन मोठी आहेत. उत्तरेस श्रीराम, कालिका देवी आणि श्री दत्तात्रेय व तीन लहान मंदिरे आहेत. दक्षिण मुखी मारुती, सितलादेवी आणि उत्तरेश्वर. शिवाय राममंदिरासमोरचे एक मंदिर आहे. मंदिराचे पटांगण भव्य असून शहाबाद फरश्यानी बांधून काढले आहे. पटांगणात किर्तन प्रवचन आणि अन्य कार्यक्रम घेतले जातात. शिवाय मंदिराच्या पिछाडीस मोकळी जागा आहे. तिथे सुंदर उपवन करण्याचा विचार आहे.

दैनंदिन कार्यक्रम

मंदिरात दैनंदिन कार्यक्रम नियमितपणे पार पडतात.

१. श्री कौपीननेश्वर महाराज यांची पंचामृत पूजा रोज पहाटे ४ वाजता केली जाते.

२. श्री राम मंदिरा खेरीज देवस्थानच्या परिसरातील इतर देवतांची पूजा नित्य गुरवाकडून केली जाते.

३. श्री रामाच्या पूजेसाठी स्वतंत्र पूजारी आहे. व तेथे नैवेद्य सांजआरती केली जाते.

४. रोज सकाळी ६-४० व रात्री ७-३० च्या सुमारास सनई व चौघडा वादन होत असते (याचा खर्च बाई जवेरबाई ट्रस्ट कडून केला जातो.)

५. रोज सायंकाळी ७-३० ते ८-१५ या वेळात सर्व देवळातून सांज आरती गुरवाकडून केली जाते.

६. श्री कौपीनेश्वर महाराजाना रोजचा नैवेद्य ट्रस्ट कडून असतो.

प्रासंगिक वा उत्सवादी कार्यक्रम: खालील उत्सव ट्रस्ट तर्फे दरवर्षी साजरे केले जातात.

१. श्रीराम जन्मोत्सवः हा. उत्सव चैत्र शु. १ ते चैत्र शु. ९ अखेर नऊ दिवस साजरा होतो. रोज कीर्तन व रामनवमीला जन्मोत्सव व कीर्तन असा कार्यक्रम होतो. रामनवमीला रात्री गीतरामायणाचा कार्यक्रम होतो. चैत्र शु. ११ या दिवशी प्रभू रामचंद्राची पालखी निघते.

२. श्री हनुमान जयंती: हा उत्सव दोन ठिकाणी साजरा होतो.

१. श्री कौपीनेश्वर मंदिरात. २. श्री किल्ला मारुति मंदिरात-हे मंदिर ट्रस्टच्या मालकीचे आहे. कीर्तन व पहाटेचा जन्मोत्सव कीर्तन असा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम सहा दिवस होतो.

३. श्रीमत् आद्य शंकराचार्य जयंती: व्याख्यानाचा कार्यक्रम होतो तीन दिवस व हा उत्सव साजरा केला जातो.

४. श्री गणेशोत्सवः भाद्रपद शु. ४ ते अनंत चतुर्दशी पर्यंत उत्सव साजरा होतो. भजन, व्याख्यान, प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात.

५. त्रिपुरा पौर्णिमा पूजन: दीप प्रज्वलनाचा प्रदोष काळी कार्यक्रम होतो.

६. श्री गीता जयंती: हा कार्यक्रम तीन दिवस साजरा केला जातो. व्याख्याने होतात.

७. श्री दत्त जयंती: दोन दिवस कार्यक्रम होतो. कीर्तन जन्मोत्सव साजरा होतो.

८. माघ मास: महाशिवरात्र हा दिवस अत्यंत महत्वाचा. दर्शनाला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. खूप लांबून भाविक जन येतात. अंदाजे एक लाख मंडळी दर्शन घेऊन जातात. त्या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. रात्रो १२ वाजता ट्रस्ट तर्फे विशेष पूजा होते. शिवाय सकाळी रुद्राभिषेक असतोच. सर्वांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून पटांगणात मंडप टाकून सोय करण्यात येते.. शिवाय पोलिसांची मदत घेण्यात येते. पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम गुरव स्वतःच्या खर्चाने करतात. पहिल्या दिवशी पालखी सोहळा व दुसरे दिवशी वारकरी संप्रदायाचे भजन असते.

९. होलिकापूजन: रात्री ८ च्या सुमारास ट्रस्ट तर्फे पूजन होलिका प्रज्वलन होते.

वरील कार्यक्रमाव्यतिरिक्त श्रावण मासात दर सोमवारी आणि काही वेळा इतर दिवशीही श्री कौपीनेश्वर महाराजाना भक्त मंडळी कडून फुलांच्या वाड्या भरल्या जातात. बहुत करून नवस बोललेल्या मंडळींकडून या वाड्या भरल्या जातात. सबंध मंदिर फुलांनी सुशोभीत केले जाते. खांबावर फुलांच्या माळा सोडलेल्या असतात. मंडपाच्या भोवताली फुलांची तोरणे बांधली जातात. मंदिर फारच प्रेक्षणीय असे सजविले जाते.

श्री शंकरराव बा. मठ यांनी ठाणे येथील ऐतिहासिक  श्री कौपीनेश्वर मंदिराची करुन दिलेली ही ओळख.. (2010)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..