नवीन लेखन...

माणूस, मरण आणि मसणवटा..

प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले असणे यामुळे त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दु:ख होणो साहजिकच समजू शकतो. पण अशा काही व्यक्ती असतात की त्या आयुष्यभर दुसर्‍याला त्रासच देत आल्या त्याविषयी समाज फारसा हळहळ व्यक्त करत नाही.काहीही असले तरी मृतदेहाची विल्हेवाट लावावीच लागते. धर्मानुसार ती विल्हेवाट वेगवेगळया पध्दतीने लावली जाते. मृतदेह कुणी पुरत असेल, कुणी जाळत असेल तर पाण्याबरोबर वाहून लावत असेल वगैरे.

भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी तत्वांचा त्यात समावेश आहे . कारण एवढेच की पासष्ट वर्षानंतरही ग्रामसमूहातील समता स्थापन होऊ शकलेली नाही. शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. जगण्याच्या सोयीसुविधा बदलत आहेत. असे झाले असला तरी समता रूजली का? हा महत्वाचा प्रश्न आहे . सांगण्याचे कारण एवढेच की माणसं सगळे सारखेच. रक्त सर्वांचे लालच. पण समाजव्यवस्था का बदलली नाही. गावखेड्यात अजुनही समाज परिवर्तन झालेले नाही. प्रत्येक जातसमूहाची गल्ली वेगळी. प्रत्येक जातसमूहाचा व्यवहार वेगळा.जातीपातीला रूढीपरंपरांना घट्ट चिटकून बसलेला समाज समता कशी प्रस्थापित करू शकेल? गावपातळीवर आजही पाणवठे वेगळे आहेत. तसे मसनवटे सुद्धा वेगळे आहेत. मृतदेह नष्ट करण्याची पद्धती जरी एकच असली तरी त्याची जागा समूहानुसार जातीनुसार बदलते. एकाच धर्मात अनेक जाती आणि प्रत्येक जातीतील माणसाचे मृतदेह वेगवेगळय़ा जागेत विसर्जित करण्याची प्रथा आहे म्हणजे मृत्यूपश्‍चातही जातीव्यवस्था अजुनही किती घट्ट, मुळं रूतून बसलेली आहे याचा प्रत्यय देणारी आहे. हा मुद्दा भावनेशी निगडित असला तरीही वास्तवाचे भान येणे आवश्य़क आहे. एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. एकाच जातीतही उच्चनिच भेदभाव आलाच. गल्ली, वाडे, बेटं, जात, पोटजात, हलके भारी वगैरे. बर्‍याच गावच्या स्मशानभूमी शाळेच्या लगत आहेत काही जनावराच्या दवाखान्याजवळ आहेत काही माणसाच्या दवाखान्याजवळ, काही पाराजवळ, काही गावातच मध्यवर्ती ठिकाणी तर काही बाजार भरतो त्या ठिकाणी. वाढत्या लोकसंख्येबरोबर स्मशानभूमीचे प्रश्न अनेक आहेत. शासनांमार्फत स्मशानभूमीचे शेड , निवारा झाला त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. स्मशानभूमीचे काम तेही निकृष्ट.पत्रे उडालेले. कुणी लोखंड घेऊन पळालेले. तर काही ठिकाणी वेगळाच प्रकार. आतातर स्मशानभूमीवर अतिक्रमणही झालेले आहे. पावसाळय़ात होणारे हाल तर वेगळेच असतात.सरपण, रॉकेल, निवारा यांच्या उपलब्धतेवर काही बाबी अवलंबून असतात…अशा नाना तर्‍हा आहेत. माणूस गेल्यावर म्हणजे मृत झाल्यावर त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये पण याचवेळी सगळे जागे होतात. जाळण्यावरून पुरण्यावरून भांडणो सुरू होतात.सामाजिक तेढ निर्माण होते. एकतर स्मशानभूमीस पर्यायी जागा नसते किंवा त्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेले असते. त्याचा वाद एवढा विकोपाला जातो की बस्स ! विचारूच नका.

आता गावखेड्यात माणसं रानात घरे करून राहू लागली आहेत. रानातच अंत्यविधी करू लागली आहेत. त्यामुळे तिथे स्मशानभूमीचा वाद होत नाही. पण पुढे रानाच्या वाटण्या झाल्या तर जिथे शव जाळले तिथे दगडही राहत नाही. त्यावरूनही वाद होतोच.मृत व्यक्तीच्या नावे असलेली संपत्ती त्यावरून होणारे वाद तर वेगळेच आहेत. सरकारी सानुग्रह अनुदान जर काही मिळाले असेल तर सरकारीबाबूला त्यात काही वाटा असतो किंवा नातेवाईकाचा वाटणी करण्यावरून वाद होतो . म्हणजे जाणारा जातो जीवानिशी मागचे खेळती वाद! माणसं एकच असली तरी स्मशानभूमी मात्र वेगळी असते. जाणार्‍या माणसाला गेल्यानंतरही सुख लागू न देणारी ही जिवंत समस्त मानव जमात! मृतदेहाचे भांडवल करत वाद निर्माण करणारी माणसंच आहेत ना? शहरी संस्कृतीत अमरधाम, वैकुंठधाम निर्माण झाले आहेत. विद्युतदाहिनी असते.उत्तरक्रियेसाठी जागा असते. पण खेड्यातील स्मशानभूमी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरते. त्याच्या जोडीला स्मशानवैराग्याचे चिंतन असते. उत्तरक्रीयेत दातृत्व उफाळून येते. कालपरवा एका व्यक्तीने नन पायंडा पाडला . दशक्रिया विधी तिसर्‍या दिवशी करण्याचा. तो योग्य की अयोग्य यावरूनही वाद. माणसं शिकली पण सुशिक्षित किती झाली ? अभावानेच आढळतील.गरीब-श्रीमंत यांच्या किंवा जातीव्यवस्थेने निर्माण केलेली व्यवस्था जी स्मशानभूमी, मसनवटा, वैकुंठधाम, अमरधान अशी संबोधने दिलेली आहे त्यामध्ये तरी समता, समानता निर्माण व्हावी. अन्यथा पुढील पिढी प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. विविध सांप्रदायांनी, समुदायाने आणि तरूण पिढीने यावर एकत्रित विचार करावा.

-विठ्ठल जाधव,
शिरूरकासार, जि.बीड

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..