(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख)
कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते.
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच माझी ऊर्जा आहे. यात एका अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. आईवडिलांना कधीच विसरता येणार नाही. आईवडिलांनी वाढविले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे केले. अशीच माझी धारणा आहे. आईवडिलांनी जन्म दिला आणि बाबासाहेबांनी जिवंतपणा दिला.
कशासाठी जगायचे. आजवर जगून काय केले, का जगायचे, हे प्रश्न मला कधीच पडले नाहीत. अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून ते आज वयाच्या 76 व्या वर्षांपर्यंत. कारण सतत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डोळ्यासमोर आहे, असते. बाबासाहेबांनी प्रेरणा दिली. उत्साह वाढविला. आत्मविश्वास दिला. वाचनाच्या अखंड प्रवाहात त्यांनी मला सतेज ठेवले.
बाबासाहेबांना समजून घेताना त्यांनी स्वत:च किती विषय समजून घेतले याचीही प्रचिती येते व साहजिकच त्यांच्यामुळे अन्य विषयांची ओळख होते. ज्याला ज्ञानात गोडी त्याच्या जीवनात रमणीयता हे सूत्र मी मनापासून जपले आहे. वाचनात तल्लीन होताना बाबासाहेबांना परिसराचा विसर पडे हे त्यांच्याबद्दलचे अनुभव वाचताना आपलीही अवस्था बाबासाहेब वाचताना तशीच होते. हे स्वानुभवाने पटते. ‘ग्रंथ लिहिताना वा वाचताना शारीरिक वेदनांचा मला विसर पडतो,’ असे बाबासाहेब म्हणत. कळकळीतूनच ही ऊर्जा निर्माण होते. श्रद्धाविषयाशी पराकाष्ठेची एकरूपता असेल तर निश्चितच ऊर्जा निर्माण होते. ती जगण्याला बळ देते. जे कोणाला क्वचितच सुचले असे प्रतिपादन करताना बाबासाहेब जी मांडणी करतात, त्याने मी अवाक् होतो. पुन्हा वाचण्यासाठी जगावे व बाबासाहेब सांगण्यासाठी फुलावे. यातून मला ऊर्जा प्राप्त होते. चष्म्याचा नंबर वाढला तरी बाबासाहेब वाचण्याचे सुटत नाही. सकाळी सहा वाजल्यापासून वाचतच असतो. वाचन थांबविले की अंग दुखायला लागते हा अलीकडचा अनुभव.
संशोधनाची कोणती पद्धत आपण अनुसरावी असे बाबासाहेबांनी अमेरिकेत शिकत असताना आपले आवडते प्राध्यापक गुरू एडवीन, आर. ए. सेलिग्मन यांना एकदा विचारले. त्या गुरुवर्यांनी बाबासाहेबांना असा हितोपदेश केला की, ‘तुम्ही आपले काम कळकळीने करीत जा. म्हणजे त्यातूनच तुमची स्वत:ची पद्धत आपोआप निर्माण होईल.’ मला वाटते आयुष्यभर बाबासाहेबांची कळकळ ही ऊर्जा ठरली.
14 ऑक्टोबर 1956 (अशोक विजयादशमी) रोजी नागपूर येथे धम्मदीक्षा समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. ऊर्जाच नव्हे काय?
आमचे सायन्सचे प्राध्यापक आम्हाला सांगायचे
What is Energy?
Energy is Capacity to do Work.
ही क्षमता कशी निर्माण करायची हे सातत्यामुळे कळते असे मला वाटते.
कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. ऊर्जेला नवे रूप प्राप्त होते. कधीकधी मलूल होऊन पडतो. तेव्हा कोणी अचानक ‘जय भीम, साहेब’ म्हणून साद घातली की माझ्यात ऊर्जा संचारते.
प्रत्येकात ‘ऊर्जा’ असतेच, ती कशामुळे आपल्यात येते, याचा शोध मात्र ज्याचा त्यानेच घ्यावा व जीवन उन्नत करावे. जनहित करावे.
औरंगाबादला गेल्यावर मिलिंद कॉलेजचे, बाबासाहेबांनी तेथे लावलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन घेतले की मला ऊर्जा प्राप्त होते.
मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या देवचंद कॉलेजला (अर्जुननगर, निपाणी) भेट दिल्यावरही मला ऊर्जा मिळते.
‘उदासीनता कोठून येते हे मज ना कळे’ अशी अवस्था असू शकते. पण ऊर्जा कोठून येते हे मात्र कळायला अवघड जात नाही. वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही हा संदेश वृद्धिंगत होवो!!!
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख)
– सतीश कुलकर्णी
Leave a Reply