न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. ‘करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत’. जे घडले ते भगवंताच्या इच्छेने. शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु. मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही.
न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही.
पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा पाठीवर ५० कोडे मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल. भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे. सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे. तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल. भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते.
न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.
बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.