लीला नगरकर हे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी धारवाड येथे झाला. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. मा.लीला चिटणीस लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ‘ उसना नवरा ‘ यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ‘ छाया- साल, १९३६ ‘ व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ‘ वहाँ -१९३७ ‘ आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ‘ जेलर -१९३८ ‘ या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली मा.लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ‘ संत तुलसीदास’ यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ‘ कंगन, बंधन व झुला ‘ या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मा.लीला चिटणीस यांनी जवळपास शंभर एक चित्रपट केले. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी १९२८ साली झाला होता. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य अल्पजीवी ठरलं. अवघं सहा वर्षांचं! या काळात तीन मुलांचं मातृत्व पदरी आलं. मुलांसाठी, त्यांना चरितार्थासाठी उभं राहणं भाग होतं. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. मा.लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ, तशीच ती धाडसी होती. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे, त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ‘शहीद’ मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची मा.लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्य सिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून मा.लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. मा.लीला चिटणीस या १९७० ला न्यूयॉर्क मध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना, क्वचित अमेरिकेत येणाऱ्या सहकलाकारांना भेटत होत्या. मा.लीला चिटणीस यांनी ’चंदेरी दुनियेत’ हे जीवनचरित्र लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply