लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. आज भारतातील शास्त्रीय संगीतातील मंजिरी हे एक बिनीचे नांव आहे. चंदू प्रभुणेच्या फोनवर आम्ही उभयतां तिच्या कार्यक्रमाला गेलो होतो.
गोखले शिक्षण संस्थेत पहिल्यांदा जाण्याचा योग आला. हे प्राचीन काळचे गुरुकुल आजही डेक्कन वरील धबडग्यात शांतपणे स्थिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात होणारी ही आगळी वेगळी मैफिल!अगदी वेळेवर सुरु झाली. दीडशेहून अधिक रसिक श्रोते भल्या (रविवारच्या?) सकाळी उत्साहाने उपस्थित होते. साधारण पावणे दहा पर्यंत हा स्वरोत्सव सुरु होता. साथीला (संयोजकांच्या भाषेत ) ” THE ” भरत कामत (तबला ) आणि “THE ” कुंडलकर (संवादिनी) होते.
मंजिरीच्या आवाजात पहाडातील सौष्ठव आहे. कातळ फोडून उन्मळलेल्या झऱ्याचा आवेग आहे. वारंवार आज तिच्यात तिच्या गुरु किशोरीताई आमोणकरांचा भास होत होता. संगीताला समर्पण हा किशोरीताईंच्या बाबतीत अखेरचा शब्द ! मंजिरी आज त्या वाटेवरून जाताना दिसली. तिच्या भावमुद्राही किशोरीताईं इतक्याच इंटेन्स होत्या. विचारलेल्या दोन्ही प्रश्नांना तिने अभिनिवेश रहित साधी उत्तरे दिली. हे जपणं अवघड असतं . माणसाला इतकं अंतर्बाह्य बदलून टाकणं फक्त कलांना (विशेषतः गायनकलेला )सहजसाध्य असतं.
“अहिर भैरवाच्या” अंगीभूत गोडीनंतर तिने तोडी सादर केला. त्याच्या ताना ठिकठिकाणी पंडित भीमसेनांच्या आवेशाची आठवण करुन देत होत्या. पारंपरिक भैरवीच्या जागी आज तिने सांगतेसाठी बिलावल निवडला. सर्व रागांची निवड आणि त्यांचा फुलवलेला विस्तार श्रीमंत करून टाकणारा होता.
नामदार गोखल्यांच्या करारी परिसरात हा श्रुतिरम्य सोहोळा शोभून दिसला. तिचे यजमान (अभिजित) नव्या उत्कटतेने सारं ऐकत होते आणि रेकॉर्ड करुन घेत होते.
ज्ञानवृक्षाखाली आज तिने स्वरांचे चार वृक्ष लावले. त्यावेळी उपस्थित असणं हा आमचा सन्मान होता.
ही सुरेल सकाळ कायम लक्षात राहील. खूप दिवसांनी एक ” प्रभात ” स्वरमयी झाली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply