नवीन लेखन...

माझे श्रद्धेवर जगणे ?

मानवाला मिळाली, ती विचार शक्तीची देणगी. तसे विचार उत्पन्न होणे, हेच तर मेंदूचे आद्य कार्य आहे. मेंदूच्या ‘ क्रियाशीलतेचे’ प्रमुख लक्षण, म्हणजेच ‘ विचार लहरी ’ उत्पन्न होणे. आणि हेच जिवंतपणाचे लक्षण समजले गेले. हे प्रत्येक प्राण्यात होत असावे. फक्त मानवाला त्या विचारांचे पृथःकरण करण्याची कला प्राप्त झालेली आहे. हा विचार कां आला?, काय याचा अर्थ ?, कोणता परिणाम ?  हेतू काय ? आणि अशाच तऱ्हेने त्याच्या सर्व अंगाचा आढावा घेण्याची अंतरीक ईच्छा त्यांत गुरफटलेली जाणवते. यातून निर्माण होतो तो स्वभाव, संस्कार इत्यादी. मानव घडत जातो, बदलत जातो. चांगला वाईट, सुख दुःख ह्या सापेक्ष कल्पना ठरतात. ज्या स्वतः भोवती व परिस्थिती भोवती फिरतात. अनेक भावनांच्या चक्रामध्ये तो असाच गुंतत जातो.

अशीच एक प्रमुख भावना  “श्रद्धा”  ही होय. श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या  चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय. चौकट अशी आहे, म्हणजे श्रद्धा त्या अनुषंगाने निर्माण होते. चौकट मात्र तुमच्या ज्ञानाने, माहितीने, समजानेच बनते. हे सत्य आहे. मला कळलं, पटलं, आवडलं, आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे माझे जे अमुल्य जीवन आहे, त्याचे ते रक्षण करणारे असेल.  आपण तो विचार मान्य करतो. ती बनते चौकट. त्या चौकटीवर विश्वास बसू लागतो. येथेच जन्म होतो श्रद्धेचा.

चौकटच मुळी ज्ञानावर, माहितीवर अवलंबून आहे. ज्ञान ही संकल्पना फार विलक्षण आहे. सत्याचा शोध म्हणजेच ज्ञान. सत्य म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. म्हणूनच सत्य म्हणजेच तो परमात्मा. हे तर आम्हाला समजले, उमजले, कळले, परंतु सत्याचा शोध त्यामुळे कठीण होऊं पहात आहे. कारण अंधाराची खोली अजून पूर्ण लक्ष्यांत येत नाही, तर प्रकाशाची तिव्रता कशी समजावी. किती अज्ञान किती ज्ञान हे कळणे त्याचमुळे अवघड. जेंव्हा कोणत्याही शोधकार्याचा व्यक्ती आढावा घेते, तेव्हां तिला संपूर्ण जाणीव होते की तिचे विचार बदलत जातात. कारण विचारांचा आधारच मुळी तर्क असतो. जे तो बघतो, समजतो त्यावरच तो तर्क काढून अनुमान करतो. आणि जर तर्क बदलत जात असतील,  तर तसेच अनुमान पण बदलत जाणे अपरिहार्य ठरते. कारण हीच शोध प्रक्रिया आहे. जे मी समजलो ते वेगळे असावे असे त्याला वाटते. परंतु हा त्याचा विचार,  हा तर्क देखील प्रासंगिक ठरतो. कारण त्याच प्रश्नावर सखोल चिंतन केले गेले तर प्रत्येक घटना, परिस्थितीचे स्वरुप वेगळे वाटू लागते. त्याच्या माहितीमध्ये अर्थात् ज्ञानामध्ये बदल होत राहतो. ज्ञानाचे हेच वैशिष्ट्य असते की त्याला त्यावेळी तो विचार योग्य वाटत असतो. तरीही जेव्हां समजण्यामध्ये, तर्कामध्ये बदल होतो, तेव्हांही तो बदललेला विचार देखील, त्याला पटत जातो. म्हणजेच माहिती, ज्ञान सतत सत्याच्या शोधाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करीत असते. कारण “ सत्य “ हेच तर त्याच्या शोधाचे ध्येय असते.

जर विचार तर्क बदलला तर सत्य त्या क्षणाला तसेच वाटते. म्हणजेच सत्य हे व्यक्तीच्या ज्ञानावर, समजावर, आधारीत राहते. त्याच कारणाने सत्याची परिभाषा,  ‘ जशी व्यक्ती जशी त्याची समज’ त्याप्रमाणे ठरते. जर श्रद्धा ही सत्यावर अवलंबून असते तर ती त्याच प्रमाणे असेल जसे त्याला वाटते. हां, हे त्याचे आपले सत्य असते. कारण सत्य व खऱ्या अर्थाने अंतीम सत्य हे कुणालाच समजले नाही, उमगले नाही, आणि कधीही उमगणार नाही. कारण तो शोध ज्ञानाची अंतिम प्रक्रिया असणार. जर शोध, ज्ञान वाढत चालले आहे, तर अंतीम प्रक्रियेचा क्षण कुणीच कल्पना करु शकणार नाही.

अनेक विद्वान, विचारवंत, तर्कज्ञानी, महान ऋषीमुनी, इत्यादी आले, परंतु कोठे थांबावे व मान्य करावे की हेच सत्य आहे. ही एक मताची  परिस्थिती केव्हांच उत्पन्न होऊ शकत नाही.

माझ्याच कवितेत मी लिहीले होते  “ किती घेशील झेप मानवा, उंच उंच गगनी, वाढत जातील क्षितीजे,  तितक्याच पटीनी.

एक मात्र दिसणारे नैसर्गिक सत्य असे आहे की मानवी देह, त्याचे आयुष्य, त्याची क्षमता, ज्ञान, यानाच निसर्गाने चौकट टाकलेली आहे. विचार कल्पना शक्ती जरी अमर्याद असली, तरी त्याला त्या सत्याचा शोध पुर्णपणे केव्हांच लागणार नाही. मात्र बऱ्याच अंगी तो त्या विषयाचे ज्ञान प्राप्त करुन घेईल.

खरी गोष्ट मात्र अशी असते की आपण जे करतो, ते बाह्य जगातून तुमच्यावर थोपविले गेलेले असते. मेंदूच्या वैचारिक जडण-घडणाचा विचार केला तर असेच दिसते. जन्मापासून जसा मेंदू कार्यरत होतो तसा त्याच्यावर सतत बाह्य शक्तींचा आघात होत राहतो. ज्याला संस्कार असे म्हणतो. हे प्रथम आईकडून, नंतर वडील, नातेवाईककडून, नंतर शिक्षक, कुटूंब, समाज, धर्म, चिंतन,वाचन, लेखन, विविध ग्रंथसंपदा, धर्मग्रंथ, इत्यादी. अनेक अनेक बाबीमधून तुमच्या व्यक्तीमत्वाची सतत जडण घडण चालू असते. त्याच वेळी वातावरण जे निसर्ग निर्मित असते व परिस्थिती जी मानव निर्मित असते, सदैव आघात करीत असतात.

अत्यंत महत्वाचे म्हणजे तुमचे आपले स्वतःचे अंतरंग. हा तर व्यक्तीमधला एक प्रचंड, जबरदस्त, विलक्षण असा ज्ञान ठेवा असतो. बाह्य सामुहिक ज्ञान तुम्हाला घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना, हा एक छुपा अंतरज्ञान ठेवा, प्रत्येक पायरीवर उभा राहून सतत एक प्रकारे विरोधाचे कार्य करीत असतो. “ हे तुला जे सांगितले जाते, पटविले जाते, ठरविले जाते, मान्य करण्यास भाग पाडले जाते, चांगुलपणाचे त्यांत तत्वज्ञान ठासून भरल्याचे सांगितले जाते, तुझे जीवन यानेच यशस्वी होईल ते पढविले जाते, जे सांगतो तेच तर जीवनाचे अंतीम ध्येय असेल इत्यादी  — इत्यादी

अशाच तथाकथीत जीवनाचे तत्वज्ञान आम्ही, म्हणजे आमचे अंतरंग अगदी प्रत्येक पायरीवर चढताना मान्य करताना विरोध करतो.  कोणतीच गोष्ट केव्हांच लगेच मान्य केली जात नाही.

एक संघर्ष दिसुन येतो. बाह्य जगाचा,बाह्यांगाचा आम्हाला पटविण्याचा परंतु त्याला तितकाच विरोध        करण्याच आमच्या अंतर मनाचा. स्वतःची शक्ती, क्षमता, गरज, आणि जगण्याची प्रेरणा ही त्याला प्रत्येक क्षणाला, पायरीवर तडजोड करावयास भाग पाडते. तो अगदी प्रथम दिवसापासून ते तथाकथित ज्ञानी, परिपक्व होई पर्यंत तडजोडीतच जगत राहतो.  ही तडजोड त्याला फक्त जगण्याचा आधार देते. खरे एक प्रकारे व्यक्तीची हत् बलता होऊन जाते . जस जसे  त्याला ज्ञान प्राप्त होते, तस तसे तो सतत पृथःकरण करीत राहतो. येथेही त्याचे अंतरमन त्याला बऱ्याच अंशाने विरोध करीत असते.

हे असे कां ? असेच कां करावे ? ज्याने हे सारे सांगितले तो खूप ज्ञानी होता. समजदार होता, तत्ववेत्ता होता, विषय पारंगत होता. प्रसिद्ध अशी व्यक्ती होती. हे सारे माझ्यावर दबाव तंत्र वापरत असतात. त्यांचे आव्हान म्हणजे तराजूच्या एका पारड्यांत ठेवलेले माझे जीवन आणि दुसऱ्या पारड्यांत हे सारे आघात करणारे यांचा भरणा असतो. जगायचे तर अशा मान्यवंताना मान्य करावे हा अलिखीत संदेश असतो.

याच द्वंद्वात माझी श्रद्धा, विश्वास झोके घेत घेत प्रवास करीत होती. जीवाला जपणे ही प्राथमिकता होती. त्यामुळे तडजोडीत जगणे हाच मार्ग अनुसरत होतो. जे आहे ते योग्य आहे ह्या संकल्पनेंत प्रवास चालू होता. किती हेलकावे त्या श्रद्धेला ! तरी मनाशी पक्के ठरविले की चिटकून रहा. तरच जगशील. अर्थात वाढते ज्ञान, बदलते ज्ञान, बदलत्या संकल्पना, श्रद्धेलाही त्याच पद्धतीने घेऊन जातात. श्रद्धा कितीही बदलल्या तरी बाह्य शक्ती मात्र सतत वरचढ असलेल्या,  झालेल्या जाणवतात.

“ हे मात्र सत्य आहे की शेवट हा अंन्तरात्म्याच्या विचारांचाच विजय होऊन जात असतो. बाह्यांगातील सारे तत्वज्ञान हळू हळू गळून पडणार.आणि ते कसे हे मला देखील कळणार नाही.”

कारण निसर्गच सांगतो- – –

“ फिरली द्दष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असतां,

डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता

आनंदाचे मूळ गवसले, अंतरयामी रुजले होते

आजपावतो विश्व फिरुनी, मूळ ठिकाणी आले मग ते “

बदलणारे असले तरी श्रद्धा, विश्वास ह्या त्या भावनिक बाबी जपाव्यांत.

मात्र प्रत्येक पायरीवर “ तर्कज्ञानाची कसोटी आणि वैचारीक पृथःकरणाने “ त्याच्या शक्यता वा अशक्यता याचा ताळमेळ लावावा. हाच विचार द्दढ झाला तर तो तुम्हास खरा आत्मिक आनंद मिळतो, कारण तो तुमच्या आतील अंतःकरणातील विचार असतो.

— डॉ. भगवान नागापूरकर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..