इन्स्पेक्टर फिरोज पटेल, समतानगर पोलीस स्टेशन!” पटेलसाहेबांनी फोनची घंटी वाजताच फोन उचलला आणि नेहमीचे वाक्य फेकले. पण हा पोलीस स्टेशनला आलेला फोन होता आणि “आपण रांगेत आहात प्रतीक्षा करा” किंवा “या लाईनवरचे सर्व दूरध्वनी व्यस्त आहेत, आपण थोड्या वेळाने प्रयत्न करा’, असली गुळमुळीत वाक्य फेकून फोन बंद करता येत नव्हता. ते उत्तराची अपेक्षा करीत होते आणि उत्तर आले-
‘समतानगर झोपडपट्टी जवळच्या संडासात एक माणूस मरून पडला आहे!”
पटेलसाहेब पुढे चौकशी करणार तेवढ्यात फोन बंदच झाला. हे पण नेहमीचेच. असे फोन करणारे स्वत:चे नाव, गांव, पत्ता कधी देत नाहीत. पोलीस तपासाचे लचांड कोण मागे लावून घेणार? त्यांचेही बरोबर आहे म्हणा. या मुंबईत स्वत:चे बूड खाजवायला कोणाला फुरसत नसते तिथे दुसऱ्याचे कोण खाजवणार? पटेलसाहेब आपलेच डोके खाजवत बसले. पण नुसते डोके खाजवून काय होणार ते चालवायला पण पाहिजे ना? त्यांनी ताबडतोब वरिष्ठ निरीक्षक श्री.अशोक हिंगोले यांना फोन करून ही कुवार्ता दिली. पोलीस स्टेशनवरून अशाच कुवार्ता देण्याचे प्रसंग वारंवार येतात त्याला ते तरी काय करणार? हिंगोलेसाहेबांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी सहनिरीक्षक फटांगरे आणि उपनिरीक्षक श्री.आढाव आणि दोन हवालदार घेऊन आपली जीप समतानगरकडे दामटली.
समतानगरच्या सार्वजनिक शौचालयासमोर बरीच गर्दी जमली होती. सकाळी सकाळीच पोट साफ करायला येणारी मंडळी हातात पाण्याची डबडी घेऊन बडबड करीत होती. सार्वजनिक शौचालय म्हणजे काही फार मोठी करमणुकीची जागा नाही. नाक मुठीत धरून जायचे आणि आपला कार्यभाग उरकून शक्यतो लवकर पळायचे अशी ती जागा. पण मंडळी आज तिथे गर्दी करून होती. आणखीही लोक जमा होत होते. त्यांची आपापसातली चर्चा मात्र खुषीची नव्हती.
‘या xxx ला हीच जागा सापडली का मरायला?”
“नाहीतर काय साल्याने सकाळी सकाळीच सगळ्यांची गोची करून टाकलीय. आता आमच्यासारख्या बाया-बापड्यांनी कुठं जायचं झाड्याला?”
एक बाई तावातावाने म्हणत होती. तिचंही खरंच होतं. पुरुष माणसं हायवेलगतच्या हागनदारीत जाऊ शकत होते. पण दिवसाढवळ्या बाया माणसांचं काय?
एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून आत पडलेल्या मुडद्याबद्दल त्यांना काडीचीही आस्था नव्हती. तो खपला हे बरेच झाले असे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्टपणे जाणवत होते. म्हणजे तो नरकातच जायला हवा याबद्दल त्यांच्यात मतभेद नव्हते तर या जिवंतपणी नरकयातना भोगण्याच्या जागेत मरून पडून त्याने त्यांच्या नैमित्तिक दिनचर्येत अडथळा आणला होता याचा त्यांना संताप आलेला दिसत होता. पोलीसांच्या जीपचा आवाज ऐकू येताच ही गर्दी लगोलग पांगली. मंडळी लांबून आता पुढचा तमाशा पाहू लागली. हो फुकटची पोलीस स्टेशनची वारी कोण करणार? ते पण त्या कांता शिंदेसारख्या हलकट मवाल्यापायी?
हो, तो आत पडलेला मुडदा कांता शिंदेचा होता. तो त्याच झोपडपट्टीत राहणारा गुंड प्रवृत्तीचा इसम होता. पिणे, दादागिरी आणि मारामाऱ्या यात त्याने पदवी प्राप्त केली होती. पोलीस रजिस्टरमध्ये तशी त्याची पदवीधर म्हणून नोंदही होती. म्हणजे अगदी अधिकृत रजिस्टर्ड गुन्हेगार!
पोलीसांनी जीप उभी केली. नाकाला रुमाल लावले आणि भराभर शौचालयात शिरले. आतले दृश्य पाहून त्यांचेही काळीज चरकले. प्रवेश मार्गातच कांता पडला होता. त्याच्या सर्वांगावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जोरदार वार केलेले होते. रक्त वाहून आजूबाजूला साकळून पडले होते. भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडून त्या रक्ताने रंगल्या होत्या, तशा तर त्या आधीच पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी आणि स्थानिक कलाकारांच्या खजुराहोला लाजवतील अशा कलाकृतींनी भरलेल्या होत्याच. त्यांचा मूळ रंग ओळखणे कठीणच होते. पण रक्ताचा ताजा शिडकावा डोळ्यात भरत होता. असो, सांगायचा मुद्दा कांता महाराज त्या प्रवेश मार्गात पडले होते.
पोलीसांनी भराभर फोटो काढले. मापे-बिपे घेतली. पंचनामा केला. प्रेताची ओळख पटवण्याचा प्रश्नच नव्हता. कांता त्यांच्या परिचयाचा होता. दाखलेबाज होता. सगळे सोपस्कार भराभर आटोपून त्यांनी प्रेत शवचिकित्सेसाठी पाठवले. सकाळी सकाळीच अशा जागी जावे लागले म्हणून मनातल्या मनात त्यांनी कांताला शिव्यांची लाखोली वाहिली, मृतात्म्याची क्षमा मागून. पण काय करणार? त्यांना लोक अशाच कार्याचं आवतण देणार. सनई चौघडा ऐकायच्या ऐवजी करुण हंबरडा फोडलेला ऐकणे हा त्यांचा नित्याचा कार्यभाग होता.
बॉडी रवाना करून त्यांनी आपला मोर्चा आसपासच्या वस्तीकडे वळवला. फुकटात तमाशा पाहणारे आता ताटात पैसे टाकावे लागतील म्हणून हळूच काढता पाय घेऊ लागले. तरीही काही लोकांना गाठून पटेलसाहेबांनी चौकशी केलीच. पण कुणीही काही बोलायला तयार दिसेना. तसा तर कांता हा कोणी महात्मा नव्हता तर त्याच्याबद्दल काही बोलावे. उलट त्याच्याबद्दल बोललो तर आपल्यालाही त्याच्या मरणोत्तर पोलीस स्टेशनची वारी घडायची या भीतीपोटी तोंड न उघडणे ही सर्वांची एकमेव पॉलिसी दिसली. पटेलसाहेबांनी तो नाद सोडला. सीधे उंगलीसे घी निकलता नही तो टेढी उंगलीसे निकालो हे त्यांना माहीत होते. त्यांनी आपला मुक्काम हलवून पोलीस स्टेशन गाठले आणि चार साध्या वेषातल्या हवालदारांना कांताचा कालचा दिनक्रम काय होता, त्याला कोण कोण भेटले, तो कुठे कुठे गेला होता वगैरे तपास करायला पाठवले. कांतासारख्या गुंड, मवाल्याचे शेवटी हेच व्हायचे हे जरी खरे होते तरी पोलीसांना तेवढ्यावरच थांबता येत नव्हते. खून हा जबरी गुन्हा होता आणि त्याचा तपास करणे, मग तो गुंडाचा का असेना, त्यांना भागच होते. चौकशी करणाऱ्या वर्दीमधल्या माणसाला लोक बिचकतात आणि बोलत नाहीत म्हणून अशा वेळी साध्या वेषातील माणसं पेरावी लागतात. त्यांना हवी ती माहिती कशी काढायची याचे प्रशिक्षण, अनुभव असतो. त्या माणसांनी तशी माहिती काढली, खून झाला त्याच दिवशी सकाळी कांता तुरुंगातून सुटला होता आणि त्याच्या मित्राकडे, त्याच्या घरासमोरच राहणाऱ्या महादेव पुजारीकडे तो गेला होता हे त्यांना समजले. एवढी माहिती हाती लागताच पुढचा तपास त्यांनी झपाट्याने केला. त्यातून गुन्हा कसा घडला ते पाहू.
कांता शिंदे बोरीवलीच्या एका बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात काम करीत होता. तिथे महिला कामगारही भरपूर होत्या. त्यातच होती सुमित्रा गाडे. काळी सावळी पण गोड हसणारी. गालावर खळी पडणारी. ती कांताला भावली. कांता छानछोकीचा शौकीन होता. पांढरेशुभ्र कपडे घालायचा. तेल लावून चापूनचोपून केस फिरवायचा. सेंट-बीट वापरायचा. ऐषआरामी वृत्तीचा. साध्याभोळ्या सुमित्रावर त्याने चांगलेच इंप्रेशन मारले. तशी ती त्याच्याच वस्तीत राहत होती. कांता जरी तिथे नवीन होता तरी त्याच्या घरासमोरच राहणारा महादेवपुजारी हा त्या वस्तीतच लहानाचा मोठा झाला होता. तो कांताचा दोस्त होता आणि महादेव सुमित्राला लहानपणापासून ओळखत होता. दोघेही लहानपणी एकत्र खेळले होते. महादेवच्या मध्यस्थीने त्याने सुमित्राशी सूत जमवले. दोघेही एकाच कारखान्यात कामाला होते. सुमित्राच्या आईलाही मुलगा पसंत होता, अडचण एकच होती. कांता एका मित्राकडे राहत होता. त्याचे आईवडील गावी होते. त्याला स्वतंत्र खोली नव्हती. पण सुमित्राच्या आईकडे दोन खोल्या होत्या. पोरीचे जमते आहे या विचाराने तिने एक खोली कांताला देण्याचे ठरवले. घरजावईच म्हणा ना! कांताचे आणि सुमित्राचे लग्न बिनबोभाट पार पडले.
आता कांताकडे दोघांच्या पगाराचा पैसा येऊ लागला. आधीच तो शौकीन, यात हातात पैसा खेळू लागताच त्याचे रंगढंग वाढले. चैनीला पैसा कमी पडू लागला. आपला जावई भला या समजुतीखाली असणारी सुमित्राची आई आनंदात होती. सुमित्रा पण देखणा नवरा मिळाला म्हणून खूष होती. पण या त्याच्या रंगरुपा आड दडलेला सैतान हळूहळू दात दाखवू लागला. त्याचे पिणे अतोनात वाढले. रोज रात्री बेसुमार ढोसून यायचे आणि अर्वाच्य शिवीगाळ करायची. सुमित्राकडून पैशाची मागणी करायची आणि दिले नाही तर तिला बदडायचे. हा त्याचा नित्यक्रम झाला. पुढे पुढे तर अगदी रोजचा रतीब घालावा तशी तो सुमित्राची कणीक तिंबून काढू लागला. महादेव पुजारी समोरच राहत होता. त्याने कांताला खूप समजवायचा प्रयत्न केला. मधे पडून सुमित्राचा मार वाचवण्याचा प्रयत्न करायचा. पण त्यालाच शिव्या ऐकून घ्याव्या लागायच्या. एवढेच नाही तर मारही खावा लागे. आधीच अंगापिंडांनी मजबूत असणारा कांता दारूच्या नशेत अनिवार व्हायचा. त्याचा अवतार पाहून महादेव पण घाबरायचा. तिथे बिचारी सुमित्रा काय करणार? सुरुवाती सुरुवातीला सुमित्राची आई मध्ये पडायची पण तो आता कोणालाही जुमानीनासा झाला होता. त्याचा आरडाओरडा आणि अर्वाच्य शिवीगाळ आणि रोजचा तमाशा याला सगळे कंटाळले. शेवटी सासूबाईंनी त्यांची जोगेश्वरीला एक खोली होती तिकडे दोघांची रवानगी केली. दृष्टी आड सृष्टी. पोरीचा कळवळा येत होता पण कमीत कमी डोळ्यासमोर होणारी हाणामारी तरी टळेल आणि वेगळे स्वतंत्र राहिले तर थोडी जबाबदारीची जाणीव होईल असा त्या माऊलीने विचार केला. छातीवर दगड ठेवून पोरीची पाठवणी केली.
जागा बदलली पण कांताची नियत काही बदलली नाही. उलट आता सासूची आडकाठी नव्हती आणि महादेवही धावून येणार नव्हता. त्यामुळे कांताने आपले दे दणादणचे प्रयोग दुप्पट उत्साहाने सुरु केले. दोघांचेही पगार व्यसनापाई पुरेना तसे कांताने कारखान्यातच चोऱ्या सुरु केल्या आणि लवकरच रंगेहाथ सापडला. गुन्हा दाखल झाला. तीन महिने तुरुंगात गेला. तुरुंगातून सुटून आला, पण काही शहाणपणा आला नाही. मुजोरी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चालली. नोकरी तर गेलीच. सुमित्राकडून मिळणारे पैसे कमी पडू लागले. सुमित्राला नोकरीवरून यायला उशीर व्हायचा. तोपर्यंत वेळ कसा काढायचा? मग तो जवळच राहणाऱ्या बहिणीच्या घरी जाऊ लागला. तिचे लग्न झाले होते. दोन मुले होती. नवरा सज्जन होता. तिच्या घरी टीव्ही होता. रात्री उशिरापर्यंत तो तिच्याकडेच बसू लागला. मुलांना गोळ्या, चॉकलेट देऊन त्यांची मर्जी सांभाळून होता. बहिणीच्या नवऱ्याला मात्र ही ब्याद रोजची येऊ नये असे वाटे. बहिणीला पण या दिवट्या भाऊरायांचे प्रताप माहीत होते, पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती झाली तिची.
दारूला पैसा कमी पडू लागला तशी कांताची चोरटी नजर बहिणीच्या घरातील वस्तूंवर फिरू लागली. महादेव नवा टीव्ही घ्यायचा म्हणत होता. त्याने बहिणीच्या घरचा टीव्ही संधीसाधून उचलला आणि महादेवलाचार हजार रुपयांना विकून टाकला. बहीण घरी आली तर मुलगा रडत बसला होता.
“काय रे काय झालं रडायला?”
“आई, आपला टीव्ही चोरला कुणीतरी!”
‘काय? टीव्ही चोरला?” तिचे लक्ष टीव्ही च्या टेबलाकडे गेले आणि
तिचे डोळे विस्फारले. टेबलावरून टीव्ही गायब!
‘अरे तू तर घरातच होतास ना? मग तुझ्या समोर चोरी झालीच कशी?”
‘आई, मामा आला होता. मला शाळेच्या वह्या आणायच्या होत्या. शाखेवर मुलांना वह्या वाटत होते म्हणून मी मामाला सांगून तिकडे गेलो तर इकडे मामाही गायब आणि टीव्ही पण गेला होता!”
बहिणीने ओळखले की हा आपल्या दिवट्या भावाचाच उद्योग. आता
नवरा घरी आल्यावर त्याची बोलणी खावी लागणार! आपल्या सुखाच्या संसारावर या दुष्टाची सावली पडणार की काय या शंकेने ती सैरभैर झाली. त्याच भरात ती तडक पोलीस स्टेशनवर गेली आणि तिने कांताविरुद्ध टीही चोरीची तक्रारच दाखल केली. पोलीसांनी कांताला अटक केली आणि त्याचे पूर्व चारित्र्य माहीत असल्यामुळे त्याचा यथास्थित पाहुणचार केला. तशी त्याने टीव्ही महादेवला विकल्याची कबुली दिली. पोलीसांनी महादेवच्या घरी जाऊन चोरीचा माल म्हणून टीव्ही जप्त केला आणि कांताची रवानगी पुन्हा तुरुंगात केली. यथावकाश तो सुटून आला. आता तर तो चांगलाच निर्दावला होता.
महादेवने त्याला गाठले आणि आपले चार हजार रुपये तो मागू लागला. कांताने आज देतो, उद्या देतो म्हणून त्याला टाळायचा प्रयत्न चालवला. पण महादेव त्याच्या मागे जणू हात धुवूनच लागला. याला कसा टाळायचा याचा कांता विचार करू लागला आणि त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो सुमित्राला मारहाण करी तेव्हा महादेव मध्ये पडत असे. शिवाय तो तिला लहानपणापासून ओळखत होता या गोष्टीचा फायदा घेऊन त्याने महादेवचे आणि सुमित्राचे अनैतिक संबंध आहेत अशी बडबड सुरु केली. रात्री पिऊन यायचे आणि महादेवच्या घरासमोर येऊन त्याला अर्वाच्य शिव्या द्यायच्या. “माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवतोस, आता तुला जिता सोडणार नाही”, वगैरे भाषा सुरु केली. महादेवला तर भीक नको, कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली. आपला बाण बरोबर लागू पडतोय हे पाहून कांता समतानगरमध्ये येऊन महादेवचा काटा काढीन अशी भाषा करू लागला.
महादेव मनातून खूप घाबरला. हा माथेफिरू माणूस एखादे दिवशी खरोखरच आपला मुडदा पाडायला कमी करणार नाही अशी जबरदस्त भीती त्याला वाटू लागली. कांताला पुन्हा एकदा घरफोडीच्या प्रकरणात तुरुंगवास झाला. महादेवला हायसे झाले. रोज रात्री त्याच्या घरासमोर येऊन दारूने झिंगलेला कांता त्याच्या आणि सुमित्राच्या तथाकथित संबंधांवरून वाट्टेल ते बरळत असे. अलीकडे तो जवळ सुराही बाळगत असे. तो तुरुंगात गेला आणि ही रोजची कटकट संपली पण सुटून आल्यावर काय? हा माथेफिरू माणूस आपला जीव घ्यायला कमी करणार नाही. विचार करून महादेवच्या डोक्याचा भुगा झाला.
महादेवचा संगणकाच्या रिफील बनवण्याचा उद्योग होता. या उद्योगात काही छोटी मोठी वरकड कामे करण्यासाठी त्याला परमेश साळुके मदत करी. परमेश कंत्राटी सफाई कामगार होता. दोघेही अविवाहित होते. आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. महादेवला कधी मधी प्यायची हुक्की यायची. तेव्हा परमेश त्याच्या बरोबर जात असे. असेच एके दिवशी ते दोघे पीत बसले होते.
“काय महादेवशेट अलीकडे फार काळजीत दिसता. मलाही फारसे काम मिळत नाही. काय धंदा चालत नाही काय?’
“परमेश, तुला ठाऊक आहे. कांता माझ्याशी दुश्मनी करतो. त्याचे लग्न जमविण्यासाठी मी प्रयत्न केले. सुमित्रासारखी चांगली बायको त्याला मिळाली. दोघांचीही चांगली नोकरी होती. पण ही दोस्ती विसरून तो माझ्यावर काय काय घाणेरडे आरोप करतो. मला जिवे मारण्याची धमकी देतो. आता तो तुरुंगात आहे पण सुटून आल्यावर पुन्हा तमाशा सुरु करील. घरी माझी आई आणि लग्नाची बहीण आहे. त्यांच्यासमोर तो वाट्टेल ते घाण घाण बोलतो. काय करावे काही सुचत नाही. विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली आहे; मग धंद्यात कसं लक्ष लागायचं?”
“महादेवशेट एक सांगू?”
“काय?”
“त्याने तुमचा अपमान केला. चारचौघात अब्रू घेतोय. तुमचा काटा काढायची भाषा करतो आणि तुम्ही थंडपणे सगळे सहन करता?”
“काय सांगू परमेश? अरे तो सडा फटिंग आहे. माझ्यावर माझी आई आणि बहीण अवलंबून आहेत. बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आहे. मला त्या xxx सारखं नाही वागता येत.”
“ते खरंच आहे. पण महादेवशेट, शेवटी आपली पण काही इज्जत आहेच की नाही? शिवाय प्राणावर बेतलं म्हणजे मांजरही अंगावर येतं. इथं तर तो xxx रोज तुम्हाला जिवे मारण्याची धमकी देतो, मग त्यानं तुमचाच गेम केला तर कोण घेणार तुमची जबाबदारी?”
“ते पण खरंच. पण मग काय करावं म्हणतोस मी?”
“हे पहा महादेवशेट, वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो. त्यापेक्षा मला वाटते, पहा बुवा मी सांगतो ते पटते का, तर सांगतो.” असे म्हणून परमेशने दोघांचे ग्लास पुन्हा भरले. दोन पेग रिचवले होते. दारूचा अंमल सुरु झाला होता.
“हा हा सांग. अगदी बिनधास्तपणे बोल.”
“महादेवशेट, कांताने तुमचा गेम करण्याआधी तुम्हीच त्याचा गेम केला तर?”
“काय?” महादेव ओरडला. दारूचा अंमल चढला होता पण अजून पुरती चढली नव्हती.
‘अरे काय बोलतोस काय तू परमेश? त्याचा गेम करू?”
“हे पहा शेट, तुम्ही नाही केलात तरी तो काही तुम्हाला सोडायचा नाही. या बायकांच्या लफड्यात एकदा अडकला ना का ब्रह्मदेव पण तुमची सुटका करू शकणार नाही.”
“अरे परमेश, तू शुद्धीवर आहेस ना? सुमित्रा माझी बालमैत्रीण आहे. मला भाऊ मानते. तिच्याबद्दल मी वाईट विचार कधी तरी करेन का?”
“शेट, हे मला पटते. पण रोज रात्री बोंब मारत तो कात्या फिरतो. लोकांना काय खरं-खोटं कळत नाही. तुम्ही गप्प बसता तेव्हा त्यांना वाटत असणार की ह्यात काहीतरी पाणी मुरतंय. नाही तर हा गप्प कसा बसतो?”
आता तिसरा पेगही संपत आला तसा महादेवचा तिसरा डोळा उघडायला सुरुवात झाली. त्याच्या अस्मितेलाच हात घातला परमेशनं. त्याच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. त्यानं टेबलावर मूठ आपटली.
“हां परमेश, तू म्हणतोस तेच खरं आहे. त्या xxx ला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. करशील?”
‘हां हां महादेवशेट, तुम्ही फक्त सांगा, पुढचे मी बघतो.”
“नाही नाही त्या साल्याला मीच संपवीन. ऐक माझी एक योजना सांगतो तुला.
त्याची योजना म्हणजे कांताचा काटा काढणे. सुडाने पेटलेल्या आणि मुळातच अशा गुन्हेगारी मार्गाला न जाणाऱ्या त्याच्या बुद्धीला फक्त सरळसोट मार्ग दिसला. पुढे काय होणार? हा गुन्हा कसा लपवायचा याचे नियोजन करण्याइतकी त्याची बुद्धी परिपक्व नव्हती. एक फक्त सूड! सुडाने त्याची बुद्धी भ्रष्टच झाली.
“परमेश, दोन दिवसांनी कांता तुरुंगातून सुटून येईल. आल्या आल्या तो पुन्हा पूर्वीचा तमाशा सुरु करेल. तू त्याला तुरुंगाच्या दारासमोरच गाठ. आज महादेवचा वाढदिवस आहे आणि आज तो पार्टी देणार आहे असे त्याला सांग. तसेच चार हजार रूपये तो आता विसरून गेला आणि पुन्हा दोस्ती करायची म्हणतोय असं त्याला सांग.”
“ठीक आहे. पण पुढं काय?”
“रात्री त्याला खूप पाजू. उशिरा गुत्याच्या बाहेर पडू. तू त्याला पोट साफ करायला जवळच्याच शौचालयात घेऊन जा. त्यावेळी तिथे कोणी नसेल. पुढचे मी पाहतो काय करायचे ते.”
“काय करणार तुम्ही?”
“ते आता नाही सांगत. तू तेव्हा पाहशीलच.’
“ठीक आहे, करतो मी सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे. त्यांची योजना ठरली. दोन दिवसांनी कांता सुटला. तेव्हा परमेश त्याला तुरुंगाच्या दारासमोरच भेटला.
‘काय कांता कसा आहेस?” परमेशने विचारले. परमेशसारख्या फालतू | माणसाने आपल्याशी सलगी दाखवावी याचा कांताला राग आला. तो तर आता तुरुंगाच्या वाऱ्या करून दादाभाई पदाकडे वाटचाल करू पाहणारा झाला होता. त्याने परमेशकडे दुर्लक्ष केले. पण परमेश पुढे जे बोलला त्याने त्याची कळी खुलली.
“कांताभाई, महादेवचा निरोप द्यायला आलोय मी.” ‘भाई’ या शब्दाने जादू केली.
“काय निरोप आहे त्याचा?”
“कांताभाई, आज त्याचा वाढदिवस आहे. तुम्ही त्याचे जुने मित्र. सगळी दुश्मनी आज ते विसरणार आहेत. तुमचे चार हजार पण त्यांनी माफ केले आहेत. आज ते पार्टी देणार आहेत तुम्हाला. मग काय याल ना?”
‘पार्टी’ हे शब्द नुसते ऐकले आणि कांताला तर अगदी आंधळा मागतो एक डोळा असंच झालं. इतके दिवस तुरुंगात उपास घडला होता. आता उपास सोडायची ही संधी तो काय सोडतो काय?
“पार्टी देणार? कुठे?”
“आपल्या नेहमीच्या ठिकाणी. रात्री आठ वाजता.’
‘हो हो येईन ना. नक्की येईन.’ कांता खुशीने म्हणाला.
रात्री ठीक आठ वाजता तिघे त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये भेटले.महादेवने यार दोस्तीच्या गप्पा करून कांताला मटन बिर्यानी खिलवली. जोडीला दारू होतीच. कांता तर आधाशासारखा तुटूनच पडला त्या पार्टीवर. गप्पा रंगल्या. तीनचार ग्लास रिचवल्यावर कांताचे विमान हवेत तरंगू लागले. आता त्याला मुक्कामावर पोहोचवायची वेळ झाली असे महादेवला वाटले. गप्पागोष्टीमध्ये आणि पिण्यामध्ये रात्रीचे बारा वाजत आले. आता आटोपले पाहिजे नाहीतर हे विमान आपल्याला उचलूनच न्यावे लागेल असा विचार करून महादेवने पार्टी आटोपली. पैसे देऊन तिघेही बाहेर पडले. कांता जेमतेम पावलं टाकण्याएवढ्या अवस्थेत होता.
“कांताशेट, चला जरा पोट साफ करून घेऊ म्हणजे घरी गेल्यावर ताणून द्यायला बरे.” परमेश म्हणाला. हॉटेल सार्वजनिक शौचालयाच्या जवळच होते.
“परमेश तू कांताभाईंना सांभाळून घेऊन जा. मी येतोच मागोमाग.”
‘तुम्ही कुठे जाताय महादेवशेट?” परमेशला कात्याला शौचालयात नेण्याचे काम करायचे ही योजना ठाऊक होती पण पुढे त्याला एकट्यालाच जावे लागेल याची कल्पना नव्हती. पुढे काय करायचे ते त्याला ठाऊक नव्हते. म्हणून त्याने प्रश्न केला, महादेवने त्याला डोळा मारला.
“अरे हॉटेलमध्ये माझी पिशवी राहिली ती घेऊन येतोच मी. त्यात माझेसामान आहे.” असे म्हणून कात्याचे लक्ष नाही असे पाहून त्याने गळ्यावर आडवा हात मारल्याचीखूण केली. परमेश समजला काय ते! त्याने कात्यालाधरून शौचालयाकडे मोर्चा वळवला. इतक्या रात्री तिकडे कोणीच नव्हते. त्याने कात्याला धरून एक एक पायरी करून त्याला कसेबसे आत नेले. हायवेवरच्या दिव्याचा थोडा फार प्रकाश येत होता. त्यावरून अंदाजानेच आतला भाग दिसत होता. दोघे आत शिरतात तोच बाहेरच लपवून ठेवलेला चॉपर घेऊन महादेव आला. परमेश त्याचा आवेश पाहून झटकन बाजूला झाला. महादेवने कात्याच्या अंगावर सपासप वार केले. सतरा वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कात्याच्या तोंडून भयाने बोबडी बसल्यामुळे एक शब्दही फुटला नाही. तो तात्काळ आडवा झाला. महादेवने त्याला दोनचार लाथा घातल्या. त्याच्या अंगावर धुंकला. परमेशचा हात पकडून तो बाहेर पडला. दोध हायवेवर आले. गार वारा लागताच त्यांचा उन्माद कमी होऊ लागला आणि वास्तवाची जाणीव झाली. मुळात ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. पण आपल्या हातून असे काही होईल हे त्यांना खरेच वाटत नव्हते. हातातला रक्ताळलेला चॉपर महादेवने हायवे लगतच्या सांडपाण्याच्या नाल्यात फेकला आणि दोघे आपापल्या घरी गेले. रक्ताळलेले कपडे बदलून झोपले. सकाळी बाहेर लोकांचा आरडाओरडा ऐकून त्यांना जाग आली. थोड्या वेळाने पोलीसही आले. कांताची बॉडी सापडल्याची वार्ता अख्ख्या वस्तीत पोहोचली. त्यांना गुन्हा करताना कोणीही पाहिले नव्हते. म्हणून दोघेही निर्धित होते. पोलीसांनी वस्तीभर चौकशी केली पण काहीच माहिती मिळाली नाही हे पण त्यांना समजले. आता हे चौकशीचे सत्र संपूस्तवर इथून काही दिवस गायब होण्याचे दोघांनीठवले. दोघांच्याही घरी त्यांना विचारणारे तसे कोणी नव्हतेच. महादेवनेहीधंद्याच्या कामासाठी बाहेरगावी जातो म्हणून सांगितले. परमेश दोनचार कपडे भरून आपली पिशवी घेऊन महादेवच्या घरी आला. महादेव पण तयार होताच. त्यांनी पिशव्या घेतल्या आणि निघायच्या तयारीत होते तोच दारावर थाप पडली.
परमेशने घाबरतच कडी काढली. बाहेर साध्या वेशातला पोलीस होता. त्याला वाटले, असेल कोणीतरी.
“महादेव पुजारी इथेच राहतात का?”
“हो. पण ते आता घरी नाहीत. संध्याकाळी येतील. तुम्ही रात्री या.
परमेशने त्याला कटवायच्या उद्देशाने ठोकून दिले. पण त्या माणसाने परमेशच्याच मुस्कटात एक ठोकून दिली आणि त्याला धक्का मारून तो आतच शिरला. त्याच्या मागोमाग आणखी चारजण घुसले आणि दोघांना काही कळायच्या आतच त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. त्यांचा कबुलीजबाब घेणे पोलीसांना काही अवघड गेले नाही. जाबजबाब पुराव्यांसह त्यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्या पासून सावध असावे असे नीती तत्त्व सांगते. पण प्रत्येक गुन्ह्यामागे ते दडलेले असतात. चांगल्या भल्या माणसांनाही ते कधी आणि कसे गाठतील सांगता येत नाही.
…. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्रोधः पापस्य कारणम्।’
— विनायक अत्रे
Leave a Reply