महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या.
- महाभारताचा मूळ ग्रंथ ‘जय’ हा आहे, जो व्यासांनी रचलेला आहे . ( जय नाम इतिहासोऽयम्) . तो त्यांनी आपला पुत्र शुक याच्यासहित आपल्या ५ शिष्यांना सांगितला. त्यांच्यापैकी वैशंपायन यानें, त्याचें, अर्जुनाचा नातू जनमेजय याला, त्याच्या यज्ञात कथन केलें, तेव्हां त्याचें रूप ‘भारत’ असें झालें. पुढे, बर्याच काळानें जेव्हां सूत व सौती यांनी शौनकादि ऋषींना त्याचें कथन केलें, तेव्हां त्याचें उपकथानकांसह ‘महाभारत’ असें रूप झाले. म्हणजे, महाभारताचें मूळ रचयिता व्यास हे आहेत. आपल्याला या व्यासरचित रचनेतून, स्वत: महर्षि व्यास, महाभारत-कथा व तत्कालीन जनजीवन व प्रथा या सार्यांची माहिती मिळते.
- व्यासांचें एक नांव होतें ‘कृष्णद्वैपायन’. कृष्णद्वैपायन हें त्यांचे मूळ (खरें) नांव नसणार. म्हणजे, ज्याला आपण हल्ली ‘पाळण्यातलें नांव’ असें म्हणतो, तसें तें नसणार.
- ‘अयन’ म्हणजे भ्रमण, जाणें, चालणें , (जसें, राम + अयन = रामायण). हल्ली कृष्णायन, कर्णायन अशी शीर्षकें पुस्तकांना दिली जातात. त्यावरून एखाद्याला वाटेल की ‘अयन’ हा शब्द चरित्रासाठी, जीवनासाठी वापरला जात असेल ; पण तसें नाहीं, हें आपण आत्तां पाहिलेंच आहे.
- कृष्ण म्हणजे ‘श्याम, सावळा, काळा’. पूर्वी आपल्याकडे श्याम रंगाला ‘कमी लेखत’ नसत.
(ही, गोर्या रंगाला ‘अधिक चांगलें’ लेखायची जी मनोवृत्ती आहे, ती साहजिकच इंग्रजांनी भारतावर कब्जा केल्यानंतरची आहे. राज्यकर्ते ज्या रंगाचे, तो श्रेष्ठच असणार, अशी ही ‘डिफीटिस्ट’ मनोवृत्ती. असो, तो एक वेगळाच विषय आहे). दाशरथी राम हा श्याम रंगाचा होता. देवकीनंदन वासुदेव याला ‘कृष्ण’ हेंच नामाभिधान रूढ झालेलें आहे. तो सावळाच होता. त्याची, ‘श्याम’, ‘घनश्याम’, ‘साँवरा’,अशी नांवें हेंच दाखवतात. द्रौपदीचें ‘कृष्णा’ हें एक नांव आहे. तसेच व्यासांच्या नांवातील ‘कृष्ण’. आपले अनेक देवही श्याम वर्णाचे दाखवलेले असतात; किंवा निळ्या रंगाचे, म्हणजेच दीप्तीयुक्त श्याम वर्ण.
- आतां हें द्वैपायन मधील ‘द्वैप’ म्हणजे काय असावें ? ‘द्वैप’ हा शब्द ‘द्वीप’ या शब्दा पासून उद्भवलेला दिसतो. जसें ‘विधि’ ( म्हणजे न्याय, कायदा) यापासून ‘वैध’, ‘अवैध’ हें शब्द तयार झालेले आहेत, ‘दीन’ पासून ‘दैन्य’ , तसेंच हें.
- असें म्हणतात की व्यासांचा जन्म झाल्यावर त्यांना सत्यवतीनें एक द्वीपावर ठेवलें होते ; म्हणुन त्यांच्यासाठी द्वैपायन ही संज्ञा वापरली गेली. पण तसें असेल तर मग, त्याच्या नांवातील ‘अयन’ चा संबंध जोडला हात नाहीं. मला त्यांच्या नांवाचा अर्थ दिसतो, तो असा : भारत हें एक द्वीपकल्प आहे, हें आपल्याला माहीतच आहे. म्हणजे, ‘द्वैपायन’ याचा अर्थ झाला, ‘द्वीप अथवा द्वीपकल्पाचें परिभ्रमण करणारा’.
- म्हणजेच, व्यासांनी असें परिभ्रमण केल्यानंतर त्यांना ‘कृष्ण-द्वैपायन’ म्हणूं लागले असावेत.
- कृष्णद्वैपायन व्यास यांना ‘वेदव्यास’ असेंही म्हणतात. ‘व्यास’ हेंही कृष्णद्वैपायन यांचें मूळ नांव नाहीं.
खरें म्हणजे, या ऋषींच्या ‘वेदव्यास’ या नांवावरूनच , त्या नांवाचा अर्थ स्पष्ट आहे ; शब्दकोश पहायची आवश्यकता नाहीं. तरीही, आपण , शंका नको म्हणून, त्याचें सहाय्य घेऊं या. व्ही. एस्. आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी ‘व्यास’ या शब्दाचा अर्थ देते , Separation into parts, Analysis, Arrangement, Compilation ; An Arranger, A Compiler.
‘वेद’ हा शब्द ‘विद्’ या धातुपासून ( क्रियापदापासून) बनलेला आहे. विद् म्हणजे, ‘जाणणें’. वेद म्हणजे ‘ज्ञान’ किंवा ‘पवित्र learning (शिकवण/उद्.बोधन)’. भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असलेले (चार) ‘वेद’ याचा अर्थ हाच आहे.
म्हणजेच, व्यासांना ‘वेदव्यास’ म्हणतात, तें एक तर ‘वेदांचें पुनर्संकलन करणारे’ अशा अर्थानें , [किंवा ‘पवित्र learning (शिकवण/उद्.बोधन) ,म्हणजे वेद, यांचें ज्ञान असलेले, त्यांचें विश्लेषण करणारे’ अशा अर्थानें ], म्हटलें गेलें असावे .
महाभारतात व्यास म्हणतात की,‘अहम् वेत्ति शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा’. हें वचन ज़री व्यासांना कुरुक्षेत्र-युद्धाबद्दल अभिप्रेत असले, तरी, तें त्यांच्या वैदिक ज्ञानालाही तितकेंच लागू पडतें. व्यासपुत्र शुक हेंही अत्यंत ज्ञानी होतें. संजय याला ‘दिव्यदृष्टी’ होती म्हणतात, ( कारण तो कुरुक्षेत्रावरील घटना दररोज़ धृtराष्ट्राला सांगत असें. तसें असो वा नसो, पण संजय एक सूत होता. म्हणजेच, संजयाला व्यासांइतकें वेद-ज्ञान असणें शक्य नाहीं. ( यात मला त्याचा किंवा ‘सूत’ नामक तत्कालीन जनसमूहाचा अधिक्षेप करायचा नाहींये. पण सूतांचें कार्य हें ‘वेदांचें सखोल ज्ञान मिळवणें’ असें कधीच नव्हतें ). यावरून व्यासांच्या उच्च प्रतीच्या ज्ञानाची कांहींशी कल्पना येऊं शकते.
व्यासांनी वेदांचें वर्गीकरण केलें, पुनर्गठन केलें, असें म्हणतात. वेदांचा काळ व व्यासांचा काळ, यांच्यात खूपच, म्हणजे अनेक शतकें-सहस्त्रकांचें, अंतर होतें. त्यामुळे, वेदांचें पुनर्संगठन करणें व्यासांना आवश्यक वाटलें असावें. आपण असें एक मध्ययुगातलें उदाहरण पाहूं या. ज्ञानेश्वर व एकनाथ यांच्या काळात २००-३०० वर्षांचें अंतर आहे. त्यामुळे, एकनाथांच्या काळीं मराठी भाषेचेंही स्वरूप ज्ञानेश्वरकालापेक्षा बदललेलें होतें. त्यामुळे, एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या अंतरंगाला धक्का न लावतां, तिच्यातील क्षेपक (प्रक्षेप) काढून तिचें ‘शुद्धीकरण’ केलें. यासाठी एकनाथांना ज्या प्रती उपलब्ध झालेल्या असणार, त्या ज्ञानेश्वरकालीन होत्या कां ? त्या ‘Copy of Copy’ अशा पद्धतीच्या असणार, व ज्यात नकलून काढणारानें मूळ ज्ञानेश्वरकालीन शब्दाचें त्या नकलाकाराच्या काळात रूढ असललेलें रूप वापरलेलें असणार. इतिहासाचार्य राजवाडे सांगतात की हल्ली सर्वत्र उपलब्ध ज्ञानेश्वरी ही एकनाथकालीन आहे.
( राजवाडे यांना व आणखी एका गृहस्थ श्री. माडगांवकर यांनाही ज्ञानेश्वरीची जी प्रत मिळालेली आहे, ती ज्ञानदेवांच्या नंतर ३०-४० वर्षांनी लिखित प्रत आहे, असें म्हटलें जातें. मात्र कांहीं संशोघकांना तसें वाटत नाहीं ) .
वेदांचें पुनर्वगीकरण करायचें म्हणजे, एकतर चारी वेद संपूर्णपणें पाठ असायला हवेत . कारण, त्यावेळी लेखनकलेचा प्रसार कमीच होता, आणि लिखित पोथ्या ताडपत्र, भूर्जीपत्र असा व्हलनरेबल वस्तूंवर लिहिलें जायचें, त्यामुळें तशा पोथ्यांची संख्या कमीच असायची, आणि त्यांना वारंवार हाताळणेंही कठीणच. पण तसे, पाठ असणारे, लोक त्याकाळींच काय, नंतरच्या काळींही होतेच, (आजही आहेत) . द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी ही उपनामें (आडनावें) हेंच दाखवतात. ‘दशग्रंथी’ असें ज्यांना म्हणत असत (उदा. रावण हा दशग्रंथी होता, असें म्हणतात), त्या दश (दहा) ग्रंथामध्ये चार वेदांचा समावेश होताच. थोडक्यात काय, तर अगदी खूप नाहीं तरी बर्याच जणांना वेद पाठ असतील. पण वेदांचें वर्गीकरण व पुनर्संकलन करण्यासाठी त्याहीपेक्षा फार अधिक ज्ञानाची आवश्यकता आहे. तसें नसतें तर, ’चतुर्वेदी’ असणार्या लोकांना ‘वेद-शर्मा’ असें कांहीतरी नामाभिधान मिळालें नसतें काय ? त्यातून, हें पुनर्गठनाचें काम मौखिक स्वरूपात करायचें म्हणजे तर महाकर्मकठीण काम ! तें व्यासांनी साध्य केलें, यावरून, व्यासांच्या अति-श्रेष्ठ ज्ञानाची, तसेंच दीर्घकालीन श्रमांची खरी कल्पना येऊं शकते.
- पुरातन काळातील आणखी एका व्यासांचा उल्लेख येतो, ते म्हणजे बादरायण व्यास. बादरायण व्यासाचेंही नांव आपल्याला परिचित आहे, कारण ‘बादरायण संबंध’ असा वाक्प्रचार आपल्याला माहीत आहे. ( बादरायण संबंध याचा ‘far-fetched’ हा अर्थ नंतरच्या काळात बनलेला असावा, जसें ‘कौटल्य’चें नंतरच्या काळात ‘कौटिल्य’ झालें; किंवा, नाटक-कादंबर्यांमधून शिवपुत्र संभाजी याचें ‘विकृत’, अवास्तव चित्रण केले गेलें) . मुख्य म्हणजे, वेदांचें पुनर्वर्गीकरण व पुनर्संगठन करण्यांसाठी विविध ऋचांचे व गद्य उतार्यांचे, त्यांच्या वर्ण्य विषयांचे, व त्यांच्या कर्त्यांचे संबंध जोडणें आवश्यक ठरतें.
- कृष्णद्वैपायन व्यास वेगळे, आणि बादरायण व्यास वेगळे ; की दोघेही एकच ?
- या बादरायण नांवातही ‘अयन’ म्हणजे भ्रमण आहेच ! (बादर + अयन = बादरायण ), ‘बादर’ या शब्दाचे एकाहून अधिक अर्थ आहेत, जसें की, कापसाचें झाड, रेशीम इ. पण, आपल्याला सुसंगत वाटणारा अर्थ आहे, ‘पाणी’. ( जातां जातां : पाणी आणि ढग यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. संस्कृतमध्ये ढगाला एक नांव आहे – ‘जल-द’. या, पाणी व ढग यांच्या संबंधातूनच प्राकृत ( हिंदी ) मधील ‘बादल’, ‘बदरा’ हे शब्द आले असणार, हें उघड आहे ).
- ‘बादर’ म्हणजे ‘पाणी’ यावरून, बादरायण याचा अर्थ होतो , ‘पाण्याचें परिभ्रमण करणारा’. म्हणजेच, भारतीय द्वीपकल्पाचें समुद्री मार्गानें ( किंवा समुद्रालगतच्या मार्गानें) परिभ्रमण करणारा. त्यावरून कृष्णद्वैपायन व्यास व बादरायण व्यास हे एकच, असा निष्कर्ष निघतो. या एकत्वाला आणखी एक प्रमाण आहे. व्यासपुत्र शुकाचार्य यांना ‘बादरायणि’ असें एक नांव आहे. त्यावरून ते, बादरायण यांचे पुत्र आहेत, हें दिसून येते. या शुकांचा उल्लेख महाभारताही दिसतो, व ते, ग्रंथरचयिता व्यास यांचे पुत्र होते. व्यासांचें एक वचनही आपण वर पाहिलेंच आहे, जिथें शुकांचा व त्यांच्या ज्ञानाचा स्पष्ट उल्लेख आहे, ‘अहम् वेत्ति शुको वेत्ति..’ . त्यामुळे, यातूनही कृष्णद्वैपायन व बादरायण यांचें एकत्व सिद्ध होतें.
(नंतरच्या काळातही बादरायण होऊन गेले,असें दिसतें. पण ते वेगळे. व्यक्तिनामें व / किंवा उपाधी repeat होणें ही त्या काळातील एक सामान्य गोष्ट होती ) .
- म्हणजे बघा, एवढ्या ज्ञानी महा-ऋषीचें खरें नांव ( ‘पाळण्यातलें’ मूळ नांव ) आपल्याला माहीतच नाहीं. ( महाभारतातील व्यक्तिनामें, तसेंच वेद, रामायण यांतील नामें, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. त्याबद्दलची चर्चा तूर्तास बाजूला ठेवूं या ).
- पण, आपल्याला व्यासांशी संबंधित जो मुद्दा पहायचा आहे, तो पुढेच आहे; आणि तो फार महत्वाचा आहे.
त्यातून आपल्याला त्याकाळातील जनरीतींची कांहीं कल्पना येऊं शकते.
- व्यास हे ऋषि होते, ब्राह्मण होते. या व्यासांचे पिता होते पराशर ऋषि आणि माता होती सत्यवती ही कोळीकन्या. ती कुमारिका असतांना व्यासांचा जन्म झाला. या सत्यवतीचे, व्यास यांच्या जन्मानंतर कांहीं कालानें, हस्तिनापुरचा राजा शंतनू/ शांतनु याच्याशी लग्न झाले. म्हणजे, भीष्म हे सत्यवतीचे सावत्र पुत्र बनले, व व्यास आणि भीष्म हे सावत्र भाऊ.
- कोणालाही असा प्रश्न पडूं शकतो की, माता जर कोळीण होती, तर मग व्यास हे ब्राह्मण कसे ? याचें स्पष्टीकरण असें की, व्यासाचा पिता पराशर हा ब्राह्मण होता, म्हणून व्यास हे ब्राह्मण ठरले. भीष्म यांचा पिता शंतनू हा क्षत्रिय होता , (भीष्मांची माता गंगा हिचें कुल काय म्हणायचें ? ), म्हणून भीष्म हे क्षत्रिय.
- त्या काळी अनुलोम-प्रतिलोम विवाह होत असत, ( म्हणजे, पुरुष एका वर्णाचा व स्त्री अन्य वर्णाची). अशा विवाहातून उत्पन्न झालेल्या संतानांची कशी वर्ण-व्यवस्था लावायची, याचे नियम बनलेले होते, एक सामाजिक व्यवस्था लावून दिलेली होती. मध्य-युगातले ‘वाळीत टाकणें’ ; किंवा आज अगदी २०व्या-२१व्या-शतकातही, तशा प्रकारचा विवाह केल्यास, नातेवाईकांनी किंवा गांवकर्यांनी, तो पुरुष आणि/ व ती स्त्री यांचे खून पाडणें, ‘खप’ पंचायतीनें त्यावर निर्णय देणें, ‘Love Jehad’, असा ‘माहौल’ त्या काळीं, वर्णाबाहेर (आज, जातीबाहेर) लग्न केल्यास, नव्हता. त्या दृष्टीनें पाहिल्यास, भारतीय समाज हा काळाबरोबर पुढे जाण्याऐवजी, प्रगत होण्याऐवजी, प्रतिगामी बनला काय, असा विचार मनात येतो.
- व्यासांचा जन्म कसा झाला ? सत्यवतीच्या पित्याचा व्यवसाय एक होता ‘लोकांना होडीतून नदीच्या एका तटावरून पलिकडच्या तटावर घेऊन जाणें. अशीच एकदा सत्यवती पराशर ऋषींना होडीतून पैलतीरी घेऊन जात होती. सत्यवतीचें तारुण्य पाहून पराशर ऋषि काममोहित झाले, व त्यांनी तिथेच सत्यवतीशी समागम करण्याची इच्छास प्रगट केली, व तिची संमती मिळाल्यावर तिथेंच समागम केलाही . त्या समागमातून व्यासांचा जन्म झाला. अर्थात, हा समागम हें गुपित नव्हतें, नाहींतर व्यासांना ब्राह्मणत्व मिळालेंच नसतें.
- ( कुंतीनें कौमार्यात जन्म दिलेल्या कर्णाचें जन्मरहस्य गुप्त ठेवलें, त्याचें कारण, ती राजकन्या होती, हें होतें. पण, त्यामुळे कर्णाच्या आयुष्याची कशी परवड झाली, हें आपण जाणतोच. व्यासांची माता सत्यवती ही घीवरकन्या असल्यामुळे तिच्यावर कुंतीसारखें कांहीं बंधन नव्हतें, हें एकपरीनें व्यासांचें भाग्यच ! ).
- या, पराशर ऋषि व सत्यवती यांच्या समागमाच्या निमित्तानें आपण ऋषींविषयी जराशी general चर्चा करूं या.
- तुमच्यामाझ्यासारख्या अनेकांचा असा समज असतो की ऋषि हे निर्मोही असत, काम-क्रोधादि षड्रिपूंच्या पल्याड गेलेले असत. पण सर्वच ऋषि असे नव्हते. (नाहींतर, ‘शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचें’ अशासारखें वचन अस्तित्वातच आलें नसतें ).
- ऋषींची अशी बरीच उदाहरणें आहेत. कोणी मोहित होतो, कुणाचें वीर्यस्खलन होतें, तर कुणाचा तपोभंगही होतो. विश्वमित्राचा असा तपोभंग करून त्याला काममोहित करण्यासाठी इंद्रानें मेनका या अप्सरेस घाडलें होतें,व ती त्या उद्देशात सफलही झाली. त्या समागमातून शकुंतला हिचा जन्म झाला.
- असेंच, आपल्याला अनेक ऋषी खूप रागीटही असलेले आढळतात. दुर्वास तर रागीट म्हणून प्रसिद्धच आहेत. त्यांच्या कोपाला भलेभले घाबरत असत.
- आधीच्या काळातही आपल्याला असे ऋषि आढळतात.
- जमदग्नी ऋषींनीही आपला पुत्र परशुराम याला , आपली पत्नी , व त्याची माता, रेणुका हिचें डोकें उडवायला संगितलें होतें ( व त्यानें तें केलेंही).
- अहिल्येचा पति, ऋषि गौतम यानें रागावून तिला शाप दिला व तिला शिळा बनवून टाकलें. जरी पतीच्या दृष्टीनें, अहिल्येकडून अयोग्य कृत्य झालें होतें, तरी तिला सजा मात्र फार मोठी मिळाली !
- याचा अर्थ एवढाच की, प्रत्येक ऋषि म्हणजे, अतिश्रेष्ठ मानसिक व आध्यात्मिक पातळीवर पोलेली व्यक्ती, असें नसून ; ऋषि म्हणजे स्वत:च्या मानसिक आणि आध्यात्मिक उत्थानाचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती, अशी खरी परिस्थिती होती.
- व्यासपिता पराशर हेही ऋषीच होते. म्हणजे, ते तपादि आचरण करत असणारच. अशा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती झालेली असायला हवी; स्वत:च्या भावना, स्वत:चे विकार त्यांच्या तब्यात असायला हवेत. साधारण माणून जर काममोहित झाला तर तें समजूं शकतें, कारण ‘सेक्स’ ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. पण तपोनिधी ऋषींकडून तसें वर्तन अपेक्षित नाहीं. पण पहा, पराशर हे ज्ञानी ऋषि खरे ; पण त्यांनाही लावण्यवती स्त्री पाहून मोह झाला, तो त्यांनी तेथेंच व्यक्तही केला, आणि समागमही नंतर इतरत्र नाहीच, तर तिथें नौकेतच केला ! ज्ञानवंतही किती स्खलनशील असतात !
- व्यासांचें मोठेंपण हें की त्यांनी स्वत:च्या जन्माबद्दलचाही उघडपणें उल्लेख केला.
- व्यास लहानपणापासूनच मातेपासून दूर राहिले, व त्यांनी तप आणि अध्ययन केलें. पुढे, सत्यवती-पुत्र विचित्रवीर्य याच्या निपुत्रिक निधनानंतर सत्यावतीनें आपल्या सुनांबरोबर नियोगांसाठी व्यासांना पाचारण केलें. व्यासांच्या दृष्टीनें ते नियोग म्हणजे आपण केलेलें कर्तव्यपालनच होतें. अंबिक-अंबालिका यांच्या दृष्टीनें त्याला एक भिन्न अर्थ होता. ती एक वेगळीच कहाणी आहे ( तिच्यावर चर्चा मी माझ्या एक अन्य लेखात केलेली आहे).
- व्यासांच्या या नियोगांनंतर धृतराष्ट्र व पंडु ( आणि विदुर) यांचा जन्म झाला. धृतराष्ट्राचे पुत्र (दुर्योधनादि कौरव) आणि पंडूचे पुत्र ( युधिष्ठिरादि पांडव) यांची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. त्या चुलत- भावांच्यात राज्यावरून संघर्ष निर्माण झाला, ज्यातून कुरुक्षेत्रावरील महाभारतीय युद्ध झालें. म्हणजेंच, धृतराष्ट्र व पंडु यांच्या जन्माला कारणीभूत ठरलेले, त्यांचे Biological Father व्यास यांचे नियोग या युद्धाला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत झाले.
- व्यासांनी ‘जय’ ग्रंथाच्या स्वरूपात महाभारताची रचना तर केलीच, पण ,कुरुश्रेत्रावरील महाभारतीय युद्धालाही ते अशाप्रकारें अप्रत्यक्षरीतीनें कारणीभूत ठरले.
- महाभारतात ‘ऊर्ध्व बाहो’ अशा प्रकारचा श्लोक आहे, ज्याचा अर्थ आहे की, ‘मी बाहू उंच करून ओरडतो आहे, पण कुणीही माझें ऐकत नाहीं’. जरी हें वाक्य कृष्णाच्या तोंडी व्यासांनी घातलें असलें, तरी तो श्लोक रचतांना व्यासांच्या मनातील आक्रोशच बाहेर पडला, असें वाटतें. मातेच्या विनंतीला मान देऊन जो कुरुवंश वाढायला व्यासांनी नियोगाद्वारें निस्वार्थीपणानें मदत केली, त्याचा एवढा विनाश, आणि तत्कालीन भारतवर्षामधील क्षत्रिय, सेनानी व सैनिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विध्वंस त्यांना पहावा लागला, याहून मोठें दुर्भाग्य तें काय ?
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in