ती माझे सर्वस्व ! ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा ! ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती ! शक्तीचीही शक्ती तीच तूही !
माझा प्राण तू , माझा श्वास तू ,
माझा भास तू , अंतरीची आस तू
तू माझे जीवन , जीवन झाले पावन ,
पावन होण्या कारण , कारण माझे मन !!
मनासी देसी कामना , आत्म्यासी चेतना ,
शरीरासी वासना , तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी , जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू , मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी , दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी , रहा जवळी माझेपाशी
ही ” ती ” “ ती ” म्हणजे कोण ?
” ती ” म्हणजे प्रतिकारशक्ती ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त , त्यांना औषधांची गरज रहात नाही .
ही प्रतिकार क्षमता येते कुठून ?
अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे . जसे वंश , जात , धर्म , प्रदेश , आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी , शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे , न पाळणे , लहानपणापासून व्यायाम करणे , न करणे इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते .
आईने गर्भावस्थेत कोणता आहार घेतला आहे यावर बाळाची प्रकृती ठरत असते . याला मातृप्रकृती म्हणतात . बाळाची प्रतिकारशक्ती चांगली व्हावी यासाठी आईने बाळाच्या जन्मापूर्वीपासून काळजी घेणे आवश्यक असते . याला व्यवहारात गर्भसंस्कार म्हणतात . हा खूप मोठा विषय आहे . यावर परदेशात देखील संशोधन झालेले आहे , होत आहे . पण प्रतिकारशक्तीचा विषय येतो तेव्हा हा विषय दुर्लक्ष करून चालत नाही . जन्म झाल्यावर नवजात बालकाची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या काही क्रियांचा आता विचार करूया .
सुवर्ण प्राशन किंवा सुवर्ण लेहन
हा तर जातकर्मातील पहिला संस्कार आहे . आईचे स्तन्य देण्या अगोदर सुवर्णलेहन चाटवावे असे ग्रंथात लिहिले आहे . हा संस्कार जन्म घेतल्यावर लगेचच करायचा असतो . पुष्य नक्षत्र हे या संस्कारासाठी योग्य असते . पण आता कुणी विशेष रूपाने हा संस्कार करत नाही . त्यामुळेच मुलांची प्रतिकारशक्ती कमी झालेली दिसते . सोने हे शरीरातील विष ओढून घेणारे औषध सांगितलेले आहे .
मूल आईच्या पोटात असताना आईने जे जे नको ते खाल्लेले असते , त्याचे परिणाम बाळावर होऊ नयेत म्हणून हा सुवर्ण लेहन संस्कार करायचा असतो . सोने पाण्यात उकळून किंवा सहाणेवर उगाळून मधातून बाळाच्या तोंडात भरवावे . या विषयावर माझे ‘दामले उवाच ‘ हे युट्यूब चॅनेल पाहावे . त्यात सुवर्ण लेहन संस्कार या विषयी पाच विधी सांगितलेले आहेत त्यातील कोणताही प्रकार या संस्कारासाठी वापरावा . हा संस्कार फक्त पुष्य नक्षत्राला करायचा असतो असे नाही तर दररोज केला तरी चालतो . या संस्कारामुळे बालकाची शारीरिक , मानसिक , बौद्धिक अशी सर्वांगीण प्रगती होते . केवळ मुलांसाठी सुवर्ण लेहन करावे असे नाही तर तरुण व ज्येष्ठ नागरिक यांनीही हे औषध जरूर घ्यावे.
स्तन्यपान
बाळाची प्रगती आणि वाढ ही दोन गोष्टींवर होते . एक , आईचे दूध आणि दुसरे , केले जाणारे मालिश . जेवढे शक्य आहे तेवढे दिवस आईने बाळाला आपले दूध द्यावे . याने बाळाची शक्ती वाढत असते . हे दूध द्यायचे दोन – तीन फायदे …
१. तापवावे लागत नाही .
२. केव्हाही बाळाला देता येते .
३. नासत नाही .
४. भेसळ केली जाऊ शकत नाही .
५. शुद्ध करायची आवश्यकता नाही .
आईचे नैसर्गिक भावनेमध्ये ममत्व असल्याने बाळाच्या पोषणासाठी आवश्यक ते सर्व घटक आईकडून बाळाकडे आपोआप स्रवत असतात . यामुळेच बाळाची प्रतिकारशक्ती वाढत असते .
अन्नपान
प्रतिकारशक्ती वाढवायला बाळाला सहावा महिना लागला की पूर्ण जेवण देणे सुरू करावे . या वयात दात आलेले असतात . त्यांना चावायला काहीतरी घट्ट हवे असते . एक सार्वजनिक कार्यक्रम करावा . चांगले कपडे घालावेत . शेजारी पाजारी बोलवावेत . त्यांना खाऊ द्यावा . मामाला मामीसह बोलवावे . येताना चांदीची वाटी आणण्यास सांगावे . त्यांच्या हातून आपल्या बाळाला वरण भात भरवावा . मामाचा मान करावा . फोटो काढावेत . whatsapp वर टाकावेत .
बाळाची वाढ जशी होत जाईल तशी बाळाची भूक वाढत जाते . त्या त्या वेळी त्याला जे आवडते ते खायला द्यावे . दिवसातून तीन वेळा , चार वेळा खाल्ले तरी चालते . हळूहळू आहार वाढवावा . त्यात वरण, भात , तूप हे पदार्थ , विशेष गोड पदार्थ जसे खीर , शिरा , हे जास्ती द्यावेत . पण या पदार्थांनी बाळाला अजीर्ण होणार नाही याची काळजी घ्यावी . नाही तर फायदा होण्यापेक्षा त्रासच जास्ती व्हायचा . साखरेऐवजी खडीसाखर वापरावी किंवा गूळ वापरावा .
अभ्यंग आणि स्नान
बाळाची शक्ती वाढावी यासाठी बाळाला नियमितपणे सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा तेलाचे मालिश करावे आणि गरम पाण्याने स्नान घालावे . मात्र बाहेरील वारा लागू नये यासाठी लगेच बाळाला उबदार वस्त्रात गुंडाळून ठेवावे . बाळ तब्बल आठ वर्षाचे होईपर्यंत त्याला तेल मालिश सुरू ठेवावे . हे मालिश जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत त्याला काहीही त्रास होत नाही आणि जसे हे मालिश बंद होते तसे बाळाला डॉक्टरकडे नेणे सुरू होते असे व्यवहारात दिसते
पंचामृत
बाळाची वाढ आणखी चांगली होण्यासाठी त्याला रोज सकाळी पंचामृत द्यावे . दूध , दही, तूप ,
मध आणि साखर हे सर्व सम प्रमाणात एकत्र करून लगेचच भरवावे . नाही तर जरा वेळ गेला तर ते पंचामृत नासते .
बाळाला कोणतीही औषधे न देणे हे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे . स्वतः ठरवून कोणतीही औषधे बाळाला देऊ नयेत . निसर्गाने जे ठरवून दिलेले नियम आहेत ते ओळखावेत . आणि त्याला आपोआप वाढू द्यावे . निसर्गातील कोणत्या प्राण्यांना tonic द्यावे लागते ? किंवा काही औषधांची गरज पडते ? त्याची भूक त्याला ओळखता आली पाहिजे एवढे पोट रिकामे ठेवणे ; तहान ओळखून पाणी पिणे ज्याला कळले त्याची प्रतिकारशक्ती वाढलीच म्हणून समजा .
वैद्य सुविनय दामले
आयुर्वेद चिकित्सालय ,
कुडाळ , सिंधुदुर्ग
९४२११४७४२०
Leave a Reply