१९७५ साल ! जूनी ११ वीची परीक्षा संपली होती. त्या सुमारास आमच्या घरी सुभाषकाका आले होते. परीक्षा संपल्याच्या आनंदात ते मला आणि माझ्या भावाला उमा टॉकीज मध्ये नुकताच लागलेला “रोटी कपडा और मकान ” चा ९.३० चा शो बघायला घेऊन गेले.
तेव्हापासून लता-मुकेशच्या “मैं ना भुलुंगा ” चे गारुड अजूनही अबाधित आहे.
आधी हे गाणं प्रेमगीताच्या रूपात- टीव्ही स्टुडिओत ! काळ्या -पांढऱ्याच्या जमान्यातून मनोज-झीनत च्या स्वप्न दुनियेत घेऊन जातं. राज कपूरने “आवारा” मध्ये एक भव्य-दिव्य स्वप्नदृश्य आपल्याला दाखविलं होतं. त्यानंतर मनोजचे हे देखणं / लोभस/ रंगीत/जीवन-वाटेवरच्या टप्प्यांना स्पर्शणारं स्वप्नदृश्य !तेथून चित्रपटाचा मध्यमवर्गी पोत बदलला. वाममार्गाने श्रीमंतीच्या वाटेने निघालेला मनोज, ट्रॅक बदलून शशीच्या मागे लागलेली झीनत, मधूनच मौशुमीचे खळाळतं, निर्व्याज सुखद दर्शन, सोबतीला लक्षात राहणारा प्रेमनाथ. आणि अचानक एका पार्टीत जुन्या जखमांवरील खपल्या काढणारा जुना मित्र भेटतो. आता गाणं थोड्या उंचीवर चढतं – सुंदर सिनेमॅटोग्राफी, शशी कपूरला उमजणारं ज्ञान वगैरे ! आता हे गाणं आतमध्ये रुजतं.
प्रेमाच्या रंगापेक्षा विरह केव्हाही अधिक घायाळ करणारा असतो, हा जागतिक अनुभव. वाटलं प्रकरण इथेच संपलं. पण नाही.
मनोजला आणखी उंची, वेदना अभिप्रेत असते. आता गाण्यातील शब्दांच्या जोडीला सिच्युएशन, अभिनय,संवाद, आणि सूचक दिग्दर्शनाच्या ढोबळ, ठराविक ट्रिक्स ! पण भिडून जाणाऱ्या.
जखमी मनोजला वाचविण्यासाठी तितकीच विद्ध (शरीरातील गोळीमुळे आणि फसवणुकीच्या मानसिक पश्चात्तापाने ) झीनत जीप घेऊन निघते. आता जुनी जवळीक आणखी जवळ येते. तो म्हणतो-
“असं बोलते आहेस की जणू तुला गोळीच्या जखमेच्या वेदना माहित आहेत.”
“गोळी तुला लागली काय अन मला लागली काय, वेदना शेवटी दोघांनाही होणार ना?”तिचं उत्तर आणि त्यावर मनोजचं समंजस हास्य – आता काहीही दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलं आहे,हे सुचविणारं !
यथावकाश त्याला तिच्या जखमेबद्दल कळतं. पण त्याआधी मनोजच्या जखमेतील रक्त तिच्या सिंदूरमध्ये (ठरवून) टपकत राहतं – “आ तेरी मैं मांग सजा दू ! ”
ओळी प्रसंगाला चिकटतात त्या अशा.
पुन्हा शशीच्या हाती आपल्या प्रेयसीला सोपवून मनोज निघून जातो. आता जुन्या-नव्या प्रेयसीची भेट होते. ” तुम्हे मेरे भारत की सौगंध ” अशा शब्दांत दोघींमध्ये घायाळ देवाण-घेवाण होते. आणि शीतल (झीनत) जाते. ” मैं बन जाऊ साँस आखरी, तू जीवन बन जा !” “अतूट “नात्याच्या संदर्भातील लताच्या या ओळी येतात. शीतल गेल्यावर हवेची एक मोठी लांबलचक झुळूक दूरवर प्रवास करून जखमी भारतला भेटायला जाते. तो त्या स्पर्शाने अंतर्बाह्य थरारतो. शीतलच्या वाईट बातमीने त्याला जणू हलवलंय आणि हे फक्त “या ह्रदयीचे त्या हृदयीच ” कळू शकते.
अमिताभ त्याला समजावतो, पण मनोज म्हणतो – ” अगर कुछ नहीं होना होता,तो इतना कुछ नहीं होता I ”
चित्रपट पुढे जात असला तरी अस्सल अभिप्रेत असलेली प्रेमकहाणी इथेच संपते.
आता यातले शशी, प्रेमनाथ,मुकेश हयात नाहीत. अमिताभ सोडला तर बाकी सारे अस्तंगत होत आलेत पण “प्यार के नगमे ” काळावर कधी,कसे,कितीकाळ कोरले जातात हे सांगता येत नाही. हे गाणं आणि लता-मुकेशच्या आवाजाला “भूलणे “मात्र अशक्य आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply