नवीन लेखन...

मास्क आणि मुखवटे

घरी कधी आवरा-आवरी , साफसफाई काढली की धुळीसाठी म्हणून नाकावर रुमाल बांधणे , हिंदी सिनेमांतल्या ऑपरेशन थिएटरमध्ये टेन्शनमध्ये असणाऱ्या डॉक्टरनी घातलेला हिरवागार “मास्क” असे काही छोटे छोटे संदर्भ सोडले तर “मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली .. … हां ….आता त्यामुळे काही गैरसमज होतात … म्हणजे बघा ना … मास्क लावल्यावर आधी माणूस चटकन ओळखू येत नाही …परवा तर एकानी दुसऱ्याला त्याच्या बरोबर असलेया मोटरसायकल मुळे ओळखलं ….. आणि समोरासमोर आल्यावर जर ओळखलंच तर दोघंही एकमेकांकडे बघून हसतात पण दोघांनाही असं वाटतं की “किती हा शिष्ठपणा … मी एवढा हसलो पण तो हसलाच नाही!!” …. कारण दोघेही मास्कच्या आड हसलेले असतात …. अर्थात एखाद्या नावडत्या व्यक्तीला त्याच्या देखत तोंड वाकडं करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या मास्कमुळे मिळतं हा भाग वेगळा ….. आता मास्क इतका रुळलाय की अल्पावधीतच त्यांचे Use & throw पासून ते अगदी खास वेलबुट्टी असलेले डिझायनर Party wear Mask असे अनेक प्रकार उपलब्ध होऊ लागले …..असो … हा सगळा गमतीचा भाग सोडला तर या मेडिकल संज्ञेतल्या मास्कशी इतका घरोब्याचा संबंध यायच्या आधी जो “मास्क” सर्व सामांन्यांच्या अगदी परिचयाचा होता तो म्हणजे अर्थात मास्क या इंग्रजी शब्दाचा दुसरा अर्थ… म्हणजेच “मुखवटा” ….

माझ्या आठवणीनुसार आमच्या पिढीची “मास्क” या प्रकाराशी ओळख झाली ती लहानपणी बघायला गेलेल्या बालनाट्यामध्ये . प्रत्येक बालनाट्यात एक तरी राक्षस किंवा चेटकीण असायची … ज्यांना त्या त्या भूमिकेसाठी तसा मास्क घातलेला असायचा …. कधी कधी शाळेच्या स्नेहसंमेलनात ससा , कासव , अस्वल , हत्ती वगैरे प्राण्यांचे मास्क घालून कार्यक्रम पार पडायचे . त्या मास्कचं नक्कीच खूप कौतुक वाटायचं त्यावेळेस ….. पण तरीही या सगळ्यांमध्ये त्या मास्कचं “मास्क असणं” असं विशेष जाणवलं नाही . ..एखादी गोष्ट TV , सिनेमा यांच्याशी जोडली जाते तेव्हा तिचा भाव आणि अप्रूप दोन्ही वाढतं . तसंच काहीसं आमच्या पिढीतल्या मुलांचं मास्कच्या बाबतीत झालं . तसे “स्पायडरमॅन , सुपरमॅन , मिकी माऊस” यांचे पुठ्ठ्याचे मास्क मिळायचे पण नव्वदीच्या उंबरठ्यावर TV वर प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेनंतर जत्रेमध्ये आणि दुकानात “हनुमानाचे” प्लास्टिकचे मस्त मस्त मास्क/ मुखवटे मिळू लागले आणि पालकांना देखील हे नवीन बालहट्ट पुरवावेच लागले. काही राक्षसांचे देखील मास्क असायचे . कालांतराने महाभारत सुरु झालं आणि या मास्कच्या दुनियेत काही नवीन पात्रांची भर पडली. नंतर असे अनेक मास्क आले आणि गेले तरीही हनुमानाचा मास्क आणि त्याबरोबर प्लास्टिकची गदा याची क्रेझ मात्र आत्ताच्या लहान मुलांपर्यंत टिकून आहे .

तेव्हा अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे मंडळीचे मराठी सिनेमे आणि अनिल कपूर , माधुरी दीक्षित आणि नुकतेच उदयास येत असलेले “खान्स” यांच्या हिंदी सिनेमात आमची पिढी रमली होती . याव्यतिरिक्त हॉलीवूड मधले काही निवडक चांगले सिनेमे जे हिंदीत डब होऊन यायचे तेही आवडीने बघायचो … आणि त्यातलाच एक 90’s मध्ये आलेला हिट सिनेमा म्हणजे …… The Mask…. “जिम” नी जबरदस्त “कॅरी” केलेल्या त्या वेगळ्याच गर्द हिरव्या मास्कनी मात्र सॉलिड धुमाकूळ घातला …. मास्कला Glamour मिळवून दिलं ते याच सिनेमानी … The Mask च्या आधी आणि नंतर सुद्धा अनेक चित्रपटाच्या कथानकात मास्क वापरला गेला ….

मराठी मध्ये दखल घेण्याजोगा मास्कचा उपयोग महेश कोठारे यांनी केला … त्यांच्या “धडाकेबाज” या सिनेमात ज्या खलनायकाचा खरा चेहरा संपूर्ण चित्रपटात एकदाही दिसत नाही त्या मानवी कवटीचा मास्क परिधान केलेल्या “कवट्या महाकाळ” चीच चर्चा जास्त झाली …. हाच मराठीतला “मास्कधारी ट्रेंड” अगदी आत्ताच्या “विकी वेलिंगकर” पर्यंत दिसून येतो . हिंदी चित्रपट सृष्टीत तर असे अनेक प्रयोग झाले … काही सेकंदांसाठी चेहऱ्यासमोर एक विशिष्ट मास्क घेत… “अरे दिवानो, मुझे पेहचानो” असं म्हणत आणि मग तो मास्क बाजूला घेत “मै हु डॉन” म्हणणाऱ्या “अमिताभ बच्चन” यांची त्या गाण्यातली entry आजही लक्षात राहते … हळूहळू कथानक रंजक करण्यासाठी अनेक पटकथा लेखक , दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही चित्रपटातल्या Mask man ला झुकतं माप दिलं आणि मास्कचा पुरेपूर वापर करत आपले सिनेमे सुपरहिट देखील केले …. मग तो “मिशन काश्मीर” मधला अगदी साधा मास्क असो किंवा त्याच ह्रितिकच्या “क्रिश” साठी तयार करण्यात आलेला स्पेशल मास्क असो …..

“मास्कधारी पात्र” या “ट्रम्प कार्ड”ची भुरळ OTT platform वरच्या वेब सिरीजकर्त्यांना पडली नसती तरच नवल….. या माध्यमातदेखील अगदी आत्ताच प्रदर्शित झालेल्या “असुर” आणि अभिषेक बच्चन अभिनीत “Breath” मधला मास्कचा वापर नक्कीच यशस्वी झालाय ….

मनोरंजन क्षेत्रानंतर याचा कोणी सुयोग्य वापर केला असेल तर तो जाहिरात क्षेत्रानी… काही वर्षांपूर्वी क्रिकेट वर्ल्ड कपच्या प्रसिद्धीसाठी “सचिन तेंडूलकर”चे मास्क लावत खेळणाऱ्या अनेक शाळकरी मुलांची एका शीतपेय कंपनीने केलेली जाहिरात सगळ्यांच्या नक्कीच स्मरणात असेल … विविध निवडणुकांदरम्यान जाहीर सभा आणि रोड शोमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते स्थानिक राजकारण्यांपर्यंत सगळ्यांचे मास्क लावून सहभागी होणं हे त्या त्या कार्यकर्त्यांसाठी प्रचाराचं मोठं साधन ठरलं हे नक्की …. सध्याच्या तरुणाईला वेड लावणाऱ्या IPL सामन्यांदरम्यान सुद्धा खेळाडूंच्या मास्कचा वापर प्रसिद्धीसाठी केला जातो …. गेल्या काही वर्षात नावारूपाला आलेल्या Event Management च्या लोकांसाठी तर मास्क सगळ्यात महत्वाचा घटक. छोट्या मोठ्या वाढदिवसाच्या पार्टीत लहान मुलांना आकर्षित करायला वेगवेगळ्या कार्टूनचे मास्क वाटणं ही तर प्रथाच झालीये आता…. शिवाय मोठ्यांच्या गेट टुगेदर मध्ये , कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे चित्रविचित्र मास्क असतातच ….. ख्रिसमसच्या सुमारास पूर्वी एखाद दुसरा दिसणारा “सांताक्लॉज” आता प्रत्येक दुकानाबाहेर दिसतो आणि त्या आठवड्याभरात मोठमोठ्या दुकानांपासून रस्त्यावरच्या सिग्नलपर्यंत अनेक ठिकाणी त्या सांताक्लॉजच्या मास्कची विक्रमी विक्री होते …. थोडक्यात काय तर या अर्थचक्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मास्क प्रकाराचाही खारीचा वाटा आहे हे मान्य करायलाच हवं …

या सगळ्या दृष्य स्वरूपाच्या मास्क व्यतिरिक्त अदृश्य मास्क/ अदृश्य मुखवटे तुम्ही आम्ही मनुष्य प्राणी नेहमी वापरत असतो. नाटक-सिनेमातले अभिनेते तर असे विविध मुखवटे बदलतातच पण “जीवनाच्या रंगभूमीवर” आपण सर्वच “पात्र” कळत नकळत अनेक “मुखवटे” चढवत आणि उतरवत असतो . शिक्षकांसमोर विद्यार्थी किंवा बॉस समोर स्टाफ साळसूदपणाचा मुखवटा घालतात आणि त्यांची पाठ फिरताच काढून टाकतात . ….कोणी श्रीमंतीचा मास्क तर कधी गरीब असल्याचा मुखवटा , सज्जनपणाचा मुखवटा , कोणी आनंदी असल्याचा तर सगळं व्यवस्थित असून उगाच दुःखीपणाचा मुखवटा , असे अनेक मुखवटे / मास्क आपण कधी जाणून बुजून , कधी सक्तीने , कधी स्वार्थासाठी तर कधी परमार्थासाठी परिधान करत असतोच असतो …. . पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघून खंत वाटते आणि प्रश्न पडतो की दिवसागणिक इतके अदृष्य मुखवटे अगदी सहज बदलणारा माणूस या साथीच्या आजारासारख्या कठीण समयी , दुसऱ्याच्या जीवासाठी तर दूरच राहिलं पण किमान स्वतःच्या जीवाच्या काळजीपोटी तरी व्यवस्थित “मास्क” वापरण्यात हलगर्जीपणा का करतो ??……

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..