सहकार्यकारी संपादक – साप्ताहिक ‘विवेक
माध्यम! माध्यम म्हणजे काय? तर आपल्या विचारांचे, भाव भावनांचे प्रकटीकरणच नव्हे तर सादरीकरण करणे ज्याद्वारे होते ते माध्यम. आत्ता मीसुद्धा माझे विचार या लेखाद्वारे सादर करत आहे व तो लेख अमुक अमुक प्रसिद्ध करत आहे म्हणजे ते जे आहे ते माध्यम ! हे जे मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांपर्यंत पोचायला मदत करते ते मास मिडिया किंवा जनमाध्यम ! पुरातन ग्रीक संस्कृतीत रंगमंचावर अशी नाट्य सादरीकरण व्हायची. ८६८ ख्रिस्तपूर्व सालात चीनमध्ये डायमंड सूत्र म्हणून पहिले पुस्तक छापून प्रसिद्ध करण्यात आले. भारतातही पुरातन काळात कला – नाट्यकला, हस्तकलेचे सादरीकरण व्हायचीच. अनेकदा राजाश्रयाने पुढे १०४१ मध्ये हालचाल करणारे मातीचे छपाईयंत्र चीनमध्ये बनवले गेले.
इ.स. १४०० मध्ये युरोपात छपाई सुरू झाली. छापलेले अनेक जण खूप काळ वाचू शकायचे. तेव्हापासून छपाई माध्यम हे जनमाध्यम मास मिडिया म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे १४५३ मध्ये जोहान्स गुटेनबर्गने छपाईयंत्राचे संशोधन केले ज्यामुळे एकावेळेस अनेक पुस्तके/ प्रती छापता येऊ लागल्या. पुढे १८०० मध्ये द टाईम्स नावाचे पहिले वृत्तपत्र सुरू झाले. १९२० पर्यंत फक्त छपाई माध्यमांनाच मास मिडिया म्हटले जायचे. परंतु पुढे सिनेमा, टीव्ही आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस आंतरजाल आणि आता समाजमाध्यमे सर्वच या मासमिडियामध्ये मोडतात.
त्यामुळे माध्यमांना समाजावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास झाला आहे. १९४०-५० च्या दरम्यान यासंबधात जो अभ्यास केला. त्याप्रमाणे लोक त्यांच्या विचाराप्रमाणे माध्यमांची निवड करतात. त्यापुढे माध्यमांचा प्रभाव मर्यादित असतो असे दिसले. तर नंतर असेही आढळून आले की माध्यमे नियंत्रित करणाऱ्या उच्चभ्रू अल्पसंख्य लोकांचेच विचार व दृष्टिकोन प्रकट केले जातात. तर कदाचित पहिल्या अभ्यासाच्या वेळी फक्त वृत्तपत्रे, पुस्तकेच जनमाध्यमे असल्यामुळे तसा अनुभव आला असेल. नंतर सिनेमा, रेडिओ, टीव्ही ही पण बराच काळ उच्चभ्रूची मक्तेदारी असल्यामुळे तसा अनुभव दुसऱ्या अभ्यासात आला असेल.
१९८०-९० मध्ये जो अभ्यास करण्यात आला त्याचे निष्कर्ष वरील दोन्हींचे एकत्रिकरणच होते जणू! आपले विचार प्रभावित करण्यामागे वाचक, श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या दृष्टिकोनांचा, विचारांचा हात असतो आणि काही विशिष्ट कंपन्याच जवळजवळ ९५ टक्के मास मिडियावर प्रभुत्व गाजवतात. त्यामुळे या कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या जाहिराती व प्रपोगंडाचा लोकांच्या क्रय निश्चितीवर परिणाम होतच असतो. त्यामुळे ही शक्ती योग्यप्रकारे वापरली तर चांगले परिणाम समाजावर होतात तर अयोग्य पद्धतीने वापरली तर वाईट परिणाम होतात व मुले विशेषकरून जास्त प्रभावित होतात.
आपण सध्याचा विचार केला तर मुले जन्मतःच मिडियाला सामोरी जातात. आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर त्या नवजात अर्भकाचे फोटो काढले जाऊन ते क्षणार्धात प्रसारित होतात, अगदी साता समुद्रापलीकडे. नंतर त्याला जेवू – खावू घालायला पण मोबाईल/ आय पॅडवर विविध कार्टून्स/ गाणी लावली जातात. नवजात अवस्थेत घरात टीव्ही पण चालूच असतो. हळूहळू त्यातील गाण्यांचा ताल धरू लागते, हळूहळू नाचू लागते किंवा तसा अभिनय करू लागते. अगदी हुबेहूब त्याचे आपल्याकडून कौतुक अगदी व्हायरल कौतुक होते. त्यामुळे ही माध्यमे त्यांचे विश्व व्यापायला लागतात. किंबहुना या विश्वाचा पगडा त्याच्यावर अगदी जास्त प्रमाणात होत असतो. सेल्फी आणि आपल्या प्रत्येक गोष्टींचे फोटो काढून व्हायरल करणे ही त्यांच्यासाठी नित्याचीच होऊन जाते. सिनेमा, मालिका पहाणे ही त्यांच्यासाठी आवश्यक गोष्ट झाली आहे.
मध्यंतरी माझ्याकडे एका ६ वर्षांच्या मुलीला घेऊन तिची आई आली होती. ती रात्री झोपत नव्हती. घाबरायची, शाळेत पण जायला नकार देत होती. सतत दडपणाखाली असायची. तिची भूक पण कमी झाली होती. तिच्या केसची पूर्ण माहिती घेतल्यावर लक्षात आले की, घरातल्यांबरोबर ती पण एक रहस्यमय मालिका बघायची. ते भूत आहे अशी तिची कल्पना झाली होती. ते भूत मालिका संपताना पण तसेच राहिले होते. त्यामुळे तिला वाटत होते की ते आता आपल्याकडे येणार व आपल्याला त्रास देणार मग तिला या मालिकेची कथा नीट समजावून सांगितली. त्याचा खरा अर्थ सांगितला. भूतं ही कल्पना आहे, सत्य नाही वगैरे सर्व समजवावे लागले. असे भयपट किंवा भय मालिका बघून भयभीत होऊन कितीतरी मुले किंवा स्त्रिया उपचारांसाठी येत असतात! एकदा एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले होते. तो गाणं छान म्हणायचा. शिकत होता आणि त्याला एका रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये भाग घ्यायचा होता. आई त्याला प्रोत्साहन देत होती. जणू हुरळूनच गेली होती. तर वडिलांचा अगदी विरोध होता. त्यांचे म्हणणे होते त्यातील निर्णय/ निकाल आधीच ठरलेले असतात. नुसत्या प्रसिद्धीने माझा मुलगा हुरळून जाईल व गाणं मागे पडेल अशी पण भीती त्यांच्या मनात होती. मग त्या सर्वांचे समुपदेशन केले. वडिलांना सांगितले की, मध्यंतरी जे लिटल चॅम्प १० वर्षांपूर्वी झाले ते सर्व आज पुढे आले आहेत. त्यांनी रियाझ करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे गाण्यातले करिअर उत्तम रितीने करत आहेत. त्यामुळे आपण त्याच्यामागे उभे राहिले पाहिजे. प्रसिद्धीचा समतोल ठेवला पाहिजे. आईला पण समजावून सांगितले की, केवळ प्रसिद्धीसाठी हे करायचे नाही आहे तर किंबहुना त्याचे गाण्यातले करिअर विकसित करायची ही संधी आहे असे बघा. प्रसिद्धीमुळे दडपण, दबाव पण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच त्याकडे करिअरच्या विकासाची संधी असेच बघायला हवे.
अशाप्रकारे मिडिया आपण कसा हाताळतो म्हणजे मिडियात सादरीकरण करणारे व ते ऐकणारे/ बघणारे/ वाचणारे दोघेही काय विचार मांडतात व घेतात यावर सर्व अवलंबून असते. तारे जमीं पर सारख्या चित्रपटाने अध्ययन अक्षमतासारखा विषय अतिशय संतुलित रंजक पद्धतीने हाताळून समाजात त्याविषयी जागृती केली. थ्री इडियट्स मधून देखील शिक्षण कशासाठी, करिअर कसे निवडायचे यासंबंधीच्या विचारांना चालना दिली.
छपाई माध्यामांनी केसरी, मराठासारख्या वृत्तपत्रांची स्वातंत्र्यसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वाची भूमिका आपण पाहिलीच आहे. आजही या आरोग्य, मन आरोग्याबाबत छपाई माध्यमे जागृतीसाठी महत्त्वाची भूमिका सकारात्मक पद्धतीने पार पाडतच आहेत. माध्यमांनीच अनेक निवडणुकात सत्ताधाऱ्यांना तारण्याची किंवा पाडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पाच वर्षापूर्वी समाजमाध्यम भारतातील निवडणुकात, तीन वर्षापूर्वी अमेरिकेतील निवडणुकात अहं भूमिका पार पाडली आहे.
थोडक्यात माध्यमात घडवण्याची वा बिघडण्याची शक्ती आहे. आपण त्यातील कोणता भाग घ्यायचा हे ठरवायचे आहे. विशेषतः मुलांबाबतीत. दोन वर्षांपर्यंत तरी त्यांना अशाप्रकारे कुठल्या मिडियाला अजिबात सामोरे जाऊ नाही दिले पाहिजे.
नंतरसुद्धा काही ठराविक वेळच त्यांना टीव्ही/ मोबाईल/ नेट वापरू दिला पाहिजे. त्यात सुद्धा त्यांना माहितीपूर्ण, सकारात्मक बघायची सवय लावली पाहिजे त्यासाठी पालकांनी पण सकारात्मकच गोष्टी त्यांच्या समोर तरी पाहिल्या पाहिजेत. रहस्यमय, भयप्रद सिनेमा त्यांच्यासमोर बघणे टाळले पाहिजे. माध्यमांमध्ये भाग घेताना त्याकडे प्रसिद्धी माध्यम असे आपणच नाही बघितले पाहिजे तर विकासाचे माध्यम म्हणून बघायला हवे.
पुस्तके वाचून दाखवायला हवी. पुस्तक वाचन होते का हे बघायला हवे त्यासाठी आपणही वाचायला हवे. कारण छपाईमाध्यम हे सर्वात सुरक्षित माध्यम आहे.
जे वाचले, ऐकले, बघितले त्याबाबत मुलांशी चर्चा केली पाहिजे, त्याविषयी त्यांच्या शंकांचे निरसन योग्य वेळी झाले तर गैरसमजांनी गैरपरिणाम होणार नाही.
शेवटी एक लक्षात घेतले पाहिजे माध्यमांचा उपयोग कोलित हातात घेतलेल्या माकडासारखा करायचा की मशाल हातात घेतलेल्या वाटाड्यासारखा हे आपण ठरवायचे आहे.
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. अद्वैत पाध्ये यांनी लिहिलेला लेख.
Leave a Reply