नवीन लेखन...

लताचे पराभव !

७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय.

“भाभीं की चुडियां ” हा साधारण माझ्या पिढीच्या जन्माच्या आसपासचा चित्रपट ! बाबुजींचे संगीत असलेला ! त्यांत लताचे गाणे आहे – ” ज्योति कलश छलके !” पंडीत नरेंद्र शर्मांची ही रचना. खरंतर खूप वर्षे या गीतावर लताचीच मोहोर होती. साधारण पंचवीस एक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर बाबूजींचा कार्यक्रम होता. सूत्रसंचालन दस्तुरखुद्द नरेंद्र शर्मा करीत होते. अगदी योगायोगाने मी DD -National चॅनेल लावले आणि हा कार्यक्रम बघितला. अतिशय समर्पक आणि आटोपशीर शब्दात पंडितजींनी या गाण्याची जन्मकथा ऐकविली आणि बाबूजींनी हे हळुवार गीत अतिशय नाजूकपणे (त्यातील भावनांना कणभरही धक्का बसू न देता) सादर केले. आवाज,शब्दोच्चार याबाबत दक्ष असलेले बाबूजी या गाण्यातील सगळी पहाट स्टुडिओत साकार करून गेले.(मूळ चित्रपटात मीनाकुमारी सडा -संमार्जन करीत,तुळशीला प्रदक्षिणा घालत लताच्या आवाजात कृष्ण-धवल रंगात हे पावित्र्य उधळते. ते सारं फक्त हार्मोनियमच्या साथीने बाबूजींनी उभं केलं.) लताचा हा पहिला पराभव !

त्याही आधी आलेल्या “अलबेला ” मध्ये सी. रामचंद्रांनी “धीरे से आजा रे ” ही अव्दितीय रचना लताकडून गाऊन घेतली. त्याचे sad version तर अप्रतिमच आहे. (हा लताचा बालेकिल्ला). पण पुण्यात बालगंधर्वला सी. रामचंद्रांना ऐकायचा योग आला. त्यांनी ज्या पद्धतीने हे गीत सादर केले त्याला तोड नाही. दुःख/ मोडतोड सहसा स्त्रियांच्या आवाजात ऐकण्याची आपल्याला सवय असते. पुरुषांनी ते दर्द तितक्याच ताकतीने पेलले की काय होते त्याचा हा नमुना होता. लताचा हा दुसरा पराभव !

आणि तिसरा अनुभवला “अमर प्रेम “चित्रपटात ! “रैना बिती जाय”
लताच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत खूप वरचे ! लताची सुरुवातीची आलापी ऐकून राजेश खन्नाचे पाय माघारी वळतात आणि तो शर्मिला च्या कोठयावर अदृश्य धाग्यांनी खेचला जातो. तीही तल्लीनतेने गाते. गाणे संपल्यावर राजेश तिला नांव विचारतो. तीही अलवारपणे उत्तरते – “पुष्पा ”

नकारार्थी मान डोलावत धुंदावल्या आवाजात राजेश खन्ना म्हणतो – ” मीरा होना चाहिए था !” एका क्षणात त्या गीताची हार होते. लताचा हा तिसरा पराभव !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

1 Comment on लताचे पराभव !

  1. This is an old article. Coincidentally it got published here today after her leaving us.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..