नवीन लेखन...

माझे सूचीलेखन कार्य

कायस्थ विकासच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित झालेला डॉ.अनंत देशमुख यांचा हा लेख.


एक
१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती. ती पुढे मराठी संशोधनमंडळाने प्रसिद्धही केली. दरम्यानच्या काळात पुष्पाबाईंनी तो अभ्यास थांबवला.

नंतरच्या काळात ‘मराठी ज्ञानप्रसारक’वर प्रा. वा.ल.कुळकर्णी यांनी लेखन केले, पाँप्युलर प्रकाशनाने ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले.

दोन
पीएच. डी. साठीच्या संशोधनाकरिता नियतकालिके घ्यावीत हा विचार प्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी मराठी विभागात आल्यानंतर सुरू झाला. कारण त्याचे मोल त्यांनी ओळखले होते. त्यांनी सुधाकर देशपांडे (‘निबंधमाला’) आणि प्रमिला गोखले (‘प्रतिभा’) यांच्याकडून या नियतकालिकांवर प्रबंधलेखन करवून घेतले. पुढे वदिंनीच विभागात हा प्रकल्प सुरू केला. त्यात मला त्यांनी ‘मासिक मनोरंजन’वर काम करायला सांगितले. सुदैवाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ‘मनोरंजन’चे अंक होते. तिथे जाऊन ते पाहाणे आले. त्यातील पहिले काम त्या नियतकलिकाची सूची करणे हे होते. मनोरंजन १८९०-१९४० पर्यंत चालू होते. हे काम वेळखाऊ होते. पण मी जिद्द सोडली नाही. चिकाटीने हळूहळू ते करीत गेलो. त्यातच सूचीवाङमयावरील डॉ. सु.रा.चुनेकर यांची संपादने प्रकाशित व्हायची होती किंवा झाली असल्यास मला ज्ञात नव्हती. पुष्पाबाईंची सूची आणि वालंचे लेखन समोर होते. तो कित्ता समोर ठेवून ‘एकला चलो रे’ पद्धतीने मी चाललो होतो.

तरीही संपादकीय, पत्रव्यवहार, सदरे, लेख, कथा, कविता, प्रवास, आरोग्य, स्त्रियांसंबंधी, नाटकविषयक, चरित्रपर, चौकटी, बदलत गेलेली घोषवाक्ये, विनोद, लेखमाला, लेखक/कलावंतांचे परिचयपर लेखन, विशेषांक अशा विविध पद्धतीने वर्गीकरण करून मी टिपणे काढीत होतो. तेव्हा कार्डपद्धतीशी माझा परिचय झाला नव्हता.

मी अंगिकारलेल्या अभ्यासपद्धतीमुळे मला ‘मनोरंजन’च्या प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत मी बारकाईने अंक पाहू शकत होतो. त्यामुळे छपाई, कागद, आतले फोटो, शीर्षके, जाहिराती, त्यातला मजकूर, तत्कालीन सामाजिक, राजकीय घटना अशा अनेक अंगांनी माझी निरीक्षणे होत होती. त्यामुळे बदललेले संपादक, त्यांची वृत्ती सारे टिपणे शक्य झाले.

तीन
१९८२ साली ‘सत्यकथा’ मासिक बंद पडले. त्याचा जबरदस्त परिणाम मनावर झाला होता. त्यातून मी स्वेच्छेने ‘सत्यकथे’ची सूची केली. ती परिपूर्ण जरी करता आली नाही, तरी ती मी केली. ‘सत्यकथे’ला कविता नकोत इथपासून तो मराठी नवकाव्याचे ‘सत्यकथा’ व्यासपीठ ठरली, गाडगीळ, गोखले, भावे, माडगूळकर,…पारगावकर, कमल देसाई, अनिल डांगे, रत्नाकर पटवर्धन मराठी कथेची वळणे, समीक्षेतील स्थित्यंतरे, ‘सत्यकथे’चे विशेषांक सारे मी पाहिले. अनेक दृष्टीने या सूचीलेखनामुळे सगळा पट माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

चार
S.N.D.T. च्या मराठी विभागाने वाङमयीन नियतकालिकांवर काम करायचे ठरविले तेव्हा मी ‘पारिजात’ हे नियतकालिक निवडले. ते रघुवीर सामंत यांच्या संपादनाखाली ठाण्याहून निघत असे. वि.स.खांडेकर, वि.ह. कुलकर्णी, वा.ल.कुळकर्णी, वा.रा.ढवळे, रा. भि. जोशी वगैरे तत्कालीन महत्त्वाचे लेखक त्यात लेखन करीत. केवळ चौदा महिने चाललेल्या या नियतकालिकाची वेगळी वाट मला सूची तयार करताना दिसली. एका अर्थाने मी त्यातून समृद्ध होत गेलो.

पाच
‘वाड्मयीन नियतकालिकांतील पत्रव्यवहार’ या विषयावर आमच्या विभागाने आणखी एक प्रकल्प केला. त्यात ‘मौज साप्ताहिकातील पत्रव्यवहार’ हा विषय मला देण्यात आला होता. हा विषय माझी कसोटी पाहाणारा होता. कारण ‘मौज’ साप्ताहिकाच्या फायली फक्त ‘मौज’च्या कार्यालयात होत्या. त्या पाहाण्याची माझी सोय झाली. १९४३ ते १९५० या दरम्यानची जवळजवळ ५००/५५० पत्रे त्यात होती. ती नकलून घेणे आणि त्यावर लेखन करणे हे मला आव्हानात्मक होते. पण मी ते केले. सुदैवाने त्या प्रकल्पाचे पुस्तक झाल्याने मी केलेली पत्रसूची आणि पत्रांचे विश्लेषण करणारा दीर्घ लेख जाणकारांसमोर आहेच.

सहा
रघुनाथराव कर्वे यांच्यासंबंधीच्या माझ्या अभ्यासाला दूरवर मान्यता लाभली आहे. (पुरस्कारांनी त्याकडे पाठ फिरवली असली तरी) त्याची सूची करणे किती जिकिरीचे असेल याची कल्पना केलेली बरी. ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाच्या आधारे मी खालील प्रमाणे सूच्या तयार केल्या.

१. शकुंतला परांजपे यांचे लेखन
२. मोपांसाच्या कथांची रघुनाथरावांनी केलेली रूपांतरे
३. अन्य लेखकांचे वैचारिक स्वरूपाचे लेखन
४. अन्य लेखकांचे कथालेखन
५. शारदेची पत्रे शीर्षकाखालील लेखन
६. रघुनाथरावांचे बुद्धिप्रामाण्यवादी लेखन
७.’समाजस्वास्थ्य’तील निवडक लेख संततिनियमन, कायदा, अश्लीलता, साहित्यसमीक्षा, नाट्यसमीक्षा, पत्रव्यवहार,आरोग्य, आहार, व्यायाम इ.
८. रघुनाथरावांनी Reason या इंग्रजी नियतकालिकात केलेले लेखन.
९. याशिवाय रघुनाथरावांसंबंधी समकालीनांनी आणि उत्तरकालीनांनी केलेले लेखन.

सात
माझे ज्येष्ठमित्र द.दि.पुंडे यांच्या सूचनेनुसार मी टोरंटोहून प्रकाशित होणा-या एकता या त्रैमासिकाच्या पहिल्या बारा वर्षांचा अभ्यास मी केला. पुंडे म्हणाले,”एकता’मध्ये ज्यांचा ज्यांचा उल्लेख आला आहे, त्यासर्वांची नोंद सूचीत असायला हवी. कारण आपण ‘एका तपाची एकता’ शीर्षकाचे निवडक कथांचे पुस्तक काढणार आहोत. त्याला ती जोडू. म्हणजे स्वाभाविकच पुस्तकाचा खप वाढेल.’ त्यानुसार मी नेहमीप्रमाणे मन लावून काम केले. शिवाय माझ्या दृष्टीने जवळजवळ चांगल्या २५ कथांची निवड केली. त्याचबरोबर सर्वप्रकारच्या सूच्या तयार केल्या. एकताच्या कार्यकर्तृत्वाचा तपशीलवार आढावा घेणारा, निवडलेल्या कथांचे गुणात्मक विश्लेषण करणारा सविस्तर लेख तयार केला. सारा मजकूर सव्वाशे/दीडशे पानांचा झाला. त्याची एक झेराँक्स प्रत टोरांटोला संपादक विनायक गोखले यांना पाठवून दिली. त्यांनी फक्त झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांची ही शाबासकी मला खूप काही शिकवून गेली. त्यामुळे वेळ, श्रम, बुद्धी आणि पैसा सगळे वाया गेले.

(या लेखनात वस्तुस्थिती निवेदन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.)

डॉ.अनंत देशमुख
86899 78744
dranantdeshmukh@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..