‘प्रेमा तुझा रंग कसा’, या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्या…किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या…किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या ‘कपल्स’कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम ‘नाही’ कसं म्हणायचं? म्हणून…मन इथे कच खाते.
‘प्रेम’ जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.
प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे… थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा ‘त्याला’ किंवा ‘तिला’ नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. ‘नाही’ म्हटलं तर ‘तो’ किंवा ‘ती’ आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे ‘तो’ किंवा ‘ती’ मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे ‘नाही’ म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच ‘नाही’ म्हणणेच ‘त्याच्या’ किंवा ‘तिच्या’साठी गरजेचे असते.
— संदीप रमेश पारोळेकर
Leave a Reply