महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन जन्म. १४ जून १९४६
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले डॉ.रत्नाकर महाजन हे मुळचे पुण्याजवळील इंदापुरचे. आज ही त्यांची शेती व घर बाभुळगावात आहे. डॉ. रत्नाकर महाजन यांचे प्राथमिक शिक्षण इंदापुरमध्ये झाले. शालेय जीवनापासून त्यांची वैचारीक चळवळ समाजाप्रती चालू होती. त्यांना वाचनाची आवड होती. उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले, पुढे पुणेकरच झाले. डॉ. रत्नाकर महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, काही काळ नोकरी ही त्यांनी केली. याच काळात अनेकांशी त्यांचा संबंध आला.
शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाची आवड असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्यिक, लेखक व नामांकित विचारवंत यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर भाषावर त्यांचे प्रभुत्व व वाचन व अनुभव यातून त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय विचाराची पुस्तके लिहिली. समाजवाद व गांधी विचारांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. यक्रांद, सेवा दल, भारत जोडो अभियान, विद्यार्थी चळवळ यामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात त्यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला, त्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस एम जोशी, ना.ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला. समाजवादाचा पगडा असल्याने आगरकर व गांधीजींचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून, त्यांच्या पुरोगामी विचारांची शिदोरी जन सामान्यात रुजविण्याचे कार्य त्यांनी सतत केले.
हे सर्व उच्च पातळीवर करीत असताना ते इंदापुरच्या मातृभूमीला मात्र कधीही विसरले नाहीत. १९८६- ८७ च्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज, पाणी व रस्ता आदी लोकांच्या मूलभूत समस्यांसाठी डॉ. महाजन यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यात पायी पदयात्रा काढून जनजागृती केली. या काळात अनेक समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली होती. महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, किसन ताटे व सहकारी यांनी या फळीचे नेतृत्व केले. सेवा दलाच्या चळवळीतून ताटे यांनी तालुकाभर मोठा पुरोगामी विचारांचा समूह निर्माण केला होता. नागरिकांच्या प्रश्नासाठी इंदापूरसारखे आंदोलन डॉ . महाजन यांनी पुणे शहरात केले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला,
डॉ. रत्नाकर महाजन यांनी ‘लोकबोधिनी’ या सामाजिक सस्थेची स्थापना करून, महाविद्यालयीन युवक- युवतींना शिबिरातून प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु केले. दर वर्षी जानेवारी महिन्यात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तीन दिवसांचे युवक नेतृत्व शिबीर राज्यातील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात येते. त्यांचे बंधू डॉ.मुकुंद महाजन, डॉ. अशोक जोशी, डॉ. अविनाश अरगडे यांचेही लोकबोधिनीच्या कार्यात त्यांना सहकार्य मिळते. तसेच महाविद्यालयीन स्तरावर वाद – विवाद स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, गुटखा विरोधी आंदोलन आदी कार्यक्रम लोकबोधिनीतर्फे डॉ. महाजन यांनी अखंडितपणे राबविले.
त्यांच्या पत्नी हेमा महाजन यांची खंबीर साथ व असंख्य जोडलेले मित्र यांचा डॉ. महाजन यांना मोठा सहवास लाभला. देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकबोधिनीतर्फे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त डॉ. महाजन यांनी स्वातंत्र्य चळवळीवर विविध शाळांमध्ये सलग ५० व्याख्याने दिली. देशातील अनेक समाजीक प्रश्नावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केली. डॉ. महाजन यांची संविधानिक व वैचारिक चळवळ, अभ्यासू वृत्ती, समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी, कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्वक बोलणे, पुरोगामी विचारांचा पगडा आदी कारणामुळे त्यांना राजकारणातही चांगली संधी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना राज्य नियोजन मंडळाचे दोन टर्म कार्याध्यक्ष पद (कॅबिनेट मंत्री दर्जा) मिळाले. या काळात त्यांनी प्रस्तावित केलेला मानवी विकास अहवाल लोकाभिमुख झाला. काही राजकीय मतभिन्नतेमुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते पद त्यांना देण्यात आले. त्यांनी संविधान व धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देऊन आपले परखड विचार सातत्याने लोकांसमोर मांडले. आपल्या धर्मनिरपेक्ष विचाराशी ते नेहमी बांधील राहिले आहेत. पुरोगामी विचार समाजात रुजवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र असलेले जनमानसाची शिदोरी या मासिकांचे डॉ. रत्नाकर महाजन संपादक आहेत. आजही डॉ.रत्नाकर महाजन टीव्हीचॅनेल व सोशल मीडियावर आपणास ते त्यांची परखड भूमिका मांडताना दिसतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ प्रा.नागनाथ शिंगाडे.
पुणे.
Leave a Reply