सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपटे रोडवरील श्रेयस हाॅटेल समोरील एका आलिशान हाॅटेलच्या तळमजल्यावर, विविध आणि दुर्मिळ पेनांचं प्रदर्शन भरलेलं होतं. ते पाहण्यासाठी, माझे एक रसिक मित्र आपल्या पत्नीसह तिथे गेले.
त्या दालनात प्रवेश केल्याबरोबर ज्यानं हे प्रदर्शन आयोजित केलं होतं तो गृहस्थ माझ्या मित्राच्या खिशाला अडकवलेल्या पेनाकडे पहातच राहिले. त्याने मित्राला विचारले, ‘सर, आपल्या खिशाला अडकवलेल्या पेनाची आजची किंमत आपल्याला माहिती आहे का?’ मित्राने उत्तर दिले, ‘नाही, मात्र आपण हा प्रश्न मला का विचारता आहात?’ त्यावर त्याने सांगितले की, ‘या पेनाची आजची किंमत आहे.. ‘चाळीस हजार रुपये!’ तो तुम्ही हरवलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं, तो जपून ठेवा.’ मित्राने प्रदर्शन पाहिलं आणि घरी गेल्या गेल्या त्या पेनातील शाई काढून, तो स्वच्छ केला. नंतर कोरडा करुन त्याच्या ओरिजनल बाॅक्समध्ये पॅकबंद केल्यावर, कपाटाच्या लाॅकरमध्ये तो ठेवून दिला.
पेन सुरक्षित ठेवल्यावर, तो मित्र आरामखुर्चीत विसावला.. तेव्हा, ते पेन ज्या व्यक्तीने त्याला भेट दिलं, तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला…
तो क्षणार्धात, १९७२ सालात जाऊन पोहोचला.. त्याच्या वडिलांचा चित्रपटांची बॅनर करण्याचा ‘समर्थ आर्टस’ या नावाने व्यवसाय होता. हा घरातील थोरला. लहानपणापासून याची चित्रकला व अक्षरलेखन सुंदर. त्यामुळे वडील, त्यांनी केलेल्या कामाची बिलं सुंदर अक्षरांत लिहायला त्याला सांगायचे. त्यांनी नुकतीच ‘अमर प्रेम’ चित्रपटाची बॅनर्स केली होती. त्यांची बिलं करुन ती शक्ती फिल्म्स डिस्ट्रीब्युटर्सच्या ऑफिसमध्ये वडिलांनी त्याला पोहचवायला सांगितली. तिथे जयश्रीबाईंचा भाऊ, चंदू मामा, हा अकौंटट होता. तो आलेली बिलं वर्गवारी करण्यासाठी घरी घेऊन जायचा. ती बिलं जयश्रीबाईंनी पाहिली व चंदूमामाला हे हस्ताक्षर कुणाचे, म्हणून विचारले. तेव्हा चंदूमामाने त्या मुलाबद्दल सांगितले. त्यांनी त्या मुलाला भेटण्यासाठी बोलवायला सांगितले. दोन दिवसांनी हा मुलगा, निरोपानुसार त्यांच्या समोर उभा होता..
जयश्रीबाईंनी त्याला एक जुनी डायरी दिली व त्यातील नावं व फोन नंबरच्या नोंदी नवीन वहीत लिहायला सांगितल्या. त्या मुलाने आठ दिवस मागून घेतले. आठ दिवसांनी तो डायरी व ती नोंदींची नवीन वही घेऊन आला.
जयश्रीबाईंनी ती वही पाहिली. सुंदर हस्ताक्षरात सर्व नीटनेटके लिहिलेले पाहून त्या खुष झाल्या. त्यांनी त्या कामाच्या मानधनाचे एक पाकीट व पेनाचं एक बाॅक्स त्या मुलाच्या हातात दिलं आणि त्याच्या अक्षरकलेचं मनापासून कौतुक केलं..
त्या मुलानं जयश्रीबाईंचे आभार मानले व पळत जाऊन, उत्सुकता म्हणून एका दुकानदाराला त्या पेनाची किंमत विचारली. तो दुकानदार साधी पेनं, विकणारा होता. त्याने एका मोठ्या दुकानाचे नाव सांगितले. तिथं विचारल्यावर त्या ‘अमेरिकन पेना’ची किंमत त्याने अडीचशे रुपये सांगितली!
त्या मुलानं ते पेन गेली पन्नास वर्षे जपून ठेवलं. कधी एखाद्या समारंभाला ते खिशाला अडकवून अभिमानानं मिरवलं देखील.. आणि आज त्या माणसानं, त्या पेनाची आजची किंमत सांगितल्यावर त्या किंमतीपेक्षा ज्या जयश्रीबाईंनी ते भेट दिलं, त्यामागची त्यांची भावना ही पैशात मोजण्या पलीकडची आहे हे त्याला जाणवलं.. ज्येष्ठ सिने अभिनेत्री जयश्रीबाई, आज या जगात नाहीत. मात्र या पेनाकडे पाहिलं की, त्यांची प्रकर्षाने त्याला आठवण येते…
व्ही. शांताराम यांच्या ‘शेजारी’ चित्रपटात, नायिका असलेल्या जयश्रीबाईंच्या तोंडी एक अजरामर गाणं आहे.. त्या मशालनृत्याच्या समूहगीताचे शब्द आहेत.. ‘लख लख चंदेरीऽ, ही तेजाची दुनिया ऽ..’
त्या वेळचा शाळकरी मुलगा, जो आज ज्येष्ठ कलादिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहे.. त्या सुबोध गुरूजींनी ‘शेफर’ या अमेरिकन कंपनीचं ते ‘चंदेरी पेन’ जिवापाड जपून ठेवलंय.. अजूनही त्यांना, पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जयश्रीबाईंचा, सुंदर हसरा चेहरा आठवतो.. एका कलाकाराने, उभरत्या कलाकाराला त्याच्या सुंदर अक्षरांचं कौतुक म्हणून दिलेली ही भेट, ही चाळीस हजारांची नव्हे तर ‘लाखमोला’ची आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-८-२१.
Leave a Reply