लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा…
कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने अन् गोड गळ्याने गाऊन सादर करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर.
‘लावणी’ या विषयावर फोटो डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मी सुरू केलं. या कामाची गरज म्हणून तेव्हा आघाडीच्या कलाकारांना, कलावतींना भेटण्याची, त्यांची कला समजून घेऊन ही माहिती सचित्र टिपण्याची मोहीमच मी सुरू केली. यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालत असतानाच गावागावांत रात्री उशिरापर्यंत, किंबहुना रात्री उशिरा सुरू होणाऱया तमाशा आणि लावण्या कॅमेराबद्ध करण्याचं वेड मला लागलं होतं. हे सुरू असतानाच या कलेला आपला श्वास मानणाऱया सुरेखाची ओळख मला अप्रत्यक्ष होती. मात्र प्रत्यक्ष झाली ते पुण्यातल्या बालगंधर्व नाटय़गृहातल्या एका लावणी शोच्या निमित्तानं. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी सादर करणाऱया कलावतीचा एक शृंगार असतो. या शृंगारात स्त्रीने नेसलेलं रूपड़ं साडीचं वस्त्र, अंगावर भरजरी दागिने, कपाळावर असलेली टिकली, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने आणि कलावंताचं देखणं रूपडं या साऱयाचा उल्लेख करता येईल. हाच शृंगार कॅमेराबद्ध करण्याविषयी मी सुरेखाबरोबर फोनवर बोललो.
थोडय़ाच वेळात आतून आवाज आला आणि सुरेखाची नि माझी भेट झाली. सुरेखाची मूलभूत तयारी झाली होती. आता तिचा शृंगार सुरू होता. हा शृंगार टिपण्यासाठीची माझी लगबग सुरू झाली. शो सुरू व्हायला थोडासा अवधी होता. वरवरच्या गप्पा झाल्या आणि थोडय़ाच वेळात सुरेखा खुलली. मेकअप रूममध्ये काही मोजके फोटो टिपून मी स्टेजवरचं सुरेखाचं नृत्य, तिची अदा अन् गायन टिपण्यासाठी स्टेजसमोर गेलो. यावेळी मला सुरेखाचे अनेक कॅण्डिड टिपता आले.
काही दिवसांनंतर पुन्हा सुरेखाचे फोटो टिपण्यासाठी मी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला गेलो. शोला बराच वेळ होता. मी मेकअप रूममध्ये फोटो टिपत होतो अन् सुरेखा तिचा जीवन प्रवास हळूहळू उलगडून सांगत होती. सुरेखाचे वडील सोंगाडय़ाचं काम करत, तर कधी तमाशात गायन, नृत्य सादर करत. त्या काळी तमाशात वा लावणीच्या फडात स्त्रिया नृत्य सादर करीत नसत आणि म्हणूनच सुरेखाची आई तमाशात गायन, अभिनय सादर करत असे, तर आईचे आईवडील हेदेखील नृत्य, गायन आणि अभिनयात पारंगत असल्याचं सुरेखा सांगते. आईचं घर स्मशानभूमीजवळ होतं. वडिलांकडची परिस्थितीही जेमतेम. वडील पुणे रेल्वे स्टेशनवर दिवसा हमालीच काम करत अन् रात्री कला सादर करण्यासाठी लावणी अन् तमाशाच्या फडात जात. नंतर तिच्या आईवडिलांनी तमाशाचा फड सुरू केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून सुरेखाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेची पायरी ती कधीच चढली नाही. ‘‘माझ्या पाच पोरींपैकी एकीचा तरी तमाशाचा फड असेल अन् ती त्याची मालकीण होईल’’ हे तिच्या बाबांनी लहानपणी रंगवलेलं स्वप्न अखेर १९८६ साली पूर्ण झालं. तिच्या बहिणीसोबत ‘लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला. पुढे चार वर्षे तो चालला.
त्यानंतर १९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘तुम्हा बघूनी डावा डोळा’ या सुरेखाच्या दिलखेच अदाकारीने रसिकमन जिकलं. त्यानंतर सुरेखाला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली अन् आर्थिक मानधनही. या शोसाठी दोन लाखांचं मानधन मिळालं. यापूर्वी एकहाती एवढा पैसा बघितलाही नसल्याचं सुरेखाने कबूल केलं. पोटाची खळगी भागवण्यासाठी सुरेखाच्या बैलगाडीतून गावोगाव हिंडण्याच्या प्रवासाला आता खऱया अर्थानं गती मिळाली अन् पुढे बैलगाडी ते विमान आणि नारायणगाव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा तिचा प्रवास केवळ लावणीमुळेच शक्य झाल्याचं सांगताना ती भावुक झाली. इतक्यात शोसाठीची घंटा वाजली अन् आपल्या भावनांना आवर घालत सुरेखा पायात घुंगरू बांधण्यात गुंतली. यावेळी मला तिचे उत्तम कॅण्डिड टिपता आले. कॅमेऱयात मी सुरेखाच्या अनेक भावमुद्रा टिपल्या होत्या, परंतु एकदा रंग चेहऱयावर लागला की, कलाकार त्याच्या भावना, वेदना विसरून त्याच्या कलेत कसा एकरूप होतो अन् क्षणार्धात चेहऱयावर एक वेगळं तेज घेऊन हसऱया चेहऱयानं आपली कला सादर करण्यासाठी कसा सरसावतो याचं जिवंत उदाहरण माझ्या मनाच्या कॅमेऱयात कायमचं बंदिस्त झालं.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply