आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. विभक्त कुटुंब पद्धत प्रचलित असताना ,प्रतिमा कुलकर्णी यांनी देशमुख कुटुंबाशी परिचय करून दिला.. श्रीधर देशमुख यांचं हे एकत्र कुटुंब…
मुलं , सुना , नातवंड असे सगळे गुण्या गोविंदाने नांदणारे…
एकमेवर इतका जीव कि कोण कुणाचं मूल हेही कळू नये.. आई वडिलांपेक्षा काका काकू जवळचे…आजी आजोबा जणू मित्रच नातवंडांचे…एकमेकांचा खंबीर आधार, मात्र उगाच कुणाच्याही आयुष्यात लुडबुड नाही..
समुद्रकाठी असलेला ‘आश्रय’ बंगला दिसला कि रवींद्र साठेंचे स्वर कानावर पडायचे आणि मग घराच्या आत डोकावता यायचं. मालिका सुरु करण्याची हि पद्धतच मला फार आवडायची…एक आल्हाददायक वातावरण निर्माण व्हायचं..
समस्या कुठल्या कुटुंबात नसतात? मात्र समस्या सुटतात हा विश्वास, हे सुरवातीचे स्वर निर्माण करायचे.. त्यामुळे मलिका पाहताना कधीही नकारार्थी वाटलं नाही. मालिकेत ब-याच ठिकाणी पार्श्वसंगीतात केवळ तानपुऱ्याचे स्वर ऐकू येतात..सहज साधे सोपे संवाद, झोपाळ्यावर बसलेलं असतानाचे, खोलीतले किंवा वऱ्हांड्यातले..आणि मागून ऐकू येणारा तानपुरा..किती छान एकजीव व्हायचं सगळं..संवाद, संगीत, भावना, आशय …
कुटुंब मोठं असो किंवा लहान , एकमेकांशी असलेल्या संवादाच्या जोरावर त्याची वीण कायम घट्ट ठेवता येते हे देशमुख कुटुंबाने दाखवलं ..त्यासाठी समवयस्क असण्याची अट नाही.
आणि हा संवादही कसा? तर मला या बद्दल त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायला अवघड जातंय तर तुम्ही बोलाल का? एकमेकांना बोलतं करायची इच्छा त्यातून दिसते. कुणाचीही कागाळी किंवा कुरघोडी नाही .
मुळाशी भावना काय तर प्रश्न मिटला पाहिजे..एकत्र कुटुंब असताना , घरात एवढी वेगवेगळ्या स्वभावाची लोकं असताना एखाद्या प्रश्नाने जास्त काळ भेडसावत बसता कामाच नये..हा मुळात विचार म्हणूनच किती उच्च आहे.
सोयीस्कर रीत्या घर आपलं आणि गरज नसेल तेव्हा आमचं, असं न वागणारे ज्येष्ठ, कुटुंब प्रमुख म्हणून लाभले तर जगणं किती सुखकर होईल नाही! वेळप्रसंगी घरातल्या लहानांची मतं केवळ विचारात न घेता ती ऐकणे, केवळ आपण कुटुंब प्रमुख असण्याचा टेंभा न मिरवणे, या आणि अशा किती गोष्टी एकत्र येतात तेव्हा होतं खरं एकत्र कुटुंब.
घरातल्या सदस्यांची तशी एकमेकांना सवय असते.. मात्र नवीन सदस्याने त्याचे प्रॉब्लेम स्वतःच सोडवायचे कारण आम्ही असेच अहोत वर्षानुवर्षे हि मुजोर वृत्ती ठेवून एकत्र कुटुंब टिकवता येत नाही.
घरात प्रत्येकाची स्वतंत्र खोली असं म्हणजे स्पेस नसून स्पेस हि एक व्यापक संकल्पना आहे हे समजून घेणे म्हणजे एकत्र कुटुंब. घरातल्या मोठ्यांना लहानांनी आणि लहानांना मोठ्यांनी पदोपदी गृहीत न धरणे म्हणजे एकत्र कुटुंब. घरात प्रत्येकाचं कुणी ना कुणी लाडकं असतं, मात्र न्याय करण्याची वेळ येते तेव्हा लाडक्या व्यक्तीला पाठीशी न घालता त्याला योग्य ती समज देणे आणि सांभाळून घेणे म्हणजे एकत्र कुटुंब.
YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ..
२०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं.
— गौरी सचिन पावगी
Image source : google
गौरी,
तुला लेखनकला चांगली अवगत आहे, तेव्हा तू नक्की लिहीत रहा.
त्यासंबंधात https://www.youtube.com/watch?v=c1IQNeClDlA हा व्हिडिओ तू पहावास. (व्हिडिओ पहायला ७:०० मिनिटांपासून सुरवात करावीस.)
आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद ??
लिंक नक्की पाहते?