नवीन लेखन...

माझा टी शर्ट

 

ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची. खरं तर ही कोणाचीही असू शकेल. कारण ही गोष्ट माझीच तर नाही, असंही अनेक वेळा मलाच वाटून गेलेलं आहे. तर हा मित्र आणि आणखी एक सहकारी आम्ही मुंबईला गेलो होतो. कामकाज आटोपल्यावर लिंकिंग रोडला सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यावरची दुकानं आणि तयार कपड्यांचे ढीग आम्हाला आकर्षित करीत होते. अखेर एका ठिकाणी थांबलो. काही शर्ट-टी शर्ट पाहिले. माझ्या मित्राला एक टी शर्ट आवडला. त्यानं तो घेतला. दोनशे रुपये किंमत होती, ती दिली. येताना अर्थातच चर्चेचा विषय होता, तो खरेदीचा, त्या टी शर्टचा. “शर्ट चांगलाय, पण त्याचा रंग आणि आडवे पट्टे हे काही तुला शोभणार नाही,” एकानं आपला अभिप्राय दिला. “कधी तरी वेगळं काही घालून पाहायला हवं,” मित्रानं त्याला प्रत्त्युत्तर दिलं. “पण, गंभीर प्रकृतीच्या ज्येष्ठ पत्रकाराला हा टी शर्ट काही ठीक वाटणार नाही,” मी म्हटलं. माझा मित्र साधा. त्याची राहणीही साधी. पांढरा किंवा फिकट रंगाचा बुशशर्ट हा त्याचा नेहमीचा वेश. त्याला हा भडक रंगाचा टी शर्ट न शोभणारा, ही त्यामागील माझी भूमिका होती. झालं, शर्ट तर घेतला होता आणि आता प्रश्न निर्माण झाला होता, तो हा टी शर्ट आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे अथवा नाही? त्याचं उत्तर येत होतं, नाही. आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या चौकटी तयार करतो का? अशा प्रश्नांची शोध घेण्याची ती वेळ नव्हती आणि तसं कारणही नव्हतं. आम्ही मुक्कामावर पोहोचले. तिथं आमचा आणखी एक सहकारी आमची वाट पाहत होता. गप्पा सुरू झाल्या अन् खरेदीचा विषय निघाला. “बघू बघू काय आणलंय?” या त्याच्या प्रश्नाबरोबर माझा मित्र म्हणाला, “मी तुझ्यासाठी एक टी शर्ट खरेदी केलाय.” तो सहकारी आनंदला. सुखावला. त्यानं तो टी शर्ट

पाहिला. त्याला खूप आवडला.

इतका की त्यानं तो लगेच घातलाही. खरंच त्याला तो छान दिसत होता; आपण आणलेला श
्ट कोणाला तरी छान वाटला, याचा आनंद माझा मित्र अनुभवत असावा. काही वेळातच आणखी एक सहकारी तिथं आला. दिवसभर काय केलं, वेळ कसा गेला, अशी चर्चा झाली. अचानक त्याचं लक्ष त्या लक्षवेधक टी शर्टकडे गेलं. तो म्हणाला, “व्वा! काय टी शर्ट आहे. उत्तम, कुठून पैदा केलास?” माझा सहकारी काही उत्तर देणार तेवढ्यात माझा मित्र म्हणाला, “मी आणलाय तो. आहे की नाही छान? खरं तर तो मी स्वतसाठीच घेतला होता, पण म्हटलं माझ्यापेक्षा याला चांगला

 

दिसेल.” ही घटना घडून काही महिने लोटले. पुन्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा माझ्या सहकाऱयानं तोच टी शर्ट घातला होता. माझा मित्र सहजपणे बोलून गेला, “अरे, हाच ना तो टी शर्ट, मी मुंबईत तुला घेऊन दिला होता?” तो सहकारी उत्तरला, “हो हो,” पण त्याच्या चेहऱयावर अनेक बदल सहजी जाणवले. हा प्रसंग नाही म्हटलं तरी माझ्या स्मरणात राहिला. ज्या ज्या वेळी मी तो विसरतो, त्या त्या वेळी तो आठवेल असं काही घडत गेलं. लग्नसमारंभात बायकांच्या गराड्यात चर्चा ऐन रंगात आलेली आणि विषय मात्र हाच की ही साडी कोणी, कोणाला, केव्हा दिली? काही वेळा तर ओळख करून देतानाही, ही साडी किनई मी हिच्या साखरपुड्याला दिली होती, अशी पुस्तीही जोडली जायची. खरं तर असे प्रसंग किंवा घटना या काही अस्वाभाविक नव्हत्या. असे उल्लेख मुद्दामही कोणी करीत असेल असं नव्हे; पण आपल्याच एखाद्या कृतीशी आपण किती निगडित होऊन जातो, याचा हा एक नमुना. आपणहून कोणाला दिलेल्या गोष्टीपासून, वस्तूपासूनही आपण आपल्याला वेगळं करू शकत नाही. त्याच क्षणात अडकून पडायला आपल्याला आवडतं म्हणा किंवा तो सरावाचाच एक भाग होऊन जातो म्हणा. खरं तर आहे तो क्षण अनुभवणं म्हणजे आयुष्य. अशा क्षणांची आणि त्यांच्या अनुभवांच्या अनुभूतींची मालिका म्हणजे आयुष्य. एखादा प्रसंग, घटना आणि त्यांची अनुभूती ही आनंद किंवा वेदनादायक असू शकेल; पण त्या क्षणात

 

अडकून पडणं म्हणजे वास्तवाशी, या क्षणाशी, या क्षणाच्या अनुभवाशी फारकत घेणं होय. आपला आनंद इतरांना वेदना देणारा तर नसेल ना, याचा विचार म्हणजेच जीवनमुक्ततेचा टप्पा. समुद्रकिनारी चालताना आपल्याला पायाच्या खुणा दिसतात; पण काही क्षणच. लाटेबरोबर पुन्हा सारं कसं नितळ होऊन जातं. माझ्या मनाचा, हृदयाचा नितळपणा कायम राखण्याचं भान मला लाभो!

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..