आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण करुळ येथील शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.तर कणकवली येथे १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. इच्छा असूनही त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. ९ फेब्रुवारी १९५२ रोजी एस.टी. कॉपरेरेशनमध्ये ज्युनिअर क्लार्क म्हणून नोकरीस लागलेल्या कर्णिकांनी साहित्य निर्मितीसही सुरुवात केली. मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा – कृष्णाची राधा – ही रत्नाळकर मासिकातून प्रसिद्ध झाली.’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्मय, अशा सर्वच साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून कर्णिकांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला. मधु मंगेश कर्णिक यांनी आशयाच्या अंगाने मराठी कादंबरीत वैविध्य आणले.
देवकी, सूर्यफूल, निरभ्र, माहीमची खाडी, भाकरी आणि फूल, जेईली, सनद, कातळ, वारुळ, संधिकाल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ज्या भूमीशी आपली नाळ बांधली गेली आहे, त्या भूमीशी आत्मियतेने बंध राखून आणि आपल्या अनुभव विश्वाशी निगडित राहून त्यांनी प्रदीर्घकाळ कथालेखन केले. कोकणी गं वस्ती, पारघ, तोरण, मंत्र, भुईचाफा, मांडव, गुजा, संकेत, तहान, डोलकाठी, झुंबर, केवढा, गवळण, अनिकेत, उत्तरायण इत्यादी ४१ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मधु मंगेश कर्णिक कथाकार, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. इतर चौफेर लेखनही त्यांनी केले असून ते कवीसुद्धा आहेत. त्यांनी १९४५ मध्ये लिहिलेली पहिली कविता ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांचा ‘शब्दांनो, मागुते या’ हा पहिला काव्यसंग्रह २८ एप्रिल २००१ रोजी प्रकाशित झाला. त्यात ८५ कविता आहेत. मधु मंगेश कर्णिक यांची ललित गद्यात समाविष्ठ होणारी दहा पुस्तके आहेत. १) सोबत, २) नैऋत्येकडचा वारा, ३) जिवा भावाचा गोवा, ४) माझा गाव माझा मुलुख या पुस्तकांचा समावेश होतो.
मधु मंगेश कर्णिक यांनी ‘देवकी’ व ‘केला तुका झाला माका’ ही दोन नाटके लिहिली. दूत पर्जन्याचा हे चरित्र, जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सौंगडी, चिमणचारा, गोड गोड चिमणचारा ही खास लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्णिक यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ या कथेवर ‘घुंगरू’ हा हिंदी चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. भाकरी आणि फूल, जुईली, रानमाणूस या कथा-कादंबऱ्यांवर आधारित दूरदर्शन मालिका विलक्षण गाजल्या व लोकप्रिय झाल्या. त्यांनी विविध विशेष अंकांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. ते कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply