गोव्याच्या माझ्या मित्राबरोबर त्याचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला.
खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा.
पूर्वीच्या कौलारू देवळावर आता तांब्याचे पत्रे घालण्यात आल्यामुळे ते छान दिसते. सकाळी व माध्यान्ही पूजा, नैवेद्य, प्रसादाची पंगत, संध्याकाळी आरती, रात्री पालखी, पुन्हा रात्री प्रसाद आणि अपरात्री संगीत सौभद्र हे नाटक असा हा भावभक्ती, संस्कृती, संगीत, नाट्य आणि गोव्याच्या ( प्रसाद म्हणून पूर्ण शाकाहारी ) खास चवीच्या पदार्थांचा आस्वाद अशा नाना प्रकारांनी भरलेला अलभ्य महोत्सव ! तरीही रेटारेटी होईल अशी गर्दी नाही, श्रीमंतीचे प्रदर्शन नाही. सर्व काही भरजरी आणि “सुशेगाद” !
जो काही बडिवार होता तो फक्त देवाचाच ! भर दुपारी १२ वाजता मोठ्या आरशाच्या साहाय्याने देवाच्या मूर्तीवर, देवळाबाहेरून सुमारे ५०० फुटांवरून केलेला सूर्यकिरणांचा अभिषेक पाहण्यासारखा असतो. रात्री पालखीत बसलेल्या देवावर सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविलेला असतो. गोवेकरांना फुलांचे फारच प्रेम.
त्यामुळे नानाविध फुलांनीही देव सजविला जातो. अपरात्री देवासमोर ” संगीत सौभद्र” हे नाटक सुरु झाले. सुरुवातीला ३० / ४० प्रेक्षक होते. रात्री २ वाजता आम्ही दोघेच प्रेक्षक होतो. नाटकातील सर्व कलाकार अगदी जीव ओतून काम करीत होते. प्रत्येक पद उत्तमपणे सादर करीत होते. २ नंतर एकही प्रेक्षक नव्हता तरीही हे नाटक त्यामधील सर्व पदांसह पहाटे ३.३० पर्यंत सादर झाले.
दुसऱ्या दिवशी मी याबद्दल त्यातील मुख्य कलावंत गायिकेला विचारले तेव्हा ती म्हणाली,”आमी आमगेले नाटक देवां खातीर केल्ले” ….
लक्ष्मीनरसिंहाला आणि कलाकारांच्या या निष्ठेला मन:पूर्वक वंदन !!
— मकरंद करंदीकर
एक विनंती करते कि बहुदा तुमचाच एक लेख वौटस अप वर फिरत आहे तो पंगत आणि चित्राहुती मागील विद्यान विषयावर आहे तो भाग ३ आहे तर आधीच भात २ काय आहेत ते कळेल का आणि वौटस अप पाठवू शकता का किंवा एमैल वर