पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला. सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला पकडले व त्याच्यावर रितसर कारवाई केली.
लुव्र संग्रहालयाने त्यानंतर मोनालिसाच्या चित्रापुढे अभेद्य अशी काच बसविली. जेणेकरून ते मौल्यवान चित्र सुरक्षित राहील. . . आजही ते २ बाय ३ फूट आकाराचे जगप्रसिद्ध चित्र पाहण्यासाठी लाखो पर्यटक पॅरीसमधील या संग्रहालयाला भेट देत असतात.
सोळाव्या शतकात लिओनार्दो दी व्हींची या इटालियन चित्रकाराने मोनालिसाचे चित्र काढले. त्यावेळी कागद व कॅनव्हास उपलब्ध असताना देखील त्याने हे चित्र बारा एमएम जाडीच्या दोन बाय तीन फूट आकारातील लाकडी पॅनेलवर काढलेले आहे. त्या चित्रावरचे रंगाचे थर हे आपल्या केसांच्या जाडीपेक्षाही पातळ आहेत.
लिओनार्दोचा जन्म १५ एप्रिल १४५२ साली इटलीमध्ये झाला. त्याचे वडील नोटरी व जमीनदार होते. आई शेतीची कामे करणारी गृहिणी होती. त्याची चित्रकलेतील आवड पाहून वडिलांनी त्याला कलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला पाठवले. त्याच्या गुरुंनी त्याला चित्रकला व शिल्पकलेत पारंगत केले. त्याचबरोबर त्याने इंजिनियरींग व शरीरशास्त्राचाही अभ्यास केला.
एका रेशमच्या व्यापाऱ्याची लीजा घेरार्दिनी ही तिसरी पत्नी. त्या व्यापाऱ्याने लिओनार्दोला आपल्या या पत्नीचे चित्र काढण्यास सांगितले. ते साल होते १५०३. त्यावेळी लिजा चोवीस वर्षांची होती.
इटालियन भाषेत मन्ना लिजा म्हणजे माझी महिला. अपभ्रंश होऊन ते कालांतराने ‘मोनालिसा’ झालं.लिजा लिओनार्दोच्या स्टुडिओत येताना सोबत एका मोलकरणीला घेऊन येत असे. लिओनार्दो हा एक मोठा शास्त्रज्ञही होता, तो अव्याहत कामात गर्क असे त्यामुळे तीन वर्षे झाली तरी त्याचे चित्र काढणे चालूच होते. लिजाला मांजर आवडते हे कळल्यावर लिओनार्दोने तिच्यासाठी एक मांजर देखील पाळले.
लिजा एकदा त्याला गंमतीने म्हणाली, ‘मी म्हातारी झाले तरी तुझे हे चित्रकाम चालूच राहील की काय?’ त्यावर लिओनार्दोने उत्तर दिले, ‘या चित्राला मी खूप वेळ घेत असलो तरी माझ्यानंतर या चित्रामुळेच माझे नाव जगभरात घेतले जाईल. तुझ्या रूपात दुसरे एक रूप दडलेले आहे, त्याच्या शोधात मी चाचपडतो आहे. व्यक्तीचे फक्त बाह्यरुप दाखविणे एवढेच चित्रकाराचे काम नाही, त्या व्यक्तीचे अंतर्मनही चित्रातून प्रगट झाले पाहिजे.’ त्यामुळेच मोनालिसाच्या चित्रातील तिचे स्मितहास्य, हे गूढरम्य वाटते.
लिओनार्दोचा स्टुडिओ म्हणजे एक बंदिस्त अंगण होते. भोवतालच्या भिंती या काळ्या रंगाने रंगविलेल्या होत्या. अंगणात वरच्या बाजूने प्रकाश येई. तो हवा तेव्हा, हवा तसा मिळावा म्हणून झडपांची व्यवस्था त्याने केलेली होती. अंगणात सुंदर कारंजे होते. फुलांचे ताटवे होते.
मोनालिसाच्या चित्रामधे तिच्यामागे डोंगर कपारी व त्यातून वहात आलेले पाणी त्याने दाखवले आहे. हे सर्व करड्या रंगाने त्याने चितारलेले आहे. त्यामुळे चित्राची भव्यता वाढली आहे. हे चित्र अनेक सुख दुःखाला सामोरी जाऊन स्थिर राहणाऱ्या स्त्रीच्या धरित्री रुपाचे एक प्रतीकच आहे.
तिचा पोशाखही अत्यंत साधाच दाखवलेला आहे. करड्या रंगाचेच कपडे तिनं परिधान केलेले आहेत. अंगावर एकही दागिना नाही. तिचे हे चित्र काढणे चालू असतानाच तिच्या नवऱ्याने फ्लाॅरेन्स सोडून कलब्रियाला कायमचे रहायला जाण्याचे ठरविले. साहजिकच लिओनार्दोचे हे चित्र अपुरे राहिले. ‘अधून मधून मी चित्रासाठी येईन’ असं लिजा म्हणाली, मात्र तिकडेच तिचा अंत झाला.
त्यानंतर फ्लाॅरेन्स सोडण्याचा लिओनार्दोने विचार केला. फ्रान्सचा राजा पहिला फ्रॅन्सिस याने लोईर नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या अॅम्बो किल्ल्यात त्याची रहाण्याची व्यवस्था केली. एकदा राजा त्याची चित्रे पहायला आला. त्याने लिओनार्दोची चार चित्रे खरेदी केली. मोनालिसाचेही चित्र त्याने घेण्याचे ठरविले. लिओनार्दो म्हणाला, ‘ते चित्र अपुरे आहे. ते नेऊ नका.’ परंतु राजाने ऐकले नाही. राजा ते चित्र घेऊन गेला.
इकडे लिओनार्दो अस्वस्थ झाला. मध्यरात्री तो राजाकडे गेला व म्हणाला, ‘या चित्राशिवाय मी जगू शकत नाही.’ राजाने चित्र त्याला परत दिले. त्याची योग्य अशी किंमतही दिली, मात्र एक अट घातली. ‘तुझ्या मृत्यूनंतर मोनालिसाचे चित्र राजाच्या चित्र संग्रहात राहील.’ लिओनार्दोने ही अट मान्य केली व चित्र घेऊन तो बाहेर पडला…
जगज्जेता नेपोलियनला देखील या चित्राने भुरळ घातलेली होती. त्याच्या बेडरूममध्ये त्याने मोनालिसाचे चित्र ठेवलेले होते.
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोने याच चित्राची २१ आॅगस्ट १९११ रोजी संग्रहालयातून चोरी केली होती. काही वर्षांनंतर त्याने ते परत केले.
आज या चित्राला ५०० वर्ष होऊन गेली. तरीदेखील अजूनही मोनालिसाचं नाव घेतलं की, अजरामर चित्रकार ‘लिओनार्दो दी व्हींची’ हा आठवतोच…
– सुरेश नावडकर ६-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply