होडी ते मेट्रो असे मुंबईतील दळणवळणाच्या इतिहासाचे टप्पे. “बॅक टू स्क्वेअर वन” किंवा “हिस्टरी रिपिटस इटसेल्फ” असे म्हणतात ते उगीचच नाही. मुंबईतल्या रस्त्यांची आणि लोहमार्गांची वाहतूकक्षमता संपायला आली… वाहतूक दिवसेंदिवस बिकट झाली आणि त्यामुळे आता चर्चा सुरु झालेय ती मुंबईत समुद्र आणि खाडीमार्गे तसेच मुंबईतल्या नद्यांमधून प्रवासी वाहतूक करण्याची.
सात बेटांनी मिळून बनलेल्या मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुरुवातीच्या काळात रस्त्यांवरुन चालत असे. रस्तेही मातीचे होते. एका बेटावरुन दुसर्या बेटावर जाण्यासाठी होड्यांतूनच जावे लागे. १८३८ मध्ये कुलाबा कॉजवे बांधला गेला. त्यामुळे कुलाब्याला जा-ये करताना खाडीत उतरून जीव धोक्यात घालणे टळले.
घोड्याची ट्राम सुरु होण्यापूर्वी मुंबईत मुख्य वाहतुकीचे साधन म्हणजे मेणे व छकडे होते. त्यानंतर घोड्याने चालवलेला टांगा हे वाहन मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला एक घोड्याचा टांगा आणि नंतर दोन घोड्यांचा टांगा आला.
त्यानंतर घोड्यांनी ओढले जाणारे एक भारदस्त वाहन मुंबईत दाखल झाले. या घोडागाडीची सुरुवात म्हणे ब्रिटनमध्ये झाली. मजेचा भाग असा की असेच वाहन आपल्या रामायण-महाभारतात “रथ” या नावाने प्रसिद्ध होते आणि देवादिकांना तसेच राजे-रजवाड्यांना प्रवास करण्यासाठी ते वापरले जायचे. पुराणकालीन “रथा”ची आठवण करुन देणारी ही घोडागाडी. मुंबईकरांनी त्याला “टांगा” ऐवजी “व्हिक्टोरिया” हे भारदस्त इंग्रजी नाव दिले.
अनेक वर्षे मुंबईकरांची इमाने-इतबारे सेवा केल्यानंतर कालांतराने मुंबईतली घोडागाडी अस्तंगत झाली. मात्र शेजारच्याच ठाणे आणि कल्याणमध्ये ती अगदी आत्ता-आत्तापर्यंत वापरात होती. ठाण्यात स्टेशन ते टेंबीनाका अशा मार्गावरील हे टांगे अनेकांना आठवत असतील. मी तर त्यातून अगणितपणे प्रवास केलाय. लहानपणी टांगेवाल्याच्या शेजारी हातात लगाम आणि चाबूक घेऊन बसण्याचा हट्ट आज साठीच्या आसपास असलेल्या अनेकांनी लहानपणी केल्याचे त्यांना आठवत असेल.
अजुनही या “व्हिक्टोरिया”च्या प्रवासाचा अनुभव दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ तसेच ठाण्याच्या तलावपाळीला घेता येतो.
— निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे – भाग २
(क्रमशः)
Leave a Reply