आम्ही लहान असल्यापासून आम्हाला शेतावर जायची सवय बाबांनी लावल्यामुळे शेती, शेतीचे काम आणि शेतातील माती जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिली. लहान असताना आमच्या घरात तीन तीन बैलजोड्या असल्याचे आठवतं. शहाबाजच्या आजोबांनी मी सात आठ वर्षांचा असताना दिलेली पांढरी शुभ्र बैल जोडी तर अजूनसुद्धा डोळ्यासमोर उभी राहते. त्या जोडीमध्ये एक बैल सर्वसाधारण बैलांप्रमाणेच पांढरा शुभ्र होता. पण जो दुसरा बैल होता त्याचे शिंग इतर बैलांप्रमाणे मागच्या बाजूस वाकलेले नव्हते. त्याची शिंग खूप मोठी होती पण ती समोरच्या बाजूला वाकलेली होती. काळपट आणि तांबूस रंगाची त्याची रुबाबदार शिंग आणि धष्टपुष्टपणा पाहून त्याच्या वाटेल जायची कोणाची हिम्मत नव्हती होत. हा बैल रस्त्याने जाताना दिसला की सगळी लोक तो नजरेआड होईपर्यंत त्याच्याकडे बघत असत. बैल बघण्यात कोण कशाला वेळ घालवेल पण त्याचा रुबाब आणि ऐटबाज चालच अशी होती की त्याला बघता बघता कोणालाही त्याच्यावरून नजर काढणे जीवावर यावे. या बैलाला ढवळ्या पवळ्या किंवा सोन्या अशी नाव नाही दिली कोणी तो ओळखला आणि बोलावला जायचा तो त्याच्या शिंगांमुळे, त्याला सगळे मोठ्या शिंगांचा बैल असेच बोलायचे. त्याचे पाणीदार डोळ्यात पाहिलं की आपलेपणाची जाणीव व्हायची. असा दुधासारखा पांढरा शुभ्र आणि रुबाबदार व धिप्पाड बैल ज्याची शिंग अगदी तुतारी सारखीच पण पाठीवर न येता समोरच्या बाजूला वाकलेली त्याला पाहिल्यावर सगळे लांब लांब पळायचे. पण या मोठ्या शिंगांच्या बैलाने कधीच कोणाला मारलं नाही. त्याच्या उलट त्याचा जोडीदार शिंग लहान पण समोर येईल त्याला त्या शिंगांवर घ्यायला बघणार. भात पेरणीच्या वेळी उखळण काढताना राबावरच्या काळ्या राखेतून उगवलेले गवताचे कोवळे कोवळे अंकुर अर्धवट जळलेला पाला पाचोळा पावसामुळे अर्धवट बुजलेल्या भेगा या सर्वांवरून नांगर फिरवला जायचा. नांगर खोलवर जावा म्हणून नांगरावर वजन म्हणून दगड ठेवला जायचा. पण तोच दगड काढून नांगरावर दोन्ही पाय दुमडून मीच बसायचो मग माझे बाबा नाहीतर आमचा मोठा बाबा जो कोणी असेल तो वळ इकडे, हो पुढे, चल जोरात,थांब थांब असे बोलून नांगर हाकायचे आणि विशेष म्हणजे बैल सुद्धा अज्ञाधारकपणे ते सांगतील तसं करायचे. हे सगळं पाहून स्वतः जेव्हा थोडा मोठा होऊन नांगर हाकलायला लागेपर्यंत सगळं चमत्कारिक वाटायचं. उखळणी झाल्यावर बाबाच भात पेरायचे तसं अजूनही तेच पेरतात दरवर्षी पण आता 10 वर्षांपूर्वीच बैल जोड्या आणि नांगर जाऊन पॉवर टिलर आलेत त्यामुळे भात पेरणीची मजा आणि सोहळा जवळपास नाहीच असा प्रकार झाला आहे.
भात पेरून झाल्यावर त्याच्यावर दात आळं फिरवलं जायचं आणि भाताचं बियाणं गाडलं जायचं. त्यावर लगेच पाऊस पडला की दोन दिवसात पांढरे पांढरे अंकुर काळ्या झालेल्या मातीतून डोकं वर काढताना दिसायचे आणखी काही दिवसात पांढरा रंग पोपटी आणि आठवडाभरात हिरवागार झालेला दिसायचा. पंधरा एक दिवसांनी खत मारून झाल्यावर मग लावणीची लगबग. लावणीला शेतात चिखळणीसाठी दोन दोन नांगर हाकलायला लागायचे मोठा बाबा बोलायचा इकरूनन तिकरुन जरासा घाटलला क व्हला चिखोल आणि 4 वाजता चहा पिऊन झाल्यावर बोलायचा आता तासभर करू मंग उंद्याला बघू नायतरी आज कई व्हनार नाय ना उंद्या कई राहनार नाय.
लावणीसाठी माणसं आणायची आणि मिळायची कटकट लहान असल्यापासूनच बघतोय त्यामुळे त्यात काही नाविन्य नाही. पूर्वी माणसं आणायला वाहनांची सोय नव्हती हल्ली माणसं आणायला वाहनं असतात पण माणसचं नसतात यायला. मोठ्या शिंगांच्या बैलाची जोडी मधला मोठ्या शिंगांचाच बैल पहिले वारला घरात सगळ्यांनाच खूप वाईट वाटलेलं आठवतंय. कोणी कोणी जेवलं नव्हतं तर कोणाचे डोळे पाणावले होते. आमच्या शेतातच खड्डा करून त्याला पुरण्यात आलं होतं. त्याचे शानदार शिंग जमिनीच्या बाहेर राहतील असे ठेऊन त्याला मातीखाली गाडलं गेलं होतं. या बैलजोडीनंतर आमचे बैल 5 मग 4 नंतर 3 नंतर 2 आणि शेवटी शेवटी एकच असे राहिले. शेवटी जो बैल राहिला होता तो वासरू असतांनाच त्याला आणलं होतं मांडव्यावरून आमच घर गावात आणि शेतावर मोठा बाबा राहायचा तो शेतावर असेपर्यंत बैलांची चिंता नसायची. पण एकच बैल राहिला असताना शेतावर कोणीच नव्हतं राहायला. त्यामुळे त्या एकट्याला पाणी पाजायला, चरायला सोडायला आणि पेंडा घालायला शेतावर सकाळ संध्याकाळ चकरा मारायला लागायच्या. बाबांच्या बुलेटचा आवाज ऐकला कि बैल बुलेटचा आवाज येईल त्या दिशेकडे जो नजर खिळवून बघत रहायचा. जोपर्यंत बाबा त्याच्याजवळ जाऊन त्याला सोडून त्याच्या अंगावर हात फिरवत नसत तोपर्यंत तो बाबांवरून त्याची नजर काढत नसे. त्याला चारा पाणी करून पुन्हा बांधलं कि पुन्हा बाबांची बुलेट घराच्या रस्त्याला लागेपर्यंत हा बैल त्या दिशेकडे टक लावून बघत रहायचा. काळ्या रंगाचा हा अत्यंत आकर्षक आणि माणसाळलेला बैल त्याची देखभाल करता येणं गैरसोयीचे झाल्याने त्याला बाबांच्या जवळच्या मित्रांकडे विकून टाकले. शेती आणि माती आणि त्या मातीत काम करणारी अशी सोन्यासारखी जनावरं म्हणजे आम्हाला लाभलेलं पशुधन आणि आमची खरी दौलत होती अस राहून राहून वाटत असतं.
आमच्या विहिरीत असलेलं नितळ पाणी पाहिलं आणि हातात घेतलं कि हीच आपली संपत्ती असं वाटतं. शेतावर असलेली झाडे पाने, शेतांचे बांध, खळा, भाजीचा मळा आणि शेतातली माती हे सगळं पाहिलं की हा सगळा आपला वारसा असल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
मेथी, कोथिंबीर,वांगी, टोमॅटो,मिरची,माठ पालक आणि मुळा या सगळ्यानी आवंदा फुलणार आहे आमचा मळा.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी,ठाणे.
Leave a Reply