गेल्या काही वर्षांत लेप्टोस्पायरोसीस या आजाराने पावसाळ्यात अनेक बळी घेतल्याचे आपण वाचले असेल. हा आजार नेमका कशामुळे व कसा होतो हे आज आपण थोडे समजून घेऊ या. या आजाराचा पहिला उल्लेख एडॉल्फ विल यांनी सन १८८६ मध्ये केला होता, म्हणून याला ‘विल्स डिसीज’ असेही म्हणतात. लेप्टोस्पायरोसीस हा आजार लेप्टोस्पायरा जातीच्या स्पायरोकीट या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूच्या अनेक प्रजाती आहेत; पण इंटरोगास व इक्टरोहिमहेगिये या दोन महत्त्वाच्या प्रजाती समजल्या जातात. हे जिवाणू खरं तर सस्तन प्राण्यांमध्ये विकसित होतात व प्रजोत्पादन करतात. उंदीर, घुशी, कुत्रे, डुक्कर इत्यादी प्राण्यांच्या शरीरात हा जिवाणू सापडतो.
या प्राण्यांच्या मूत्राद्वारे हे जिवाणू बाहेर पसरतात. नाले, गटार, मलप्रणाली, जलाशय इत्यादी ठिकाणी हे प्राणी अधिक फिरतात आणि म्हणून या परिसरात हे जिवाणू सापडतात. अशा ठिकाणी फिरताना जर पायाला ओरखडा किंवा जखम असेल तर हे जिवाणू मनुष्यात प्रवेश करतात. मुंबईत पावसाळ्यात जेव्हा नाले वाहून पाणी साचते तेव्हा या पाण्यात लेप्टोस्पायरा जिवाणू अत्याधिक मात्रेत असतात. अशा पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसीस हा आजार होऊ शकतो. मलप्रणालीतील कर्मचारी वर्ग, यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. यांच्या हाताच्या नखांमधल्या मळात हे जिवाणू असू शकतात व डोळे चोळताना जिवाणू डोळ्याद्वारेसुद्धा शरीरात प्रवेश करू शकतात. शरीरात हे सर्व अवयवांमध्ये पसरतात; परंतु यकृतात व मूत्रपिंडात अत्याधिक प्रमाणात नुकसान करतात. शरीराच्या स्नायुंतसुद्धा हे जिवाणू जातात. शरीरात प्रवेश केल्यावर ७ ते १२ दिवसांत लक्षणे दिसू लागतात. ९० टक्के रुग्णांमध्ये सौम्य असा आजार होतो व १० टक्के रुग्णांमध्ये अतिउग्र असा आजार होतो ज्याला ‘विल्स डिसीज’ किंवा ‘विल्स सिंड्रोम’ म्हणतात. हा आजार दोन टप्प्यात होतो. पहिल्या ४ ते ७ दिवसांत ताप, थंडी, कणकण, कंबर व पोटरीचे स्नायू दुखणे अचानक सुरू होतात. याला ‘सेप्टिसेमिक फेज’ असे म्हणतात. कधी कधी अंगावर पुरळ येणे, खोकला, कफ, दग लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
-डॉ. मंदार कुबल
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply