१९८५ या वर्षी त्यांचं वय होतं एकाहत्तर !
व्यवसायानं डॉक्टर. पण वाचनाचा प्रचंड सोस.
वाचल्यानंतर लेखकाला परखड मते लगेच कळविण्याची हौस.
ए फोर साईझची पाठपोट लेखन केलेली दोन दोन पानी पत्रे.
अर्ध्या पोस्टकार्डावर जेवढा मजकूर लिहिला जाईल तेवढा मजकूर त्यातल्या एका पानावर मावलेला असायचा.
कापऱ्या हातांनी लिहिलेलं आहे हे सहज लक्षात यावं असं मोठं आणि थरथरतं अक्षर.
कल्याण मध्ये दवाखाना, सांपत्तिक स्थिती चांगली पण लेखनिक न घेता स्वतः लिहिण्याची, ते व्यवस्थित लिफाफ्यात भरून, पोस्टात नेऊन देण्याची प्रचंड उर्मी. त्या दमणुकीतून मिळणारं आत्मिक समाधान, हे त्यांचं टॉनिक होतं.
हे सर्व मला त्यांनीच लिहून सांगितलं होतं.
त्यांचं नाव डॉ. द. रा. पटवर्धन.
‘ गेले चार महिने क्रमशः प्रसिद्ध होणारी तुमची शेंबी ही कादंबरी मी उदमेखून वाचत आहे, पुनःपुन्हा वाचत आहे. भाषा अत्यंत ओघवती, विलक्षण मधुर.कोकण उभे करणारी.’
हा पहिल्या पत्रातील मजकूर.
किती लिहावं आणि काय लिहावं असा प्रश्न पडल्यावर जी भावना मनात येते ना, ती ते कागदावर उतरवत होते.
– त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक पत्रात वेगवेगळी विशेषणे. लेखनाचा गुणगौरव.
आणि काहीवेळेला स्पष्ट शब्दात नाराजी.
ते मूळचे देवरुखचे पण नंतर त्यांनी देवरुख सोडले.
त्यामुळे कोकणच्या पार्श्वभूमीवरील कथानकात त्यांना प्रचंड रस असायचा.
‘ आगामी कादंबरीचे नाव आणि विषय कळवू नका, मला औत्सुक्य राहू दे ‘
असा प्रेमळ दम पण त्यांनी दिला होता.
त्याला कारण घडले होते.
माझ्या काही कादंबऱ्या जत्रा साप्ताहिकात प्रकाशित होत होत्या.
पण मेनका मासिकामध्ये केवळ माझ्या कथा प्रसिद्ध होत होत्या. दोन्ही एकाच प्रकाशनाची अपत्ये होती.
खास वेगळं कथानक घेऊन मेनका अंकासाठी क्रमशः कादंबरीची योजना राजाभाऊ बेहेरे आखत होते, त्यामुळे चार महिने मला त्यावर लक्ष केंद्रित करावं लागलं.
मेनका वा जत्रा मध्ये मी दिसत नाही म्हटल्यावर डॉ. पटवर्धन यांचं तब्येतीविषयी चौकशी करणारं पत्र आलं. मेडिकलची काही गरज असेल तर कळवा असं सांगणारं त्यांचं पत्र वाचून खूपच हळवं व्हायला झालं.
मी नव्या कादंबरीत गुंतलो आहे हे त्यांना कळवलं.
तेव्हा त्यांनी मला लगेच कळवलं,
‘ मग हरकत नाही, कादंबरीचं नाव आणि कथानक कळवू नका.’
माझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला.
त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही.
पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे.
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
सोशल मिडियावरच्या या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे.
रत्नागिरीच्या प्रा. तगारे सर यांनी कळविले आहे, की
‘ मनातील भाव अगदी बोलीभाषेत असावेत तसे उमटले आहेत.’
तर ठाण्याच्या सौ. अंजलीताई आंबर्डेकर लिहितात,
‘ बोन्द्रे यांचं पत्र आपुलकीनं ओतप्रोत भरलं आहे. कोकणच्या माणसांचा स्वभावच असा आपलंसं करणारा असतो.आपल्या माणसांचं कौतुक करणारा आणि ते करताना कुठेही कमी न पडणारा. अक्षर तर अप्रतिमच ! छान वाटलं आणि भरून आलं एवढा आपलेपणा पाहून ‘
सर्वांना धन्यवाद !
( अन्य प्रतिक्रिया पुढील लेखात )
Leave a Reply