पन्नास साठ वर्षांपूर्वी पुणे शहर ‘विद्येच्या माहेरघरा’बरोबरच ‘क्लासेस’चं शहर होतं. त्यावेळी सदाशिव पेठेतील इंग्रजीसाठी डाके क्लास व गणितासाठी नाना क्लास प्रसिद्ध होते. पालक आपल्या मुलाचं गणित कच्चं आहे म्हणून त्याला नागनाथ पाराजवळील नाना क्लासला पाठवत. त्यानंतर तो शालांत परीक्षेत गणित विषयात उत्तम गुणांनी पास होत असे. इंग्रजी विषयाची भीती जर मुलाच्या मनात राहिली तर तो परीक्षेतच नव्हे तर जीवनातही अयशस्वी ठरतो. एसपी काॅलेजमागील विजयानगर काॅलनीतील ‘डाके क्लासला गेलेला विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास होऊच शकत नाही’ असा त्यावेळी पालकांना दृढ विश्वास असायचा.
दहावीला असताना मी इंग्रजी विषयासाठी डाके क्लास लावला होता. १९७५ साली स्वतः डाके सर क्लास घेत असत. तेव्हा सरांचं वय साठीच्या आसपास असावं. सरांनी प्रत्येकाला एक क्लासचं प्रिंटेड नोटबुक दिलेलं होतं. त्यातील क्रमानुसार ते अतिशय सोप्या भाषेत इंग्रजी शिकवत असत. डाके क्लासमुळेच मी इंग्रजी विषयात पास झालो.
दरम्यान नाना क्लास बंद झाला होता. डाके सर गेल्यानंतर त्यांच्या मुलाने क्लास काही वर्ष चालविला. तोपर्यंत सुहास जोग सरांचा टिळक रोडवरील चिमणबागेतील सायन्सचा क्लास सुरू झाला. सरांनी क्लासच्या अनेक शाखा सुरू केल्या.
बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सोय केली. काही वर्षांनंतर जंगली महाराज रस्त्यावर ‘सुहास जोग क्लासेस’ प्रशस्त इमारतीमध्ये सुरू केले. कोथरूडला स्वतःची शाळा काढली.
अकौंटन्सी विषयासाठी गणपुले क्लास फार प्रसिद्ध होता. स्वतः गणपुले पांढरी बंडी व पायजमा अशा साध्या पेहरावात क्लास घेत असत. ते गेल्यानंतर त्यांच्या मुलाने काही वर्ष क्लास चालविला. मला शिकविणाऱ्या जयश्री कोटीभास्कर बाई देखील अकौंटन्सीचे क्लास घेत होत्या. माझा काॅलेजमधील मित्र केदार टाकळकर याने देखील क्लास सुरू करुन या क्षेत्रात नाव कमवलं आहे. काही वर्षांपूर्वी नवी पेठेत बेहेरे क्लासेस सुरू झाले. सदाशिव पेठेतील पुरंदरे क्लासच्या प्रत्येक बॅचेसला अफाट गर्दी दिसू लागली.
२००० नंतर क्लासेसचं स्वरूप पालटून गेलं. चाटे क्लासनं संपूर्ण महाराष्ट्रात शाखा सुरू केल्या. एका ठराविक पॅटर्नने अत्याधुनिक पद्धतीने कमी कालावधीत चाटे क्लासने अमाप यश मिळविले. त्यांनी स्वतःच्या क्लासचा ड्रेसकोड केला. प्रत्येक शहरात ‘चाटे स्कूल’ चालू केली. क्लासेसच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला.
गेल्या काही वर्षांपर्यंत क्लास लावणं हे एक ‘फॅड’ होतं. पालकांना आपला मुलगा दिवसभर अभ्यासात व्यस्त असतो हे दाखविण्यात ‘भूषण’ वाटत असतं. मन लावून, सर्व पिरीयडला हजर राहिलं तर क्लासची गरजच नसते. मात्र मित्राने लावला म्हणून मीही क्लास लावणार अशाने स्पर्धा वाढू लागली.
या कोरोनाच्या विश्वव्यापी संकटाने सर्व क्लास बंद झाले आहेत. आता क्लासला पर्याय प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात आला आहे. ऑनलाईन शिक्षण!! काही कंपन्यांनी पाचवीपासून दहावीपर्यंत तसेच उच्च शिक्षणासाठीही साॅफ्टवेअर काढली आहेत. त्यांची वर्गणी भरल्यानंतर तुम्ही ते साॅफ्टवेअर डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, पीसी वरुन अभ्यास करु शकता. अशा प्रकारच्या अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर घातक परिणामही होऊ शकतो.
शेवटी काय, काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
आजही रस्त्यानं फिरताना एखाद्या बिल्डींगच्या बाहेर ‘येथे पाचवी ते दहावी सर्व विषयांची मराठी व सेमी इंग्लिश शिकवणी घेतली जाईल.’ अशी लावलेली पाटी लक्ष वेधून घेते आणि मी भूतकाळात जातो….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-९-२०.
Leave a Reply