नवीन लेखन...

महालक्ष्मी अष्टकम् – मराठी अर्थासह

अनुष्टुभ् छंदात रचलेले व पद्म पुराणात आलेले श्री महालक्ष्मी अष्टकम् ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. ही समजण्यास अत्यंत सोपी भक्तिमय रचना भगवान इंद्रांनी दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली होती.


नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥

मराठी- जी ईश्वराची महान शक्ती आहे, श्रीपीठ हे जिचे आसन आहे, देव जिचे पूजन करतात, जिच्या हातात शंख,चक्र, आणि गदा आहेत, अशा महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

श्रीपीठ वसती, देवां पूज्य, शक्ती महा, गदा
शंख चक्र करी, वंदू महालक्ष्मी तुला सदा ॥ ०१


नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि ।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥

मराठी- जी गरुडावर बसली आहे, जिने कोलासुराचा वध केला आहे, जी (भक्तांच्या) सर्व पापांचा नाश करते अशा महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

वैनतेया वरी बैसे, ठार कोलासुरा करी ।
दुष्कृत्ये नाशिते सारी, प्रणाम तुज भास्करी ॥ ०२     (भास्करी- महालक्ष्मी)

टीप- या श्लोकातील ‘कोलासुरा’चा संदर्भ ज्याचे नाव कोल्हापुर नगरीला दिले गेले आहे व ज्याचा वध महालक्ष्मीने केला त्या कोलासुराशी आहे. ब्रह्मदेवाचे तीन पुत्र – गय,लवण आणि कोल. केशी राक्षसाशी लढून कोलासुर या प्रदेशाचा राजा झाला. पुढे युद्धात महालक्ष्मीने त्याचा वध केला.


सर्वज्ञे  सर्ववरदे  सर्वदुष्टभयंकरि ।
सर्वदुःखहरे  देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥

मराठी- जिला सर्व विषयांचे ज्ञान आहे, जी (भक्तांना) सर्व प्रकारचे वर देते, सर्व दुष्ट जनांचा नाश करते, सर्व दुःखांना पळवून लावते, अशा महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

सर्व जाणे, देतसे वर, दुःख सारे घालवी,
दुष्ट सारे नष्ट होती, प्रणाम तुज भार्गवी ॥    (भार्गवी – लक्ष्मी)


सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि ।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥

मराठी- (प्रसन्न झाल्यावर) जी कर्तृत्व, बुद्धी देते, जी आधिभौतिक संपत्ती तसेच मोक्ष देते, जी मंत्रोच्चारांनी सदैव पवित्र झालेली असते, अशा महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

बुद्धि कर्तृत्व संपत्ती मोक्ष देसी जनांप्रती
मंगला मंत्र उच्चारें, वंदितो नित प्रकृती ॥ ०४       (प्रकृती – लक्ष्मी)


आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि ।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥

मराठी- जिला सुरुवात नाही आणि शेवटही नाही, जी शक्तीस्वरूपात अगदी प्रथमपासून अस्तित्वात आहे, जी योगातून निर्माण झाली आणि योगाशी संलग्न आहे अशा महान देवते महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

मूळ वा अंतही नाही, शक्तिरूपे सदा वसे
निर्मिती योग संलग्न नमस्कार तुला असे ॥ ०५


स्थूलसूक्ष्ममहारौद्रे  महाशक्तिमहोदरे ।
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥

मराठी- जिची प्रखर शक्ती अतीव लहान प्रमाणापासून महान स्वरूपापर्यंत आहे, जिच्या अंगी प्रचंड शक्ती सामावलेली आहे, जी मोठमोठ्या पातकांचा नाश करते, अशा देवी महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

सान थोर जरी रूपे, शक्ती उग्र भयंकरी
प्रणाम तुजला देवी, दुष्कर्मे घोर संहरी ॥ ०६


पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि ।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥

मराठी- हे कमळामध्ये आसनस्थ, परब्रह्म स्वरूपी, सार्‍या जगताची आई असणार्‍या श्रेष्ठ देवते, महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

वसती कमळामध्ये जगता श्रेष्ठ माउली ।
परब्रह्म स्वरूपी, मी होतसे नत पाउली ॥ ०७


श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते ।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥८॥

मराठी- जिच्या वस्त्रांचा रंग पांढरा आहे, जी विविध दागिन्यांनी नटली आहे, जिने सर्व जग व्यापले आहे आणि सर्व जगताची जन्मदात्री माता आहे अशा महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.

शुभ्र वस्त्रे जिची, नाना दागिन्यांनी शोभली
माय सकलां, जगा व्यापी, होतो मी नत पाउली ॥ ०८


महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं  यः पठेद्भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धिमवाप्नोति  राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥

मराठी- जो भक्त हे महालक्ष्मीचे आठ श्लोकांचे स्तोत्र नेहेमी म्हणतो त्याला सर्व सिद्धी आणि राजवैभव प्राप्त होते.

आठ श्लोकी महालक्ष्मी स्तोत्र जो गात सर्वदा
भक्त लाभे तया सिद्धी आणि  राणीव संपदा ॥ ०९


एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥

मराठी- जो दररोज एकदा पठण करील, त्याची मोठी पातके नष्ट होतात. जो नेहेमी दोनदा पठण करील त्याला धन धान्य आदि संपत्ती प्राप्त होते.

एकदा रोज जो गाई नष्ट मोठी पातके
दोनदा गाउनी लाभे धान्य धन ही नेटके ॥ १०


त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् ।
महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

मराठी- जो रोज तीनदा पठण करील त्याच्या बलाढ्य शत्रूंचा नाश होतो आणि कल्याणकारी वर देणारी महालक्ष्मी त्याच्यावर नेहेमी प्रसन्न रहाते.

तीनदा रोज गाऊनी बलाढ्य रिपु हारतो ।
संतोषुनी महालक्ष्मी कल्याणी वर लाभतो ॥ ११

*********************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..