नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. सरकते जिने,उद्वाहने,आरक्षण,तिकिटांचे प्रकार, प्रवासात लहान मुलांसाठी दुधाची सोय, वायफायची सुविधा, प्रवासात विविध गोष्टींची उपलब्धता , स्वच्छ पाणी, फलाट सुशोभित करणे,इत्यादी अगणित नवीन गोष्टी प्रभू यांनी केल्या आहेत. ते अनेक नवीन नवीन प्रयोग करीतही आहेत. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याचा ९२ वर्षांचा प्रघात मोडून ते देशाचे आणि रेल्वेचे काही कोटी रुपये वाचविणार आहेत. अर्थसंकल्पाच्यावेळी त्यांना अफाट प्रसिद्धी मिळत होती ती बंद झाली तरी देशाचा फायदा त्यांना महत्वाचा वाटतो हे महत्वाचे आहे.
असाच एक छोटासा पण महत्वाचा प्रयोग त्यांनी रेल्वे फलाटावर केला आहे.आश्चर्य म्हणजे त्याची कुणीही अगदी वृत्तपत्रांनीही दखलच घेतलेली नाही.सतत नकारात्मक गोष्टींचा आक्रस्ताळी आणि बटबटीत मारा करणाऱ्या बहुतेक वृत्तवाहिन्यांना यात अजिबात रस नसावा.
हा वेगळा प्रयोग असा- रेल्वे फलाटावरचे सध्याचे पंखे हा एक अत्यंत विनोदी प्रकार आहे. अगदी पंख्याखाली तुम्ही उभे राहिलात तर २ /३ माणसांना थोडासा वारा मिळतो. कित्येक पंखे तर हवा काढून घेण्यासाठी बसविले असल्यासारखेच वाटतात. काही नुसतेच गरगरा फिरत असतात. लाखो पंखे पुरविणाऱ्या कंपन्यांची चांदी करणारा पण प्रवाशांसाठी निरुपयोगी असा हा मामला ! बरे अनेक पंखे बसविल्यामुळे विजेचा वापरही अमर्याद होतो.
प्रभूजींनी यासाठी स्थानकांवर हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या आकाराचे प्रचंड पंखे बसवायला सुरुवात केलेली दिसते. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ३ पात्यांचा तर अंधेरी स्थानकात ६ पात्यांचे ३ असे एकूण ५ प्रचंड पंखे बसविण्यात आले आहेत. या महाकाय पंख्यांमुळे हजारो चौरस फुटांच्या क्षेत्रात कुठेही एकसारखा आणि पुरेसा वारा लागतो.पंख्याखाली जाऊन उभे राहावे लागत नाही. एवढ्या भागातील सुमारे २५ / ३० पंखे यामुळे काढून टाकता आले आहेत त्यामुळे विजेचीही बचतच होणार आहे,यामुळेच प्रभूजींकडून अशा वेगळ्या कामाच्या अपेक्षा वाढतात. स्वातंत्र्यापासून अनेक रेल्वेमंत्री हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे होते. त्यांनी कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता आपापल्या राज्यातील लोकांना रेल्वेमध्ये भरभरून नोकऱ्या दिल्या. प्रभूजींनीही महाराष्ट्र ( विशेषतः कोकण– मालवण) आणि गोव्यातील तरुणांना रेल्वेमध्ये अशाच नोकऱ्या द्याव्यात आणि आशीर्वाद घ्यावेत.
अनेक रेल्वे मंत्र्यांनी गाड्यांना ” आपला ठसा ” उमटविणारी नावे दिली. श्रीम. ममता बॅनर्जीं यांनी दिलेले “दुरांतो ” हे नाव काय आहे असा प्रश्न कुणी विचारला नाही. प्रभूजींना अशी विनंती आहे की त्यांनीही मराठी, मालवणी, कोंकणी भाषा व संस्कृती दर्शविणारी नावे रेल्वे गाड्या–सेवांना द्यावीत !
प्रभूजींकडून इतकी अपेक्षा म्हणजे फार नाही !
— मकरंद शां. करंदीकर
Leave a Reply