रम्य वातावरण, आसमंतात पसरलेला मंद अगरबत्तीचा सुगंध, फुलांच्या पाकळ्यांची आकर्षक रांगोळी, घंटांचा नाद आणि दैवी प्रतिमांची लोभस मूर्ती.. .. किती सुंदर ते दृश्य. मंदिरात जाऊन आपण सुख-दुःख, मनातल्या भावना share करतो. मनामध्ये विचार येतो की घरामध्ये देव्हारा असून ही देऊळात जायची ओढ सर्वांना का असते? घरात ही पूजा अर्चना रोज करतो पण मंदिराचे ते रम्य वातावरण घरात जाणवत नाही. ती ऊर्जा, शांती-सुखाचे प्रकंपन आपल्याला आपल्या घरात मिळत नाहीत. सध्याची परिस्थिती बघता ते वातावरण घरात निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते आपण करू शकतो.
मंदिराचे वातावरण बनवणारे आपणच आहोत ना. देऊळामध्ये शुद्ध मन, मंत्र उच्चारण आणि सेवाभाव असतो अर्थात मन, वचन आ कर्म ह्या तीन ही गोष्टी पवित्र असतात. प्रत्येक जण तिथे गेल्यावर कोणा बद्दल ही वाईट चिंतू नये ह्यावर लक्ष्य देतात. तसेच प्रत्येकाच्या मुखी नामस्मरण अर्थात अधिक ऊर्जा निर्माण करणारे सकारात्मक शब्द असतात व त्याच बरोबर कोणतेही कर्म सेवाभावनेने केले जाते. सकाळी काकड आरतीच्या आधी मंदिराची साफ सफाई करण्याची, परिसरातला केर काढण्याची सेवा मिळावी म्हणून खास वाट बघत उभे राहणारे भक्त ही बघितले असतील. छोटेसे कर्म पण त्यातही सेवाभाव असतो. बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता ह्यावर ही लक्ष दिले जाते म्हणून त्या वातावरणात आलेला प्रत्येक व्यक्ति सकारात्मक उर्जेचा अनुभव घेऊन जीवनात काही करण्याची नवी चेतना मिळवतो. हे सर्व निर्माण करणारे आपणच आहोत हे मात्र विसरू नका.
‘शोधीसी मानवा राउळी, मंदिरी,
नांदतो देव हा आपुल्या अंतरी,’
जसे मंत्र उच्चारणाने एक वेगळीच शक्ति निर्माण होते ह्याचा अनुभव आपण सर्वांनी केलाच असेल. मंत्र म्हणजेच मनाचे तंत्र. मनाला काही नियमांमध्ये चालवण्याची शक्ति ज्यांनी आत्मसात केली त्यांच्या उच्चारणात ही ती शक्ति येते. जर आपण ही सतत मनाला सकारात्मक, शुद्ध, श्रेष्ठ विचारांनी भरपुर करण्याची सवय लावली असेल तर नेहमीच प्रसन्न मनाने छोटी मोठी कार्ये करू शकतो. म्हटले आहे ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’. प्रसन्न मनाने केलेले कार्य पुण्य कर्म होते व चांगल्या कर्मांचे फळ सुख आपल्याला मिळू लागते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्या शुद्ध व शक्तिशाली उर्जेचा अनुभव होऊ लागतो. खरतर मन प्रसन्न राहणे हीच तर खरी पुण्याई आहे.
आज मनुष्याकडे सर्व काही असून सुख, शांती, समाधान नाही त्याचे कारण आहे व्यर्थ विचार. स्वतःच विणलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या कोळ्या सारखी गत झाली आहे. म्हणून जसे मंदिरामध्ये जाताना शुद्धीचे महत्व ठेवले जाते तसेच मनाला मंदिर समजून त्याच्या शुद्धीकडे ही लक्ष द्यावे. जे ह्या मनामध्ये संकल्प निर्माण करू त्याला वास्तविकते मध्ये उतरवण्याची क्षमता आपल्यात आहे. म्हणून विचारांचा काळजीपूर्वक वापर करा. मनामध्ये सतत शुद्ध विचारांची वासधुप लावा, जीवनातले सर्व कलह क्लेश समाप्त होतील आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील.
आपल्या विचारांची स्पंदने अदृश्य रित्या आपल्या व आपल्या जीवनाला प्रभावित करतात. समजा एका बिल्डिंग मध्ये 50 फ्लॅट्स आहेत. एक सारखे फर्निचर, पडदे, सर्व काही एक सारखे आहे. पण प्रत्येक घराचे वायब्रेशन वेगळे कारण त्या घरात राहणाऱ्या लोकांची मानसिकता वेगळी आहे. म्हणून आपण एखाद्याच्या घरी गेलो तर आपल्याला वातावरण तंग वाटते तर कोण कडे प्रसन्न. हा सर्व परिणाम आपल्या विचारांचा आहे. म्हणून स्वतःला व दुसऱ्यांना चांगले वातावरण द्यायचे असेल तर विचारांना चांगले करण्याची आवश्यकता आहे. पवित्रता सर्व गुणांची जननी आहे. विचारांचे पावित्र्य मनाला सुख शांतीचा अनुभव देतो. म्हणून मनाला मंदिर बनवा.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply